अलिबाग :- दि.22 व 23 जुलै 2021 रोजी महाड तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या महापूरामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली होती. त्यानुषंगाने झालेल्या नुकसानीमधील महाड शहर व ग्रामीण भागातील दुकानदार, टपरीधारक, हातगाडीधारक यांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून त्यांची संख्या व दुकारनदार, टपरीधारक, हातगाडीधारक यांना अनुदानाचे वितरण करण्यात आले असून ते पुढीलप्रमाणे आहे:
दुकानांच्या पंचनाम्यानुसार लाभार्थी संख्या 3 हजार 962 असून वाटप लाभार्थीं संख्या - 3 हजार 93 असून त्यांना 14 कोटी 84 लाख 31 हजार 851 रु.चे अनुदान वाटप करण्यात आले आहे. तर 869 लाभार्थी शिल्लक आहेत.
टपरी शेडच्या पंचनाम्यानुसार लाभार्थी संख्या 304 असून वाटप लाभार्थीं संख्या- 51 असून त्यांना 3 लाख 77 हजार 250 रु.चे अनुदान वाटप करण्यात आले आहे. तर 253 लाभार्थी शिल्लक आहेत.
हातगाडीधारकांच्या पंचनाम्यानुसार लाभार्थी संख्या 180 असून वाटप लाभार्थीं संख्या- 126 असून त्यांना 11 लाख 38 हजार 825 रु.चे अनुदान वाटप करण्यात आले आहे. तर 54 लाभार्थी शिल्लक आहेत, असे एकूण पंचनाम्यानुसार लाभार्थी संख्या 4 हजार 446 असून वाटप लाभार्थीं संख्या 3 हजार 270 असून त्यांना 14 कोटी 99 लाख 47 हजार 926 रु.चे अनुदान वाटप करण्यात आले आहे. तर 1 हजार 176 लाभार्थी शिल्लक आहेत.
दि.11 ऑगस्ट व दि.17 नोव्हेंबर 2021 च्या शासन निर्णयामध्ये नमूद कोणतेही पुरावे कार्यालयात जमा न केल्यामुळे उर्वरित अनुदान वाटप करण्याचे प्रलंबित आहे.
दुकानदारांच्या अनुदान वाटपास शिल्लक लाभार्थी एकूण संख्या- 869 यांची यादी महाड तहसिल कार्यालय, नगर परिषद, पंचायत समिती व संबंधित ग्रामपंचायत येथे नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
या दुकानदारांनी शासन निर्णय दि.11 ऑगस्ट व दि.17 नोव्हेंबर 2021 मध्ये नमूद दुकानाच्या नोंदणीकृत असल्याचे पुरावे (महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 1948 अंतर्गत) पुरावे व स्थानिक रहिवाशीबाबत स्थानिक रेशनकार्ड व स्थानिक मतदारयादीत नाव (मतदान कार्ड) दि.15 जानेवारी 2022 पर्यंत तहसिल कार्यालयात जमा करावेत.
हातगाडीधारक व टपरीधारक अनुदान वाटपास शिल्लक लाभार्थी एकूण संख्या 307 यांची यादीदेखील महाड तहसिल कार्यालय, नगर परिषद, पंचायत समिती व संबंधित ग्रामपंचायत येथे नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. संबंधित आपद्ग्रस्तांनी शासन निर्णय दि.11 ऑगस्ट व दि.17 नोव्हेंबर 2021 मध्ये नमूद नोंदणीकृत व परवानाधारक असल्याचे पुरावे दि.15 जानेवारी 2022 पर्यंत तहसिल कार्यालय, महाड येथे जमा करावेत.
नोंदणीधारक व परवानाधारक नसल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत स्थानिक कर, दैनंदिन कर, भू-भाडे भरत असल्याबाबतचा दाखला तहसिल कार्यालयात जमा करावा, असे स्थानिक प्रशासनाने कळविले आहे.
अनुदान वाटप शिल्लक राहिलेल्या दुकानदार, हातगाडीधारक व टपरीधारक लाभार्थ्यांनी नमूद पुरावे तहसिल कार्यालयामध्ये दि.15 जानेवारी 2022 पर्यंत विहित मुदतीत जमा न केल्यास शासन प्राप्त अनुदान शासन जमा करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही तहसिलदार महाड सुरेश काशिद यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा