आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

गायक एस पी बालसुब्रह्मण्यम यांचे निधन रसिकांना चटका लावणारे.

   

  हिंदी चित्रपटसृष्टीला कोणाची नजर लागली हेच समजेना.  एका पाठोपाठ एक कलाकार रसिकांना सोडून चालले आहे. कोरोनामुळे आशालता यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या निधनातून रसिक सावरत नाही तोच  कोरोनाने आणखी एका गुणी कलाकाराला रासिकांपासून हिरावून नेले.  हिंदी चित्रपटातील जेष्ठ पार्श्वगायक एस पी बालसुब्रह्मण्यम हे गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने आजारी होते. शुक्रवारी त्यांनी अंतिम श्वास घेतला. ७४ वर्षाचे एस पी बालसुब्रह्मण्यम हे रसिकांचे आवडते गायक होते. ४ जून १९४६ रोजी त्यांचा जन्म आंध्रप्रदेश मधील  नेल्लोर येथील मेहुआ या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव श्रीपती पंडितराध्युला बालसुब्रमण्यम असे होते. एस पी बालसुब्रह्मण्यम यांचे वडील हरिकथा गायक होते. आंध्रप्रदेशमधील  हे पारंपरिक लोकसंगीत आहे. त्यात कविता, कथा, गाणी नृत्य यासर्व प्रकारांचा समावेष असतो. एस पी यांचे वडील नाटकांतूनही काम करीत. एस पी यांना दोन भाऊ व एक बहीण आहेत. मोठे होऊन इंजिनिअर व्हावे अशी त्यांची इच्छा होती पण ती पूर्ण होऊ शकली नाही.  लहानपणापासून गायनाची आवड असल्याने त्यांनी गायनातच करियर करायचे असे ठरवले. १९६४ साली त्यांना गायनाचे पहिले पारितोषिक मिळाले. त्यानंतर त्यांचे नाव सर्वदूर पसरू लागले. सुरवातीला त्यांनी आपल्या मातृभाषेत म्हणजे तेलगू भाषेत गाणी गायली. नंतर त्यांनी कन्नड, तामिळ या दाक्षिणात्य भाषेतही गायला सुरवात केली. सुरवातीला दाक्षिणात्य भाषेत गाणी गाणारे एस पी हे दक्षिणेतील मोहम्मद रफी  म्हणून ओळखले जात. नंतर त्यांनी हिंदीतही गायला सुरवात केली. एस पिंच्या आवाजातले हम बने तुम बने हे एक दुजे के लिये या चित्रपटातील गाणे खुप गाजले.एक दुजे के लिये या पहिल्याच चित्रपटातील पार्श्वगायनासाठी त्यांना राष्ट्रिय पुरस्काराने गौरविण्यात आले.  या चित्रपटातील गाण्याने त्यांचे हिंदी चित्रपट सृष्टीत बस्तान बसले. ते आघाडीचे गायक म्हणून ओळखले जाऊ लागले. पत्थर के फुल, हम आपके है कौन, बागी, साजन, रोजा आदी चित्रपटातील त्यांची गाणी खूप गाजली. सलमान खानचा पहिला चित्रपट मैने प्यार किया साठी त्यांनी सलमानचा आवाज बनून गाणी गायली. या चित्रपटातील त्यांची सर्व गाणी गाजली.  सलमान खान याला सुपरस्टार करण्यात एस पि यांचा वाटा खूप मोठा होता. सलमान खानच्या अनेक गाण्यांना त्यांचाच आवाज असे. सलमान खान आणि एस पी हे जणू एकाच नाण्याचे दोन बाजू होते. ९० च्या दशकात त्यांनी गायलेली सर्वच गाणी लोकप्रिय झाली.  एस पी यांनी १६ भाषांमधून ४० हजारांहून अधिक गाणी गायली. ८ फेब्रुवारी १९८१ रोजी सकाळी ९ ते रात्री ९ अशा १२ तासात तब्बल २१ कन्नड गाणी रेकॉर्ड करून त्यांनी विश्वविक्रम केला जो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्डमध्ये नोंदला गेला. एस पी बालसुब्रह्मण्यम यांनी गेली पाच दशके आपल्या आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या आवाजाची मोहिनीच अशी होती की जो त्यांचा आवाज ऐकेल तो त्यांच्या आवाजाच्या प्रेमात पडे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यांना तब्बल अर्धा डझन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. शिवाय फिल्मफेअर, स्क्रीन असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. भारत सरकारनेही त्यांना  पद्मभूषण हा मानाचा पुरस्कार देऊन गौरवले आहे. रसिकांचे आवडते आणि रसिकांच्या मनात आदराचे स्थान असणाऱ्या या गायकाचे असे अकाली निधन रसिकांना चटका लावून जाणारे आहे. एस पी बालसुब्रह्मण्यम यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 


-श्याम बसप्पा ठाणेदार ,दौंड जिल्हा पुणे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: