राष्ट्रीय केमिकल्स ऍण्ड फर्टिलायझर्स लि. मधील आरसीएफ सेवानिवृत्त कर्मचारी सोशल फोरम च्या कार्यकारीणी मंडळातील सदस्य वेळोवेळी कुठे ना कुठे धार्मिक स्थळे, गड किल्ले, निसर्गरम्य स्थळे, आदि ठिकाणी जाऊन पर्यटनाचा आनंद घेत असतात. तेथील अनुभूतीने प्रेरणा व ऊर्जा घेऊन येत असतात. असाच योग आला राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांची पुण्य कर्मभूमी रायगड या श्रद्धा स्थानाला भेट देण्याचा. तेथील पुण्यभूमीचे दर्शन व आशिर्वाद घेण्याचा. या रायगड परिक्रमेत सहभागी झाले होते सर्वश्री. व्हि. डी. पाटील, डी. टी. बारकुंड, प्रभाकरराव साळुंखे, बाळासाहेब शिंत्रे, विलास मेहता व सुभाष हांडे देशमुख.
खरे तर फोरमच्या कार्यकारिणी मंडळातील वय वर्ष ८० ला स्पर्श करत असलेले सदस्य सी. एल. शर्मा व श्री. शक्तीचंद यांना रायगड पुण्यभूमी व तेथील आकाशाला भिडणारी गडकोटाची भव्यता पाहायची प्रबळ इच्छा होती त्यासाठी या रायगड दर्शनचे आयोजन केले होते. पण तब्येतीच्या अस्वास्थ्यामुळे ऐनवेळी त्यांना व सुबोध मोरजकर यांना सहभागी होता आले नाही. त्यांची उणीव आम्हाला अगदी परतीच्या प्रवासाच्यावेळीही सातत्याने जाणवत राहिली.
ठरल्याप्रमाणे दिनांक २४ नोव्हेंबरला आम्ही सकाळी दहा वाजता वाशी येथून बाळासाहेब शिंत्रे यांच्या प्रशस्त अशा चार चाकी वाहनातून निघालो. विलास मेहता हेही चालक असल्याने आणि ते बरोबर असल्यामुळे एवढ्या लांबच्या प्रवासाची काळजी नव्हती. जाताना तीर्थक्षेत्र पाली येथे श्री गणरायाचे दर्शन घेतले. तेथेच दुपारी देवस्थानात महाप्रसाद घेतला आणि पालीतील सोलकढीचा स्वाद घेऊन पुढील प्रवासास निघालो. श्री. बारकुंड साहेब पुण्याहून निघून माणगावला उतरणार होते. व्ही. डी. पाटील यांनी आम्ही वाशीहून निघण्याची वेळ आणि बारकुंड साहेबांच्या संपर्कात राहून पुण्याहून त्यांची प्रवासासाठी निघण्याची वेळ याचे आयोजन बरोबर केल्याने माणगावला आम्ही सर्व एकत्र वेळेवर येऊन भेटलो आणि पाचाडकडे रवाना झालो. रघुवीर देशमुख यांनी पाचाड येथे त्यांच्या हॉटेलमध्ये आमची राहण्याची सोय केलेली होती. पाचाड येथे हॉटेलवर जातानाच जिजाऊमातेच्या समाधी मंदिराचे प्रथम दर्शन घेतले.दिनांक २५ नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजता उठून, सर्व शारीरिक क्रिया उरकून आम्ही गडाच्या पायथ्याशी रोप वे जवळ गेलो. फारशी गर्दी नसल्याने अपेक्षेपेक्षा लवकर रोपवेने गडावर पोहोचलो.
खरे तर ! रायगड किल्ल्याचा इतिहास प्रत्येकाने वाचलेला असतो. बहुतेक वेळा इतर मित्रमंडळींबरोबर तेथे जाणेही झालेले असते. पण रायगड हे असे श्रद्धास्थान आहे की, तेथे कितीही वेळा गेले तरी मन भरत नाही. पुन्हा पुन्हा तेथे जेव्हा जेव्हा जाणं होतं, तेव्हा तेव्हा तेथील स्थळांचं नवीन दर्शन घडतं. नाविन्यपूर्ण विचार मनात येतात. रायगडावरील घडलेल्या विविध घटनांबाबत प्रेमाच्या भावना अधिक जागृत होतात. अधिक चौकस झाल्याने त्या प्रगल्भ होत जातात. आमचेही काहीसे तसेच झाले. गडावरील सकारात्मक वातावरणाने आणि मनात आलेल्या अनेक विचारांनी प्रत्येक जण भावनिक होऊन प्रत्येक ठिकाण अगदी जाणीवेणे पाहण्यात मग्न झाला.
रायगड दर्शनाच्या सुरुवातीलाच आम्हाला रायगडच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडी येथील सखाराम औकीकर हा गडाचे सखोल ज्ञान असलेला वाटाड्या मिळाला. त्याने गडावर प्रवेश करतानाच प्रथम लागणारा मेणा दरवाजापासून माहिती देण्यास सुरुवात केली. राणी महल, पालखी दरवाजा, धान्याचे कोठार, राजवाडा, सचिवालय, सप्तमनोरे, खलबतखाना, राजांचा दरबार, सिंहासन, नगारखाना, महाराजांची मूर्ती, होळीचा माळ, शिरकाई देवीचे मंदिर, बाजारपेठ, नागप्पा शेट्टीचा सिम्बॉल, हत्तीखाना, टकमक टोक, हिरकणी बुरुंज, गंगासागर तलाव, जगदीश्वरांचे मंदिर, राजांची समाधी, गडाचे प्रमुख रचनाकार हिरोजी इंदुलकर यांची सेवेची पायरी, वाघ्या श्वानाची समाधी इत्यादी ठिकाणाचे सखोलपणे विश्लेषण करुन सांगितले.
या सर्वात प्रामुख्याने एक महत्त्वाची माहिती मिळाली ती म्हणजे, असं म्हटलं जातं की इतिहास बोलत नाही तेव्हा भूगोल बोलतो आणि भूगोल बोलत नाही तेव्हा विज्ञान बोलते. हाच धागा पकडून गड निर्मितीकार श्री. इंदुलकर यांनी सायफन पद्धतीने गडावरील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कशी व्यवस्था केली होती आणि तळ्यांमध्ये पाण्याची साठवण कशी केली जायची याची माहिती सखारामने छान पैकी दिली... टाकी तलाव खोदले. उतरत्या भागाला तटबंदी बांधली आणि तलाव निर्माण झाला. आजची पाणी आडवा पाणी जिरवा ही योजना त्याकाळी राबवली गेली याच कौतुकच. पुस्तकातून वाचन वेगळं आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन ती व्यवस्था पाहणं वेगळं याची प्रखर जाणीव हे पाहताना झाली. शिवरायांच्या पुण्यभूमीला त्रिवार वंदन करुन आणि तेथील भूमीची माती कपाळाला लावून आम्ही आनंदी आणि समाधानाने इतिहासाच्या अनेक आठवणी जागवत परतीच्या प्रवासाला लागलो.
म्हणूनच कोणी कवीने लिहिलेले बोल आठवतात, *रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, हीच आम्हाला माणिक मोती दुसरी दौलत नाही*.
-सुभाष हांडे देशमुख
नेरुळ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा