आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

संपूर्ण कुटुंबाची करा तपासणी, कोरोना हरवण्‍याची घ्‍या घबरदारी

 माझे कुटुंब, माझी जबाबदारी


कोरोनाविरुध्‍द लढण्‍यासाठी राज्‍य शासनाने १५ सप्‍टेबर २०२० पासुन ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही महात्‍वाकांक्षी मोहीम महाराष्‍ट्रभर राबविण्‍यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आज राज्‍याच्‍या सर्वच भागांत मोठया प्रमाणावर वाढताना दिसत आहे. संसर्गाची साखळी खंडीत करण्‍याची आवश्‍यकता आज प्राधान्‍याने  निर्माण झाली आहे. यासाठी १५ सप्टेंबरपासून राज्‍यभरात राबविण्यात येत असलेली ही मोहिम कोरोनाच्या नियंत्रणासाठी अधिक प्रभावी ठरणार आहे. घरोघरी जाऊन करण्‍यात येणा-या या सर्व्‍हेक्षणात संशयित कोरोना रुग्‍ण, मधुमेह, ह्रदयविकार, किडणी आजार, लठठपणा, कोमॉर्बिड अवस्‍थेतील रुग्‍ण शोधण्‍याचे महत्‍वपूर्ण काम करण्‍यात येत आहे. कोरोनाच्‍या पार्श्‍वभुमीवर सर्व्‍हेक्षणाव्‍दारे आरोग्य शिक्षण साधणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या मोहिमेद्वारे कोरोना व विविध आजारांचे रुग्‍ण शोधुन काढणे, लोकांना कोरोना विषाणूसोबत जगायला शिकवणे व त्यासाठी काही नियम व मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. घरोघरी करण्‍यात येत असलेल्‍या हया सर्व्‍हेक्षण मोहिमेव्‍दारे लोकांमध्‍ये आजाराबाबत अधिकाधिक जनजागृती करुन भिती कमी करण्‍याचा उददेश आहे. कोरोनाविरुद्धचा लढा आता घराघरांत पोहोचणार असून लोकप्रतिनिधी व नागरिक यांच्या सहयोगाने ही मोहिम राबविण्‍यात येत आहे. कोरोना आटोक्‍यात आणण्‍यासाठी आरोग्‍य यंत्रणा गेल्‍या ५-६ महिन्यांपासून अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र आपले आव्हान अजून संपलेले नाही. लॉकडाऊन काळात कोरोनाची लाट ब-याच अंशी थोपविण्‍यात आली होती. आता हळूहळू सर्व व्‍यवहार खुले करत लॉकडाऊनकडून अनलॉककडे वाटचाल सुरु आहे. परप्रांतात गेलेले लाखो मजूर पुन्हा राज्यात आले आहेत. त्‍यामुळे संसर्गाचा धोका तिव्र झालेला आहे. कोरोनाची वाढती संख्या पाहता कोरोनासोबत कसे जगायचे ते आता शिकावे लागणार आहे. त्‍यामुळे माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेव्‍दारे रुग्‍ण शोधुन काढण्‍याबरोबरच आरोग्‍य जनजागृती हा महत्‍वाचा उददेश ठेवण्‍यात आलेला आहे. लोकसहभागाने राबविण्‍यात येत असलेली ही मोहीम परिणामकारक होणे गरजेचे आहे. राज्‍यातून कोरोना हददपार करण्‍यामध्‍ये या मोहिमेचा फार मोठा वाटा असणार आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिक यांच्या योगदानाद्वारे राबविली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यातील महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून शासकीय यंत्रणा प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणार आहे. यासाठी प्रत्येक मतदारसंघात पथके नेमण्यात येणार आहेत. ही पथके महिनाभरातून किमान दोन वेळा आपल्या कार्यक्षेत्रातील कुटुंबापर्यंत पोहोचणार आहेत. यात कुटुंबातील ५० पेक्षा जास्त वय असणा-या व्यक्तीला आरोग्याविषयी काही तक्रार असल्यास त्यांना आरोग्य विभागाच्या माध्यमातून पुढील उपचार दिले जाणार आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात स्वसंरक्षण महत्त्वाचे असून प्रत्येकाने आरोग्यविषयक छोट्या गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी. बाहेर जाताना मास्क वापरा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, वारंवार हात धुवा, सॅनिटायझरचा वापर करा, खेळती हवा असणा-या ठिकाणी थांबा, अंतर राखा, सार्वजनिक वाहतूक किंवा स्वच्छतागृहांचा वापर करताना काळजी घ्या अशा सूचना लोकांना व्‍यक्‍तीशः प्रत्‍यक्ष भेटीतुन सरकारी यंत्रणांव्‍दारे करण्‍यात येणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागांत वाढत आहे. मुंबई, पुणे, ठाणेइ. शहरामधील या आजाराची रुग्‍णांच्‍या तुलनेने स्‍थीर होत असली तरी इतर जिल्‍हे आणि ग्रामीण भागामध्‍ये कोवीड रुग्‍ण मोठया प्रमाणात आढळून येत आहेत.  ग्रामीण जनता अजुनही प्रतिबंधात्‍मक काळजी घेत नसल्‍याने संसर्गाचा फैलाव वेगाने पसरत आहे. राज्यात पुन्हा टाळेबंदी करण्याची वेळ येऊ नये यासाठी कोरोनामुक्‍तीत लोकसहभाग आवश्‍यक झाला आहे. कोरोनाचे संकट वाढत असताना ‘पुनश्च हरिओम’ म्हणत जनतेचे आयुष्य पूर्वपदावर आणण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. कोरोनाच्या या संकटात कुटुंबाचे आर्थिक गणित अस्थिर झाले आहे. ते गणित जुळवण्याच्या दृष्टीने राज्य शासनाचे प्रयत्‍न सुरु असुन एकीकडे कोरोना मुक्‍ती तर दुसरीकडे अर्थव्‍यवस्‍था सुधारण्‍याचे दुहेरी आव्‍हान राज्‍य सरकारसमोर आ वासुन उभे आहे. राज्य सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या छायेत आहे. हे संकट वरचेवर गडद होत चालले आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली असली तरी मृत्‍यूदर कमी असल्‍याने परिस्‍थीती नियंत्रणात आहे. त्‍यामुळे जनतेने घाबरण्याचे अजिबात कारण नाही. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेव्‍दारे विविध आजारांचे रुग्‍ण उपचारांच्‍या कक्षेत येणार असल्‍याने मोहिमेचा चांगला परिणाम येत्‍या काळात दिसुन येईल. रुग्‍णसंख्‍या आटोक्‍यात आल्‍याने संसर्ग कमी होण्‍यास मदत होणार आहे. त्‍यामुळे राज्‍यातील कोरोना संसर्गाला कलाटनी देणारी ही मोहिम ठरेल अशी आशा आहे. दिनांक १५ सप्‍टेंबर ते २५ ऑक्‍टोबर २०२० या कालावधीत दोन टप्‍प्‍यात महाराष्‍ट्रभर ही मोहिम राबविण्‍यात येत आहे. मोहीमेची पहिली फेरी दिनांक 15 सप्‍टेंबर ते १० ऑक्‍टोबर २०२० या कालावधीत तर  दुसरी फेरी दिनांक १२ ऑक्‍टोबर ते 24 ऑक्‍टोबर २०२० या कालावधीत होत आहे. पहिला फेरीचा कालावधी २२ दिवसांचा असेल तर दुस-या फेरीचा कालावधी १२ दिवसांचा असेल. दुस-या फेरीमध्‍ये कुटुंबाची नावे लिहिण्‍याची आवश्‍यकता नसल्‍यामुळे कालावधी कमी करण्‍यात आला आहे. राज्‍यातील सर्व महानगरपालिका,नगरपालिका, नगरपंचायत,ग्रामपंचायत, कटकमंडळे इ. ठिकाणी ही मोहिम राबविली जात आहे. मोहिमेअंतर्गत राज्‍यातील गावे, वाडी, पाडे इ. मध्‍ये राहणा-या प्रत्‍येक नागरीकाची तपासणी करण्‍यात येत आहे. गृहभेटीसाठी  एक आरोग्‍य कर्मचारी आणि 2 स्‍वयंसेवक (एक पुरुष व एक स्‍त्री) असे तीघांचे पथक  स्‍थापन करण्‍यात आले आहे.  एका पथकाचे १ दिवसात ५० घरांना भेटी देण्‍याचे नियोजन असेल. पथकामध्‍ये समाविष्‍ट कर्मचा-यांना कोरोना दूत असे संबोधण्‍यात येत आहे. त्‍यांना आवश्‍यक साहित्‍य उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेले आहे. मोहिमेचा दैनंदिन अहवाल पाठविण्‍यासाठी शासनाकडून एक अॅपदेखील विकसीत करण्‍यात आले असुन त्‍यायोगे अॅंड्रॉईड फोनव्‍दारे दररोज गृहभेटीची माहिती ऑनलाईन भरण्‍यात येत आहे. पहिल्‍या गृहभेटीमध्‍ये प्रत्‍येक घरात शिरण्‍यापूर्वी दाराबाहेर सोयीच्‍या ठिकाणी Sticker लावण्‍यात येत आहेत . घरामध्‍ये गेल्‍यानंतर कुटुंबातील सदस्‍यांची यादी करुन सदस्‍यांचे तापमान मोजण्‍यात येईल व त्‍याची नोंद करण्‍यात येईल. ताप असणा-या व्‍यक्‍तीस खोकला, घशात दुखणे,थकवा इ. लक्षणे आहेत का याची माहिती घेण्‍यात येईल. ताप असणा-या व्‍यक्‍तीचे SpO2 पल्‍स ऑक्‍सीमीटर द्वारे तपासण्‍यात येईल. घरातील प्रत्‍येकास मधुमेह, हदयरोग, कर्करोग, किडणी आजार, अवयव प्रत्‍यारोपन, दमा इ. आजार आहेत का याची माहितीदेखील घेण्‍यात येत आहे. कुणाला ३८’C इतका किंवा त्‍यापेक्षा जास्‍त ताप असल्‍यास किंवा SpO2 ९५% पेक्षा कमी असल्‍यास रुग्‍णांस जवळच्‍या Fever Clinic मध्‍ये संदर्भीत करण्‍यात येईल. संदर्भीत करताना रुग्‍णास संदर्भ चिठ्ठी देण्‍यात येईल तसेच कोवीड-१९ प्रतिबंधाच्‍या सुचना रुग्‍ण व घरातील सर्व नातेवाईकांना देण्‍यात येतील. घरातील कोणत्‍याही व्‍यक्‍तीस मधुमेह, उच्‍चरक्‍तदाब, किडनी आजार, Organ transplant, लठ्ठपणा, दमा किंवा इतर मोठे आजार असल्‍यास त्‍यांची SpO2 तपासणी पुन्‍हा करुन खात्री करण्‍यात येईल. अशा रुग्‍णांचे  तापमान ३7’C पेक्षा जास्‍त असेल तर त्‍यांना ताप उपचार केंद्रात संदर्भीत करण्‍यात येईल. ताप, SpO2 95 पेक्षा कमी,  Co-morbid Condition या तीन पैकी कोणतेही २ लक्षणे आढळल्‍यास अशा व्‍यक्‍तीस High risk संबोधून त्‍वरीत रुग्‍णवाहिका बोलावून जवळच्‍या सरकारी ताप उपचार केंद्रात संदर्भीत करण्‍यात येईल. घरातील सर्व व्‍यक्‍तींची तपासणी पूर्ण झाल्‍यावर दारावर असलेल्‍या Sticker वर गृह भेटीची तारीख/वेळ, सर्वे करणा-या पथकाचा क्रमांक पथकातील सदस्‍यांची अध्‍याक्षरे आणि Co- Morbid व्‍यक्‍ती असल्‍यास तशी नोंद करण्‍यात येईल व त्‍यानंतर पुढील घरास भेट देण्‍यासाठी पथक निघुन जाईल. गृहभेटीच्‍या दुस-या फेरीत कुटुंबातील सदस्‍यांची माहीती पहिल्‍या फेरीत घेतलेली असल्‍यामुळे दररोज ७५-१०० घरे करण्‍यात येतील. घरातील सर्व व्‍यक्‍तींची नावे, वय इ. माहीती तसेच Co-morbid conditionsची माहीती पहील्‍या फेरीत घेतलेली असल्‍यामुळे दुस-या फेरीमध्‍ये सर्वाचे तापमाण व ताप असल्यास SpO2 मोजण्‍यात येईल. पहील्‍या फेरीच्‍या वेळी गैरहजर असणा-या घरातील व्‍यक्‍तींची Co-morbid Condition साठी चौकशी करण्‍यात येईल. अनलॉक कालावधीमध्‍ये जनतेमध्‍ये जागरुकता यावी आणि कोवीड-१९ आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी शास्‍त्रशुध्‍द माहीती व योग्‍य वेळी निर्णय घेण्‍याची क्षमता वाढविणे आवश्‍यक आहे. त्‍यामुळे गृहभेटीदरम्‍यान कोविड नसलेल्‍या, कोविड पॉझीटिव्‍ह व कोविड होऊन गेलेल्‍या व्‍यक्‍ती अशी विभागणी करुन त्‍यांना आवश्‍यक प्रतिबंधात्‍मक दक्षता घेण्याबाबत आरोग्‍य पथकामार्फत संदेश देण्‍यात येतील. यामध्‍ये सतत मास्‍क घालून रहावे,  दर २-३ तासांनी साबणाने स्‍वच्‍छ हात धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, नाक, तोंड, डोळे यांना हात लाऊ नये, ताप आल्‍यास तसेच सर्दी/खोकला/घसा दुखणे, धाप लागणे, खूप थकवा येणे अशी लक्षणे दिसल्‍यास त्‍वरीत जवळच्‍या Fever Clinic मध्‍ये जाऊन तपासणी करुन घ्‍यावी, मधुमेह, हृदयविकार, किडणी आजार, लठठ्पणा इ. असल्‍यास दररोज तापमान मोजावे व उपचार सुरु ठेवावेत त्‍यात खंड पडू देऊ नये असे संदेश देऊन कोवीड-१९ मधुन बरे झालेलया व्‍यक्‍तीस प्‍लाझमा दान करावयाचा असलयास SBTC Website ची माहीती देण्‍यात येईल.

 
                 वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई


        या मोहिमेच्‍या संनियंत्रणाची जबाबदारी विभागीय स्‍तरावर विभागीय आयुक्‍त, जिल्‍हास्‍तरावर जिल्‍हाधिकारी, मुख्‍य कार्यकारी अधिकारी, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी, जिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सक यांचेकडे महानगरपालिका स्‍तरावर पालिका आयुक्‍त, मुख्‍य वैदयकीय अधिकारी तर तालुका स्‍तरावर तालुका आरोग्‍य अधिकारी यांचेकडे सोपविण्‍यात आलेली असुन त्‍यांचेकडे जबाबदा-याचे वाटप करण्‍यात आले आहे. मोहिमेसाठी आशा / ए.एन.एम. त्‍यांना दिलेल्‍या टॅब वा स्‍मार्टफोनच्‍या मदतीने व इतर कर्मचारी स्‍वत:च्‍या Android Mobile वरुन दररोज मोहीमेचा अहवाल सादर करतील. त्‍याचप्रमाणे या मोहिमेदरम्‍यान एक बक्षिस योजनादेखील राबविण्‍यात येत आहे. सदरील बक्षिस योजना व्‍यक्‍ती आणि संस्‍थांसाठी असतील. व्‍यक्‍तींसाठीच्‍या योजनांमध्‍ये निबंध स्‍पर्धा, पोष्‍टर स्‍पर्धा,आरोग्‍य शिक्षण मेसेजेसच्‍या स्‍पर्धा इ. घेण्‍यात येतील तर संस्‍थांसाठी वेगवेगळया संस्‍थांच्‍या कामकाजानुसार बक्षिसे देण्‍यात येतील ज्‍याचा जनजागृतीसाठी चांगला उपयोग होईल.
       राज्‍य शासनाने जाहीर केलेली माझे कुटुंब माझी जबाबदारी ही महात्‍वाकांक्षी योजना प्रत्‍येक घरापर्यंत पोहोचणारी असुन त्‍यातुन कोविड व इतर आजाराचे रुग्‍ण शोधुन काढुन त्‍यांना उपचारांच्‍या कक्षेत आणण्‍यास मदत होणार आहे. या मोहिमेच्‍या यशस्‍वीतेतुन सध्‍या राज्‍यावर गडद झालेले कोरोनाचे ढग दुर होतील अशी आशा करण्‍यास हरकत नाही.

माझे कुटुंब माझी जबाबदारी, आरोग्‍य सेवा आपल्‍या दारी

संपूर्ण कुटुंबाची करा तपासणी, कोरोना हरवण्‍याची घ्‍या घबरदारी



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: