आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, १२ ऑगस्ट, २०२६

फक्त रात्रशाळा शिक्षकाचा प्रवास टपाल तिकीटावर उमटला ; "प्रा. नागेश हुलवळे यांच्या बहुआयामी कार्याची दखल"

अहिल्यानगर जिल्हाच्या अकोले तालुक्यातील जांभळे या छोट्याशा गावातील प्रा. नागेश हुलवळे यांचा भारतीय डाक विभागाने 'माय स्टॅम्प' योजनेअंतर्गत टपाल तिकीटावर फोटो छापून आगळावेगळा गौरव केला आहे. प्रा. नागेश सोपान हुलवळे हे मुंबईत फक्त रात्रशाळेतील शिक्षक म्हणून साधी ओळख जपणारे व्यक्तिमत्त्व आहे. मात्र शिक्षणासोबतच त्यांनी साहित्य, पत्रकारिता, संपादन, अनुवाद आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. रात्रशाळेतील शिक्षकांच्या कार्याला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने विविध उपक्रम राबविले आहेत.
        या बहुआयामी कार्याची दखल घेत ‘माय स्टॅम्प’वर त्यांचे छायाचित्र झळकणे हा त्यांच्या कार्यप्रवासातील एक आगळावेगळा आणि संस्मरणीय क्षण ठरला आहे. ही केवळ एका व्यक्तीच्या छायाचित्राची टपाल तिकिटावर झालेली नोंद नसून त्यांच्या कार्यप्रवासाची स्मृती आहे. रात्रशाळेतील शिक्षकही व्यापक सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक परिवर्तन घडवू शकतो, हा प्रेरणादायी संदेश या सन्मानातून मिळतो. म्हणूनच ‘माय स्टॅम्प’ योजना प्रा. नागेश हुलवळे सरांना त्यांच्या बहुआयामी कार्याची आणि सातत्यपूर्ण योगदानाची दखल घ्यावी लागली. या उपक्रमासाठी डॉ. सुधीर तारे यांच्या पाठपुराव्यामुळे प्रा. हुलवळे यांच्या कार्याचा गौरव भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून झाला.
       वर्ल्ड व्हिजन संस्थेच्या माध्यमातून साहित्यिक आणि नवोदित लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्याचे काम त्यांनी केले. ‘वर्ल्ड व्हिजन टाइम्स’च्या माध्यमातून साहित्य आणि समाजप्रबोधनाची चळवळ पुढे नेली. ‘पृथ्वी संघराज्य संविधान’चा मराठी अनुवाद करून त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी भाषेचे प्रतिनिधित्व केले. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन, कार्यशाळा आणि विविध उपक्रम त्यांनी सातत्याने आयोजित केले. रात्रशाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र साहित्यिक व शैक्षणिक व्यासपीठ निर्माण केले. कविसंमेलने, व्याख्यानमाला, साहित्यिक कार्यशाळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
    संपादक म्हणून त्यांनी अनेक लेखक, कवी आणि साहित्यिकांच्या लेखनाला प्रसिद्धी मिळवून दिली. पत्रकारिता आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सामाजिक व शैक्षणिक विषय मांडण्याचे कार्यही त्यांनी केले आहे. त्यांच्या कार्याला विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून, कार्यातील सातत्य, सामाजिक बांधिलकी आणि साहित्यसेवा यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. प्रा. नागेश हुलवळे सर यांच्यावर समाजाच्या सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फक्त रात्रशाळा शिक्षकाचा प्रवास टपाल तिकीटावर उमटला ; "प्रा. नागेश हुलवळे यांच्या बहुआयामी कार्याची दखल"

अहिल्यानगर जिल्हाच्या अकोले तालुक्यातील जांभळे या छोट्याशा गावातील प्रा. नागेश हुलवळे यांचा भारतीय डाक विभागाने 'माय स्टॅम्प...