अलिबाग:- करोना विषाणूचा ओमायक्रॉन प्रकार आता जगभरात गेल्या काही दिवसांमध्ये सर्वात वेगाने पसरणारा प्रकार म्हणून समोर आला आहे. राज्यात कोविड-19 ची प्रकरणेही वाढू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाचा तळमजला येथे आज कोविड-19 हेल्पलाईन कक्ष सुरु करण्यात आला असून त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या कक्षातून 9404815218, 9421852218, 9423712218, 8275544218 या हेल्पलाईन क्रमांकाद्वारे नागरिकांना कोविड बेड व्यवस्थापन व कोविड-19 बाबत जिल्हा प्रशासनाकडून माहिती देण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.अशोक दुधे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव म्हस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे, पनवेल प्रांताधिकारी श्री.राहुल मुंडके, तहसिलदार श्री.विशाल दौंडकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री.सागर पाठक, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.गजानन गुंजकर हे उपस्थित होते.
जिल्ह्याच्या दि.4 जानेवारी 2022 च्या कोविड अहवालानुसार जिल्ह्यात विद्यमान रुग्ण 1 हजार 890 असून 702 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने परिस्थिती निश्चितच चिंताजनक बनत चालली आहे. याकरिता जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी तात्काळ औषधोपचाराबरोबरच कोविड लसीकरण, ॲन्टिजन व आरटीपीसीआर टेस्ट करुन घेणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांना बेड व्यवस्थापन व कोविड-19 बाबत जिल्हा प्रशासनाकडून मदत मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा तळमजला येथे कोविड-19 हेल्पलाईन कक्ष सुरु करण्याचे संबंधितांना निर्देश दिले होते. त्यानुसार आज हा कोविड-19 हेल्पलाईन कक्ष सुरु करण्यात आला आहे.
याशिवाय जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांनी या कक्षातच रॅपिड ॲन्टिजन टेस्टची सुविधा सुरु करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांना दिले आहेत.
कोविडच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, कोविड अनुरुप वर्तनाचे काटेकोर पालन करावे, कायम मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सामाजिक अंतर पाळावे, आगामी काळात लग्नसराई किंवा इतर कार्यक्रम, सण साजरे करण्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने एकत्र येवू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा