आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २६ सप्टेंबर, २०२१

इ-पिकपहाणी नोदणी अॅपमध्ये मत्स्यशेतीचा पर्याय नसल्याने मत्स्यशेतकरी चिंतेत...

वढाव वार्ताहर (प्रकाश माळी) - :शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा पिक पेरा स्वतःच नोंदवण्यासाठी शासनाने इ-पिकपहाणी अॅपच्या माध्यमांतुन पिकपहाणी नोंदवण्याचे आवाहन केले असतांनाच या अॅपमध्ये असणाऱ्या त्रुटी व हा अॅप वापरण्याचे अज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यामध्ये असल्याने मोठा शेतकरी वर्ग  पिकपहाणी नोंदणी पासून वंचित रहाण्याची शक्यता आहे. पेण तालुक्यांतच जवळ-जवळ विस हजार शेतकरी प्रत्यक्ष लागवड करीत आहेत. शासनाने शेतकऱ्यांना पिकपहाणीच्या नोंदीचे आवाहन करूनही व पिकपहाणी नोंदीसाठी मुदतवाढ देवूनही तालुक्यांत आज पर्यन्त फक्त पाच  टक्केच्याच आसपास पिकपहाणीच्या नोंदी शासनाने केल्या आहेत. याचे कारण म्हणजे कित्येक शेतकऱ्यांकडे अन्ड्रॉईड मोबाईल नाहीत, मोबाईल असलेल्यांना  देखील ई -पीक पहाणी अॅपव्दारे आपल्या  स्वतःच्या पिक पेऱ्याची माहिती व इत्तर माहीती भरण्याचे काम करता येत नाही, बहुसंख्य शेतकऱ्यांना अन्ड्रॉईड मोबाईल वापरताही येत नाही. महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांनी करावयाचे पिकपहाणी नोंदीचे कामं शेतकऱ्यांनी करण्यासाठीचा सरकारने घेतलेला हा निर्णय, शेतकऱ्यांना पेलणारा नाही, तो शेतकऱ्यांना नुकसान दायी ठरू शकतो. पिकपहाणी झाली पाहीजे, पिकपहाणीच्या नोंदी वेळच्यावेळी होणे तितकेच गरजेचे आणि  आवश्यक आहे, मात्र हे काम शेतकऱ्यांच्या अंगावर लोटल्याने शेतकऱ्यांचे भविष्यांत प्रचंड नुकसान होण्याची शक्यता वाढणार आहे. पिकपहाणी आणि  पिकपहाणीच्या नोंदी या महसुल विभागाच्या अधिकाऱ्यां मार्फत शेतकऱ्यांच्या शेतावर, शेतकऱ्यांच्या घरी जावून त्यांना विचारून किंवा शेतकऱ्यांना ऑफीसमध्ये बोलवून शेतकऱ्यांकडून पिक पेऱ्याची माहिती घेवून करण्यात याव्यात. कोणीही शेतकरी पिकपहाणी नोंदी पासुन वंचित रहाणार नाही याची काळजी घेण्याची अवश्यकता आहे.

    शेतकऱ्यांची भातशेती खालील तसेच इत्तर पिकाखालील पावसाळी एकपिकी जमीन ही 8अ व 7/12 ला खरीप लागवड म्हणून गणली जाते, मात्र या भातशेती इत्यादी पिकांच्या जमीन मध्ये कोकण, रायगडसह महाराष्ट्रांतील अनेक शेतकरी स्वतःच्या जमिनीत शेततलाव बनवून, मत्स्यशेती करून मत्स्योत्पादन घेत आहेत. पिक विमा भरताना 8अ मधले सर्व क्षेत्र भातशेती इत्यादी पिकांच्या अंतर्गत गणले जात आहे आणि  मत्स्यशेत तलावांची  7/12 वर मत्स्यशेती अशी नोंद वारंवार मागणी करून, आंदोलन करून अद्यापही केलेली नाही.

    शासनाने पिकपाण्याची नोंद करण्यासाठी इ-पिकपहाणी अॅप तयार केले आहे. या इ-पिकपहाणी अॅपमध्ये त्रुटी आढळून येत आहेत. इ-पिकपहाणी अॅपमध्ये पिकपहाणी नोंद करण्या करता असणाऱ्या पिकांच्या पर्यायांच्या रकान्यात मत्स्यशेती हा पर्याय (ऑप्शन) उपलब्ध नाही त्यामुळे पिकपहाणी सदरी मत्स्यशेती अशी नोंद करणे मत्स्यशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना शक्य होत नाही. इ-पिकपहाणी अॅपच्या माध्यमांतुन मत्स्यशेतकऱ्यांना त्यांच्या मत्स्यशेतीची नोंदणी करता येत नसल्याने मत्स्यशेती करणाऱ्या मत्स्यशेतकऱ्यांचे भविष्यांत फारमोठे नुकसान होणार असुन त्यांची मत्स्यशेतीची जमिन आपोआपच नापिक ठरली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. मत्स्यशेतकऱ्यांना नुकसान भरपाई, बॅन्ककर्ज, शासकीय अनुदान अथवा इतरत्र प्रकारची कोणतीही मदत सहकार्य अथवा मार्गदर्शन तसेच मत्स्य विभागामार्फत मत्स्यतलावांचे रजिस्ट्रेशन यापुढे होणे कठीण होणार आहे. तरी इ-पिकपहाणी अॅपमध्ये मत्स्यशेतीची नोंदणी करण्यासाठी मत्स्यशेती हा पर्याय (ऑप्शन) नव्याने जोडण्यात यावा. सोबतच मत्स्यशेतीत कोणत्या माशांची मत्स्यशेती केली जाते याचीही माहिती भरता येण्याची व्यवस्था व दुरुस्ती या इ-पिकपहाणी अॅपमध्ये करण्याची अवश्यकता असल्याचे पेण तालुका शेतकरी विकास मंच चे सदस्य व मत्स्यशेतकरी श्री. राजेंद्र झेमसे वाशी ता. पेण यांनी सांगितले. पेण तालुक्यांत मागील अतिवृष्टी व पुरामुळे मत्स्य तलावांचे झालेल्या नुकसानीचे सुमारे दोन हजारपेक्षा अधिक पंचनामे झाले असुन तशी नोंद शासन दरबारी आहे. मागील  काही वर्षात रायगड, कोकणसह संपूर्ण महाराष्टांत अनेक शेतकऱ्यांनी मत्स्यशेतीचा पर्याय निवडला असुन महाराष्ट्रांत बर्‍यापैकी मत्स्यशेती केली जात आहे. मात्र इ-पिकपहाणी अॅपमध्ये या मत्स्यशेतकऱ्यांना पिकपहाणी नोंदण्याचा पर्यायच उपलब्ध नसल्याने संपूर्ण महाराष्ट्रांतील मत्स्यशेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. मत्स्यशेतकऱ्यांचे हे नुकसान टाळण्यासाठी शासनाने मत्स्यशेतकऱ्यांच्या 7x12 वर मत्स्यशेती अशी नोंद करून इ-पिकपहाणी अॅपमध्ये पिकपहाणी नोंद करण्यासाठी मत्स्यशेती हा पर्याय उपलब्ध करून देण्याचा व शेतकऱ्यांना इ-पिकपहाणी नोंदवण्याची माहीती व मार्गदर्शन महसुल व कृषी विभागा मार्फत, पिकपहाणी नोंदणीच्या मुदतीपूर्वी करून देण्याची मागणी पेण तालुका शेतकरी विकास मंचने प्रसिद्ध केलेल्या पत्रकांत करण्यात आली आहे.

[[ इ-पिकपहाणी अॅपमध्ये मत्स्यशेतीची नोंदणी करण्यासाठी मत्स्यशेती हा पर्याय (ऑप्शन) नव्याने जोडण्यात यावा. सोबतच मत्स्यशेतीत कोणत्या मास्यांची मत्स्यशेती केली जाते याचीही माहिती भरता येण्याची व्यवस्था व दुरुस्ती या इ-पिकपहाणी अॅपमध्ये करण्याची अवश्यकता आहे.]] 

 ( पेण तालुका शेतकरी विकास मंच चे सदस्य श्री. राजेंद्र झेमसे वाशी - पेण)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: