अलिबाग : शनिवार दि.२५ नोव्हेंबर रोजी सायं.०४:०० वाजताच्या सुमारास सुप्रसिद्ध साहित्यिक, जेष्ठ पत्रकार तसेच कोकण भूषण,अ.भा.स.चे अध्यक्ष श्री.कैलास पिंगळे सर यांच्या अलिबागमधील मुरुड तालुक्यातील मांडला येथील पिंगळे सिटीतील बांबू हाऊस रिसॉर्टमध्ये साहित्यिक, पत्रकार, कवी उमाजी केळुसकर यांच्या अध्यक्षतेखाली काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कवी संमेलनात ठाणे येथील सुप्रसिद्ध कवी, आगरी साहित्य शिरोमणी, समाजरत्न, साहित्य रत्न, गणेश वत्सल पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानीत तसेच 'धवलारीन...एक आगरी पुरोहित!' या पुस्तकाचे लेखक नवनाथ ठाकुर यांनी 'आईविणा घर खाली' या शीर्षकाची कवीता सादर करून सर्वांचे मन जिंकले. सदर कवी संमेलनात नवनाथ ठाकुर यांचा आगरी अग्रसेनचे संपादक, मराठी, हिन्दी व संस्कृत भाषेच्या व्याकरणाचे गाढा अभ्यासक, आगरी बोलीचे प्रेमी, सुप्रसिद्ध साहित्यिक माननीय चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.
सदर कवी संमेलनात पनवेल, कर्जत, कल्याण, ठाणे येथील ३० कवींनी सहभाग घेतला होता. सर्वांच्या आगरी बोलीतील,काहींच्या प्रमाणभाषेतील, विनोदी कविता, गझल, अष्टाक्षरी अशा विविध दर्जेदार कविता सादर करण्यात आल्या.
या काव्यसंमेलनासाठी अध्यक्षस्थानी साहित्यिक, पत्रकार, कवी उमाजी केळुसकर उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे नाट्य-चित्र अभिनेते शरद कोरडे, कवी-साहित्यिक चंद्रकांत पाटील, म.वा.म्हात्रे, सुजाता दांडेकर, आयोजक कैलास पिंगळे उपस्थित होते.
याप्रसंगी कवी चंद्रकांत पाटील यांनी काले 'आयोचे कुशीत' ही आगरी भाषेतील कविता, कवी मारुती बागडे यांनी 'आदिमातेची रुपे', कवी म.वा. म्हात्रे यांनी 'ईर्शाळवाडीचे संकट', कवी सुरेश भोपी यांनी 'आय माझी आगरी बोली', कवी नवनाथ ठाकूर यांनी 'आईविना घर खाली' , पां.शि. पाटील यांनी 'पलटी', कवी कैलास पिंगळे यांनी 'हिरवे रान', कवी मंगेश म्हात्रे 'आगरी प्रेम' ही आगरी भाषेतील गझल, कवी हरिश्चंद्र दळवी यांनी 'गावठाण', कवी राजेंद्र पाटील यांनी 'चिंधी ते सिंधूताई', कवी जयंत पाटील यांनी 'कनगा' ही कविता सदर केली. प्रमुख पाहुणे शरद कोरडे यांनी 'लावणी' सादर करुन उपस्थितांना मार्गदर्शन केले.
काव्यसंमेनाचे अध्यक्ष उमाजी केळुसकर यांनी उपस्थित कवींच्या कवितांचे रसग्रहण करुन आपल्या दोन कविता सादर केल्या. सौ.किमया कैलास पिंगळे आणि पिंगळे कुटुंबियांनी हे काव्यसंमेलन यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
आदर्श वार्ताहर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा