एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकापर्यंत महिलावर्ग हा समाजातील दुर्लक्षित घटक होता. चूल आणि मूल ही दोनच क्षेत्र तिच्याकरिता उपलब्ध होती. रांधा, वाढा, उष्टी काढा व घराला वारस देणे यापुरतेच तिचे आयुष्य सीमित होते. तिची हौस-मौज तिच्या आवडी-निवडी याबद्दल तिला बोलण्याची परवानगी नसायची. स्त्रीसुलभ नटणे-मुरडणे ही केवळ अशक्य गोष्ट होती. पण विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात या गोष्टी बदलण्याचे हळूहळू संकेत मिळू लागले. त्या काळातील रमाबाई रानडे, सावित्रीबाई फुले सारख्या कित्येक महिलांनी पतीच्या मदतीने समाजाला सर्वसमावेशक उन्नतीसाठी एक वेगळा विचार देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पुरुषवर्गाविरुद्ध बंडाचे निशाण दाखविण्याऐवजी पुरुषवर्गाच्या मदतीने महिलावर्गाची प्रगती / उन्नती करण्याचा मानस मनी बाळगला. त्याकाळच्या तथाकथित पठडीतून त्यांनी समाजाला बाहेर काढून उन्नतीचा मार्ग दाखविण्याचा प्रयत्न केला. मुलगी शिकली तर संपूर्ण घर शिकते ही उक्ती त्यांनी महिलांना समजावून सांगितली. इंग्रजांच्या दबावाखाली भारतीय जनता कशी अस्तित्वहीन झाली आहे याची जाणीव करून देण्याचे काम रमाबाई रानडे, सावित्रीबाई फुले सारख्या कित्येक महिलांनी मनापासून केले. पण त्याचबरोबर शिक्षणामुळे विचार करण्याचा कक्षा रुंदावत असल्यामुळे शिकलेली मुलगी / महिला नुसत्या आपल्या घराचाच विचार न करता आपल्या समाजातील इतर घटकांचा विचारही करते. काही मुलींनी लहानपणापासून पोलीस दलात, नौदलात, हवाईदलात, भूदलात इत्यादी वेगवेगळ्या सेवा दलात आपली वर्णी लागावी म्हणून प्रयत्न करून त्या आपले स्वप्न अस्तित्वात आणतातच पण इतर मुलींसमोर आदर्शही ठेवतात. अशा मुलींकडून उत्तेजन घेऊन बाकीच्या मुली हे स्वप्न पहातात व ते अस्तित्वात आणण्यासाठी धडपडतात तसेच भारतीय अंतराळ संशोधन या संस्थेच्या चांद्रयान-२ तसेच मंगळयान या महत्वाकांक्षी प्रकल्पात महिला वैज्ञनिकांनी महत्त्वाचा वाटा उचलून भारतीय महिलांचे स्थान उंचावले आहे. मंगळ तसेच चंद्र या ग्रहावरील छायाचित्रे प्रसारित करून सकल विश्वातील मानव वर्गाची एकप्रकारची सेवा करून भारताचे नाव जगात दुमदुमत ठेवले आहे. यावरून एक लक्षात येते की संशोधन क्षेत्रातही महिला आघाडीवर राहून यशस्वी होत आहेत.
सामाजिक उन्नतीमध्ये महिलांचे योगदान आहे याचे उत्तर 'होय' असेच आहे. हा तिच्यात झालेला बदल हा सकारात्मक आहे का नकारात्मक ही गोष्ट सर्वस्वी तिच्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून महिला स्वतःहून समाजाच्या प्रगतीसाठी / उन्नतीसाठी निःस्वार्थपणे काम करीत आहेत. राणी बंग, साधनाताई आमटे तसेच नुकत्याच निवर्तलेल्या सिंधुताई सपकाळ इत्यादी महिलांनी शहरातील विकासापासून कोसो दूर असलेल्या अतिदुर्बल / आदिवासी समाजाला त्यांनी विकसित करण्याचा चंग बांधला. या दुर्लक्षित घटकातील कित्येक जणांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नैपुण्य सिद्ध करून संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे वेधले. अर्थात या यशात त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या महिलांचा वाटादेखील तेव्हढाच महत्त्वाचा आहे. या महिलांनी समाज उन्नतीचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे मेहनत घेऊन काम करण्यास सुरूवात केली. या महिलांचे कौतुक अशासाठी वाटते की स्त्री सुलभ नटण्या-मुरडण्याला मुरड घालून आपले अवघे आयुष्य त्यांनी समाज उन्नती करिता वेचले. विवाहानंतर हौस-मौज करण्याच्या काळात त्यांनी वंचितांचे अश्रू पुसण्यात त्यांनी इतिकर्तव्यता मानली. महिला मुक्ती संघटना सारख्या संघटना आज महिलांच्यामागे सक्षमपणे उभ्या आहेत. महिलांच्या कोणत्याही प्रश्नांच्या / समस्यांच्या खोलात जाऊन त्याची उकल करण्याची ताकद महिलांनी स्वतःच्यात निर्माण केली आहे. ती समस्या कायदेशीर / कौटुंबिक / सामाजिक अथवा इतर कोणत्याही स्वरूपाची असो पण या महिला संघटना हिरीरीने त्या महिलेच्या मागे उभ्या राहतात. अनाथ व वंचित मुला-मुलींवर मायेचे छत्र धरणाऱ्या सिंधुताई सपकाळ सारख्या महिलांनी आईचे प्रेम ही दिले. त्यांनी या मुलांना आसरा मिळावा व त्यांचे संरक्षण ही व्हावे म्हणून लोकांच्या मदतीने त्यांनी त्या मुलांसाठी आश्रमाची निर्मिती केली. हे सर्व समाजकार्य करीत असतांना या सर्व महिलांनी शिक्षणाचे महत्त्वही ओळखले होते. ताराबाई मोडक, अनुताई वाघ इत्यादी महिलांनी शिक्षणाची पायाभरणी केली. शिक्षण किती महत्त्वाचे आहे याची जाणीव त्यांनी या मुलांना करून दिली व त्याचबरोबर त्यांच्यावर शिक्षणाचे संस्कार करून त्यांच्या मनात शिक्षणाबद्दल आस्था निर्माण करून शिक्षण घेण्यास भाग पाडले. शिक्षण घेतल्यावर साहजिकच ही मुले / मुली आपापल्या पायावर उभी राहू शकली. यातीलच काही मुले विविध आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारताचे नाव दुमदुमत ठेवीत आहेत. राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान, मुख्यमंत्री, लोकसभा अध्यक्ष, खासदार, आमदार पासून ते गावातील सरपंच अशा विविध पदांची आपल्या देशाच्या महिलांनी यशस्वीपणे धुरा सांभाळली आहे. आपला असा वेगळा ठसा उमटविला आहे. काही महिला आपल्या विद्वत्तेच्या / तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर विविध राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय संस्थात मोठ्या पदावर / प्रमुखपदी विराजमान होऊन आपल्या भारत देशाची अस्मिता उंचावली आहे.
महिलांनी विधी व कायदा यासारख्या किचकट क्षेत्रातही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. महिला विषयक वेगवेगळ्या प्रश्नांना व समस्यांना कायदेशीर मार्गाने लोकांसमोर आणून त्याची दखल शासनाने घ्यावी यासाठी अतोनात मेहनत घेतली. त्यामुळे फायदा असा झाला की आपल्या मूलभूत व न्याय हक्कासाठी जागरूकपणे लढण्याचे बळ आजच्या महिलांच्या मनात संघटित झाल्यामुळे निर्माण झाले आहे. त्याचबरोबर महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा या भावनेनें एकत्र येऊन महिलांच्या कायदेशीर हक्कांसाठी सरकारकडे दाद मागितली व आपल्या संघशक्तीची ताकद दाखविली. त्याला अनुसरून सरकारने कायद्यात बदल तर केलाच व त्याचा परिणाम म्हणजे सरकारने महिलांसाठीच्या आरक्षणाचा कायदा विधी मंडळाकडून संमत करून घेतला. अगदी विसावे शतक संपेपर्यंत भारतासारख्या विशाल लोकशाहीत महिलांचा सहभाग अतिशय अल्प होता. पण नंतर महिलांचे हक्क मिळावेत म्हणून त्यांनी शासनाशी कायदेशीर मार्गाने लढा सुरू केला. या लढ्याचा परिपाक म्हणून सरकारला महिलांसाठी कायद्यात बदल करावा लागला. त्याचबरोबर महिलांचे हक्क तसेच त्यांच्या न्याय संरक्षणासाठी कायदेही अस्तित्वात आणले. आजच्या घडीला लोकशाहीत महिलांसाठी विविध क्षेत्रात काही जागा मुद्दाम राखीव ठेवण्यात आल्या आहेत जेणेकरून त्या सर्व महिलांचे प्रश्न / समस्या हिरीरीने तसेच विस्तृतपणे मांडू शकतील. या कायद्यांमुळे समस्त महिला वर्गाला कायद्याचे सर्वंकष संरक्षण मिळाले. एव्हढेच नव्हे तर महिलांच्या प्रश्नांसाठी तसेच समस्यांकडे अगदी विस्तृतपणे पाहून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने वेगळ्या मंत्रालयाची स्थापना केली व ते म्हणजे 'महिला व बाल विकास मंत्रालय'. या मंत्रालयासाठी एका केंद्रीय दर्जाचे मंत्रिपद पद निर्माण केले. साधारणतः या मंत्रिपदावर महिलाच विराजमान असते. संसदेत चर्चिल्या जाणाऱ्या प्रत्येक महिलांविषयक प्रश्नांवर या मंत्रालयाशी प्रथम चर्चा केली जाते. एखादे महिलांविषयक धोरण अथवा विधेयक संसदेत मांडायचे असेल तर या मंत्रालयाचा मंत्रीच ते काम करू शकतो / शकते. कामाच्या ठिकाणी महिलांना होणाऱ्या विविध प्रकारच्या त्रासाला / अत्याचाराला वाचा फोडून सरकारी यंत्रणेला या बाबतीत लक्ष घालण्यास प्रवृत्त केले. परराष्ट्रीय मंत्रालय / अर्थ मंत्रालय / संरक्षण मंत्रालय या सारख्या जोखमीच्या व संवेदनशील मंत्रालयातही महिलांनी आपला असा वेगळा ठसा उमटविला आहे. तसेच आपल्या तिन्हीही संरक्षण दलात / सीमेवर दक्ष असणाऱ्या दलात महिलांची संख्या डोळ्यात भरणारी आहे. स्वातंत्र्यलढ्यातही महिलांनी आपला सहभाग अधोरेखित केला आहे. काही महिला स्वातंत्र्यलढ्यात आघाडीच्या फळीत होत्या तर काही महिला मागे राहून आघाडीवरील स्वातंत्र्यवीरांना लागेल ती मदत करीत होत्या. या सर्व बाबतीत महिला असल्याची सबब पुढे न करता फक्त आणि फक्त आपल्या देशाचा विचार केला.
गेल्या काही वर्षांपासून दहीहंडीसारख्या पुरुषप्रधान साहसी सणांचा आनंद आता महिलाही घेऊ लागल्या आहेत. खूप ठिकाणी दहीहंडी महिला मंडळाची स्थापना झाली आहे तर काही दहीहंडी मंडळांनी महिलांना उत्तेजन देण्यासाठी महिला पथक स्थापन केले आहे. विशेष म्हणजे या पथकात एकही पुरूष नसतो. कोणी महिला पडत असेल तर तिला सावरण्याचे काम महिलाच करतात. त्यामुळे महिलांना या सणाचा आनंद तर उपभोगता येतो पण त्याच बरोबर इतर महिलांना पण या साहसी खेळाचे आकर्षण वाटू लागते. त्यामुळे साहसी खेळाची नवीन पिढी आकार घेऊ लागते व त्यामुळे अशा तयार झालेल्या महिला साहसी / ताकदीच्या / चलाखीच्या विविध खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करू शकतात त्यामुळे गेल्या दोन दशकांपासून भारतीय महिला विविध खेळात भारताचे प्रतिनिधित्व तर करतातच व त्याचबरोबर यशस्वीही होतात. याचा परिपाक म्हणजे विविध प्रकारच्या खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुलींचे / महिलांचे प्रमाण लक्षणीय झाले आहे. निरनिराळ्या एकल तसेच सांघिक राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय खेळात महिलांनी / मुलींनी आपली नाममुद्रा उमटविली असून विविध खेळात भारताची दखल घेण्यास भाग पाडले. क्रिकेट, बॅडमिंटन इत्यादी सारख्या मैदानी खेळाप्रमाणेच बुद्धिबळ, ब्रिज इत्यादी सारख्या खेळातही मेहनतीने प्राविण्य मिळवून भारताचा दबदबा निर्माण केला आहे. मानवी रक्तदानासारख्या श्रेष्ठ दानात सुहासिनी मुळगावकर सारख्या महिलांनी पुढाकार घेऊन रक्तदानाचे महत्त्व समाजाला समजावून सांगतांना हे ही पटवून दिले की मानवी रक्त कोणत्याही कारखान्यात बनविता येत नाही. याचा फायदा असा झाला की जनता स्वयंस्फूर्तीने रक्तदानास पुढे येऊ लागली व त्याचा फायदा अव्याहतपणे भारताला होईल याबद्दल शंका नाही.
शेवटी असे सांगता येईल की जवळपास प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने आपला असा वेगळा ठसा उमटविला आहे. मेहनत आणि एकाग्रता याच्या जोरावर भारतीय महिलांनी जवळ जवळ प्रत्येक क्षेत्रात यशस्वी मुसंडी मारली आहे.
-मिलिंद कल्याणकर
नेरुळ, नवी मुंबई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा