आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २७ नोव्हेंबर, २०२३

नेरुळ ज्येष्ठ नागरिक सार्वजनिक ग्रंथालयाचा संविधान दिन उत्साहात साजरा

नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : येथील नेरुळ जेष्ठ नागरिक सार्वजनिक ग्रंथालय यांच्या विद्यमाने ज्येष्ठ नागरिक भवन च्या सभागृहात दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दि. ना.चापके यांच्या अध्यक्षतेखाली "संविधान दिन" कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला.
     मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर शं. पा. किंजवडेकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात झाली. रमेश गायकवाड यांनी सुरेल शारदा स्तवन सादर केल्यानंतर सुनील आचरेकर व श्रीमती सीमा आगवणे यांनी पाहुण्यांचे स्वागत व परिचय करून दिला. संस्थेचे कार्याध्यक्ष विकास साठे यांनी आपले प्रास्ताविक भाषण केले त्यामध्ये ग्रंथालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला आणि व्याख्यानाच्या माध्यमातून प्रबोधनाच कार्य ग्रंथालय करीत असल्याचे सांगितले. त्यानंतर घटनेच्या उद्येशिकेचं सामूहिक वाचन झाले.
     प्रमुख व्याख्याते व संविधानाचे नामवंत अभ्यासक नागेशजी धोंडगे या प्रसंगी म्हणाले की, दुसर्‍या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे इंग्रजी राज्यसत्तेवर ओढवलेली अगतिकता आणि त्यामधून निर्माण झालेली घटना समिती स्थापन करण्यामागची इंग्रजी राजवटीची निकड, हा घटनाक्रम विषद केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा घटना समितीमधील प्रवेश आणि तद्नंतर त्यांनी भूषविलेले अध्यक्षपद याचे अभ्यासपूर्ण विवेचन करीत भारतीय नागरिकांमधे संविधान साक्षरतेची गरज अधोरेखित केली. घटनापीठ या सारखा नीरस क्लिष्ट विषय सोपा करुन, श्रोत्यांसमोर एक एक मुद्दा उलगडून सांगत व्यासपीठावरील मान्यवर आणि सभागृहही उद्बोधक माहिती ऐकण्यात गुंगून गेले. 
   साधारण दोन वर्ष अकरा महिने व अठरा दिवस चाललेल्या भारतीय राज्यघटना निर्मीती प्रक्रियेदरम्यान घटना समितीमधील मतभेद, भारताचे सार्वभौमत्व जपणूक करण्यासाठी राज्याच्या तुलनेमधे केंद्राला अधिक अधिकार असावेत अशी बाबासाहेबांची आग्रही मागणी आणि त्या अनुषंगाने झालेल्या साधकबाधक चर्चा व निर्णय यांची सांगड घालून सुमारे साडेचार हजार जाती जमाती असलेल्या विविध चालीरीती, प्रथा परंपरा लाभलेल्या या खंडप्राय भारत देशाच्या विविधतेचा उल्लेख करून भारतीय म्हणून एका सूत्रात घटनेने बांधलेल्या महत्त्वाच्या तत्त्वाचा उल्लेख केला. त्यासाठी त्यांनी अमेरिकेच्या घटनेचा देखील समयोचित उल्लेख केला . यानंतर दुसरे वक्ते विश्वास कांबळे यांनी देखील भारतीय राज्य घटनेचे महत्त्व विशद करून तिची पायाभूत तत्वे मजबूत असल्याचे प्रतिपादन केले.

 कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या एडव्होकेट रूपाली अधाटे यांनी साध्या सोप्या भाषेत संविधानाचा अर्थ विशद केला त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या कायद्यांची माहिती सभागृहात करून दिली. यानंतर पोलीस अधिकारी विशाल माने यांनी आपल्या तडफदार व जोश पूर्ण भाषणात कार्यक्रमासाठी तरुणांची उपस्थिती कमी असल्याचे सांगत कार्यक्रमाला आजोबांच्या बरोबर नातू देखील असला पाहिजे, मुलगा देखील असला पाहिजे, महिला देखील असल्या पाहिजेत आणि संविधानाची माहिती, तसेच हक्क आणि कर्तव्य प्रत्येकाला असणे गरजेचे असे विषद करून सांगितले की, तरुणांच्या हातातच या देशाचे भवितव्य आहे. प्रसंगी ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश लखापते यांनीही आपले मत व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष दि. ना. चापके साहेब यांनी भारतीय राज्यघटनेच्या चार प्रमुख स्तंभाची माहिती सांगितली. त्यामध्ये उद्देशिकेला समोर ठेवूनच घटनेत बदल करता येतो. घटनेतील मूलभूत तत्व इतकेच मार्गदर्शक तत्वे देखील महत्त्वाची आहेत असे प्रतिपादित केले.

 या कार्यक्रमास सर्वश्री अण्णासाहेब टेकाळे, पांडुरंग क्षेत्रमाडे, अरविंद वाळवेकर, प्रभाकर गुमास्ते, अजय माढेकर, प्रवीण पाटील, महादेव देवळे, रणजीत दीक्षित, किरण देशपांडे , दत्ताराम आंब्रे, विजय सावंत ,दत्तात्रेय म्हात्रे, नंदलाल बॅनर्जी , लक्ष्मण गावडे, हिंदु राव, श्रीमती सीमा आगवणे, रूपाली माहुलकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने संविधानाची साक्षरता किती महत्त्वाची आहे हे अधोरेखित झाले.  
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथालयाचे सचिव सुनील आचरेकर यांनी अत्यंत सूत्रबद्धरित्या केले.अशा या "संविधान दिनाच्या " वैचारिक कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

प्रथम पुण्यस्मरण : कै.विष्णू शंकर पाटील

दोन ओळी बाबासाठी .... बाबा आमचे आधार स्तंभ हरवले .आज राहून राहून डोळ्यात पाणी येते .कोणालाही दुखवले नाहीत. नेहमीच हसत मुख जीवन जगलात ! नेहमी...