आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

निरर्थक वाद

         जगातील सर्वात मोठी आणि यशस्वी लीग म्हणून जीच्याकडे पाहिले जाते त्या इंडियन प्रीमियर लीग चा तेरावा हंगाम दुबई, शारजा व संयुक्त अरब अमिरातीत सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांविना खेळली जाणारी ही लीग यावर्षीही लोकप्रिय होत आहे. आयपीएल ही जितकी क्रिकेटसाठी प्रसिद्ध आहे तितकीच ती वादासाठीही प्रसिद्ध आहे. आयपीएल आणि वाद हे जणू समीकरणच बनले आहे. या हंगामात तरी हे समीकरण बदलेल अशी अपेक्षा होती पण हा  हंगामही याला अपवाद ठरला नाही. भारताचा माजी सलामीवीर विक्रमादित्य फलंदाज  , जेष्ठ समालोचक सुनील गावसकर आणि भारताचा कर्णधार विराट कोहली याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यातील वादाने मागील आठवडा गाजवला. अनुष्काचा पती रॉयल चॅलेंज बंगळुरू चा कर्णधार विराट कोहली हा सलग दोन सामन्यात अपयशी ठरल्यावर समालोचन करणारे सुनील गावसकर यांनी म्हटले की विराट हा जगातला सर्वोत्तम फलंदाज आहे त्याची ही कामगिरी निराशाजनक आहे.  जितका तुम्ही जास्त सराव कराल तितकी तुमची कामगीरी उत्तम होऊ शकते याची त्याला नेमकी कल्पना आहे. हे तो जाणतो. आता लॉक डाउन च्या काळात त्याला हा सराव मिळाला नाही लॉक डाऊनमुळे प्रत्यक्ष मैदानात जाऊन सराव करता न आल्याने त्याने अनुष्काचा बॉलिंगवर सराव केला. त्याची चित्रफीत आपण पाहिली पण त्याने काही होणार नाही त्याला मैदानावर आणखी सराव करावा लागेल. स्टार स्पोर्ट चॅनलवर हिंदीत हे समालोचन चालू होते. सर्वांनी ते ऐकले. त्यात गावसकर यांनी अभिरुची सोडून कुठलेही भलते सलते विधान केले नाही. त्यात महिलांचा अवमान करणारा कोणताही भाग नव्हता. गावसकरांना ओळखणारे कोणीही सांगेल की ते महिलांचा अवमान करणाऱ्यांपैकी नाही. महिलांप्रति त्यांनी नेहमीच आदर व्यक्त केला आहे.  लॉक डाऊनमध्ये विराट कोहली यानेच  इन्स्ट्राग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता त्यात अनुष्का त्याला बॉलिंग करीत असल्याचे दिसते. त्या व्हिडीओच्या अनुषंगानेच गावसकर यांनी ती टिपणी केली. पण अनुष्काला ही टिपणी मात्र चांगलीच  झोंबली. तिने सरळ गावसकरांवर टीका करताना त्यांना थेट स्त्री वादाचा कोर्टात उभे केले. तिने इन्स्ट्राग्रामवर स्टोरी पोस्ट करीत गावसकरांना काही प्रश्न केले. त्यातला पहिल्या प्रश्नात  अनुष्का म्हणते की मिस्टर गावसकर तुम्ही तुमच्या टिप्पणीतून दिलेला संदेश अभिरुचीहीन आहे. पतीच्या अपयशाला तुम्ही पत्नीला जबाबदार धरता. मुळात अनुष्काला कसला राग आला तेच प्रेक्षकांना समजेना कारण गावसकर यांनी महिलांचा अवमान करणारे कोणतेही वक्तव्य केले नाही की त्यांनी विराट कोहलीच्या अपयशाला अनुष्काला जबाबदार धरले. मुळात हा वादाचा विषय नव्हता पण आजच्या सोशल मीडियाच्या युगात अर्थाचा बेअर्थ करून त्यावर चर्चा करायची, वाद उकरून काढायचा आणि सामोरच्या व्यक्तीला ट्रोल करायचे याची स्पर्धाच लागली आहे.माध्यमांना आपला टीआरपी वाढवण्यासाठी असे वाद हवेच असतात.  तिखट मिठाची फोडणी टाकून असे वाद रंगवले जातात पण त्यातून काहीही साध्य होत नाही. उलट दोन व्यक्ती मध्ये द्वेष पसरवला जातो. पण त्यातून चांगल्या व्यक्तीची प्रतिमा भंजन होते याचे भान कोणाला राहत नाही.  गावसकरांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर तरी हा वाद थांबेल अशी अपेक्षा करुया. अशा निरर्थक वादापेक्षा आयपीएलमध्ये क्रिकेटवरचा चर्चा व्हावी. अशी अपेक्षा क्रिकेटप्रेमी व्यक्त करीत आहे.


-- श्याम बसप्पा ठाणेदार ,दौंड जिल्हा पुणे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: