आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, ४ जानेवारी, २०२२

नागरिकांचे प्रबोधन करून कोविड लसीकरणास गती द्यावी - पालकमंत्री कु.आदिती तटकरे

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 उपाययोजनांबाबत आढावा बैठक संपन्न

अलिबाग:- कोविड-19 बाबत परिस्थिती गंभीर होत आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांचे प्रबोधन करून कोविड चाचण्या वाढवाव्यात व कोविड लसीकरण मोहीम अधिक गतीने राबवावी, अशा सूचना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.

     जिल्ह्यातील कोविड-19 परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज ऑनलाईन बैठक संपन्न झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.अशोक दुधे, पनवेल महानगरपालिका आयुक्त श्री.गणेश देशमुख, अपर जिल्हाधिकारी श्री.अमोल यादव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, तहसिलदार श्री.विशाल दौंडकर, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, आदि उपस्थित होते.

     पालकमंत्री कु.तटकरे पुढे म्हणाल्या की, ज्या नागरिकांनी कोविड लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना कोविड झाल्यानंतरही कोविडची सौम्य लक्षणे असल्याचे आढळले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व आरोग्य सुविधा अद्ययावत ठेवाव्यात व लसीकरण मोहिमेला गती देणे महत्वाचे आहे. लसीकरणाला गती देण्यासाठी इतर काही जिल्ह्यांप्रमाणे कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच शासकीय कार्यालयात प्रवेश देण्यात येईल. अन्यथा त्यास प्रवेश नाकारला जाईल. तसेच लस न घेणाऱ्या नागरिकांचे प्रबोधन करून त्यांचे लसीकरण करून घ्यावे.

     जिल्ह्यात अजूनही काही जणांनी कोविड लस घेतलेली नाही. त्यामुळे लस न घेतलेल्या नागरिकांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. नागरिकांनी कोविड अनुरूप वर्तनाचे पालन न केल्यास पोलिस प्रशासनाने दंडात्मक कारवाई करावी. त्याचप्रमाणे दि.10 जानेवारी 2022 पासून फ्रंटलाईन वर्कर्स, हेल्थ केअर वर्कर्स यांना बुस्टर डोस देण्यास प्रारंभ करणार आहोत. त्याकरिता लवकरात लवकर बुस्टर डोससाठी नोंदणी सुरू करण्याची गरज आहे, असेही पालकमंत्री कु.आदिती तटकरे यावेळी म्हणाल्या.

     त्या पुढे म्हणाल्या, सध्याची जिल्ह्यातील करोनाची वाढती रूग्णसंख्या पाहता जर शाळा बंद करण्याची गरज भासली तर दि.31 जानेवारी 2022 पर्यंत 1 ते 9 वीचे वर्ग बंद करण्याबाबत लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल. 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींचे कोविड लसीकरण सध्या सुरू असून शाळा बंद करण्याचा निर्णय झाल्यास त्यांचे लसीकरण शाळेतच करण्यात येईल. कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम शंभर टक्के पूर्ण व्हावी, याकरिता लसीकरणाचा वेग वाढवावा. पूर्वतयारी म्हणून ऑक्सिजन व बेड्सची उपलब्धता ठेवावी.

     यावेळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर म्हणाले की, करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची तीव्रता जास्त आहे. रायगड जिल्ह्यात मागील काही दिवसांत करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेषत: पनवेल, उरण आणि खालापूर या भागातील परिस्थिती चिंताजनक आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. तसेच उपचारांच्या सुविधांसोबतच प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरदेखील भर देण्यात येत आहे. नागरिकांच्या कोविड लसीकरणाला वेग देण्यासाठीही जिल्हा प्रशासनामार्फत अथक प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्ह्यातील करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, महाविद्यालयांची वसतिगृहे रिकामी करावीत, अशी विनंतीवजा मागणी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री श्री.उदय सामंत यांच्याकडे केलेली आहे. तसेच सर्व प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी-कर्मचारी व अभ्यागतांची रॅपिड अँटीजन चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जिल्ह्यात कोविडच्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. तसेच सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी आपापल्या तालुक्यात नागरिकांना लस घेण्यासाठी आवाहन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

     गृह विलगीकरणात असलेल्या नागरिकांनी कोणत्याही परिस्थीतीत विलगीकरणाच्या नियमांचा भंग करू नयेत. तसेच काही भाजीपाला विक्रेते, दुकानदार हे ग्राहक असताना मास्कचा वापर करीत नाहीत, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे यापुढे मास्क न वापरणाऱ्या संबंधित व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर म्हणाले.

     मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येत असलेल्या कोविड प्रतिबंधक उपाययोजनांची तर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.अशोक दुधे यांनी पोलीस विभागाकडून करण्यात येत असलेल्या कोविड प्रतिबंधक कारवाईबाबतची सविस्तर माहिती पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांना दिली.

     बैठकीच्या सुरूवातीला पालकमंत्री महोदयांना तहसिलदार श्री.विशाल दौंडकर यांनी जिल्ह्यातील कोविड परिस्थितीची संगणकीय सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. तसेच प्रत्येक उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्य क्षेत्रातील कोविड लसीकरण, कोविड-19 बाबत प्रतिबंधक उपाययोजनांच्या तयारीबाबतचा आढावा सादर केला.

     शेवटी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी नागरिकांना आवाहन केले की, नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःची व आपल्या परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. ज्या नागरिकांनी अद्याप कोविड लसीचा पहिला अथवा दुसरा डोस घेतलेला नाही त्यांनी त्वरीत डोस घ्यावा. मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, हात धुणे या करोना त्रिसूत्रीचा अवलंब करून करोनाला रोखण्यासाठी कोविड अनुरूप वर्तनाचे काटेकोरपणे पालन करावे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आदिवासी पाड्यावर बालदिन साजरा

मुंबई: कांजूरमार्ग पूर्व येथील एक सेवाभावी संस्था यांच्या वतीने पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांमध्ये जागतिक बालदिन साजरा केला ...