आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

■ मुंबई तुंबई- निसर्गाचा इशारा ■

       मुंबईचे भौगोलिक महत्व आणि मुंबईला लाभलेल्या विस्तीर्ण समुद्र किनाऱ्याचे  महत्व शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी ओळखून मुंबई इंग्रजाकडून विकत मागितली होती धूर्त इंग्रजानी ती दिली नाही.तीच मुंबई आज रहायला ,जगायला आणि सांगायला ही महाग झाली आहे .एवढी महाग की अंगावर कफन घेऊन दफन,दहन होण्याएवढी जागा सुद्धा इथे काही कोटीत मिळते.(कोटीने करोडोंचे घर गाठले आहे)त्याच मुंबईतल्या दक्षिण मुंबईतल्या कुठल्यातरी तरी कोपऱ्यात अगदी समुद्राला लागून ,लागून कसलं समुद्रात भर टाकून समुद्राच्या छाताडावर भर टाकून जे काही उभं राहील त्यातल्याचं कुठल्या तरी दक्षिण मुंबई ,प्रॉपर मुंबई नावाच्या मुंबईत आम्ही रहातो आज त्याच मुंबईतल्या दादर, लोअर परेल, वरळी व अन्य काही ठिकाणी पाणी भरले,एरव्ही समुद्र फिरायला जाणारे आम्ही आज समुद्र स्वतः भेटायला घरात आला म्हणून आनंद साजरा करायचा की समुद्र  निसर्ग दारात येऊन इशारे  देतोय त्याबद्दल शहाण व्हावं. सात  बेटांची मुंबई,हो मुंबई सात बेटांचीच नंतर तिचं पोट फुगत गेलं. अगदी पाचव्या मुंबई पर्यँत पोहोचूनही मुंबईकर थांबला नाहीच,याला स्पिरिट म्हणून जोरजोरात कौतुक कराव की मुंबई बाहेर जाण्याची वेळ अस्सल खऱ्या मुंबईकरावर आली म्हणून खेद व्यक्त करावा.

      आजच्या पहाटेच्या साखर झोपेत समुद्र घरात घुसला सार दारे -खिडकी अगदी जमिनीतूनही तांडव करत सारं घर पाणीमय करून गेला.तळमजल्यावरील अनेकांना आपली घरे सोडून पहिल्या दुसऱ्या मजल्यावर स्थलांतर व्हावं लागलं,वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली घरातल्या वस्तूंचे नुकसान झाले.याला जबाबदार कोण?प्रगती प्रगती म्हणत आपण माणसे कापलेली शेपुट पुन्हा बसवायला निघालो आहोत.समुद्रात भर टाकून जे काही बांधता आलं ते बांधत निघालो आहोत.कित्येक फूट खाली जमिनीला खोदत अक्षरशः भगदाडे पाडत आम्ही निघालो आहोत.  याच मुंबईत निसर्गाने कोट्यवधी वर्षे खपून बनवलेली झाडे ,डोंगर ,नद्या ,पर्वत  आपण सागरी रस्ते टोलेजंग इमारती मेट्रो प्रकल्पा साठी नष्ट करत निघालो आहोत.मिठी सारखी नदी गटार गंगा म्हणून केव्हा वाहू लागली हे ही आपल्याला कळलं नाही की कळलेलं वळल नाही.मिठी जवळ उभं राहून गाण म्हणून ही मिठीच्या गटार गंगेच रडगाणं अजून संपलं नाही.विकास विकास म्हणत आम्ही मिठी सारख्या अशा अनेक नद्यांना  गमावून बसलो आहोत.  निसर्गाची जैवविविधता  नष्ट करणे हे आपल्या प्रगतीचे सूत्र असेल तर निसर्ग कसा काय माफ करू शकतो. जमीन पोखरून अक्षरशः जमिनीला कंगाल करून मेट्रो, सारखा प्रकल्प , मुंबईच्या जीवावर उठलेला,निसर्गाच्या जीवावर उठलेला प्रकल्प परदेशी लाड पुरवायच्या नादात आम्हीच मुंबईच्या माथी मारून बसलोय. परदेशी अनुकूल हवामान तिकडच्या  मेट्रो ला पोषक आहे म्हणून आम्ही इकडे मेट्रो प्रकल्पाचा नंगानाच सुरू केला, परदेशात कपडे काढून ते नाचले की आपल्याकडे ते ग्रेट भारी,फॅशन वगैरे अस काही तरी असत, तेच परदेशी मेट्रोच फॅड इकडे उतरवताना मुळातच दमट असलेलं मुंबईच वातावरण इथली भौगोलिक परिस्थिती,प्रकल्प उभी रहाणारी जमीन तिचा कस हे काहीही लक्षात न घेता.मूठभर लोकांच घर भरण्यासाठी अख्खी मुंबई ,संपूर्ण मुंबई नावाचं घर तुम्ही  बुडवायला निघालेले आहात.

     याच मेट्रो प्रकल्पासाठी मुंबईच्या संपूर्ण अंगात टोलेजंग इमारती उभ्या करण्यासाठी मुंबईच्या जीवावर उठलेले मेट्रोचे खांब मुंबईच्या देहावर कधी न भरून येणारे वार करत उभे करण्यात आले,ते कमी म्हणून तीन मजली खालून मेट्रोचे जाळे पसरून मुंबईला पोखरल सर्व दिशेने.

     मुंबई माझी म्हणत म्हणत आज ती कोणाची ही राहिलीच नाही.कितीही विकासाच्या गप्पा मारल्या तरी विकास पोटापाशी येऊन थांबतो.मुंबईच भरभरून भरलेलं,ओसंडून वहाणारं पोट आज फुटीच्या मार्गावर आहे.लूटमार करणारे गोरे टोपिकरांकडून निघून गेले आज आपलेच लूटमार करत निघाले आहेत.माणसाला लुटणारा माणूस निसर्गाला लुटत निघाला आहे. अस्मितेच्या नावाखाली इथला मराठी माणूस वर्षानुवर्षे मते देत गेला आणि मत घेणारे  त्याला येनकेन प्रकारे वर्षानुवर्षे त्याला लुटत आले.इथल्या मराठी माणसावर पद्धतशिरपणे  बाहेर जाण्याची वेळ कोणी आणली,हे सर्वश्रुत आहे; मी सांगण्याची गरज नाही.आणि उद्योगधंद्याच्या रूपाने आर्थिक राजधनीची आर्थिक गणिते तोडायला टपून बसलेल्या लांडग्यांच्या कळपाची ही तुम्हाला चांगलीच महितीपूर्वक जाणीव आहे.निवडणूक येतात तेव्हा इथल्या माणसाची अस्मिता  जागवली जाते, निवडणूक झाल्या की या अस्मितेचं विकासमय बारस करून तिला गोंडस बासनात गुंडाळून ठेवलं जातं; पुढच्या निवडणुकीपर्यंत.तोवर इथला माणूस मागच विसरतो. पोटाची भूक माणसाला बरच काही करायला आणि विसरायला लावते तसेच काहीसे...

     मुंबई सर्वांना सामावून घेते म्हणत म्हणत मुंबईला सहिष्णुतेचे लेबल लावून दिल चिकटून की झालं.हो मान्य मुंबई सर्वांना सामावून घेते पण तिने किती सामावून घ्यावं. सामावून सामावून घेता तिचं पोट फुगून आता तेच पोट फुटीच्या मार्गावर आहे.आज समुद्र थेट घरात शिरला माणसे अस्वस्थ झाली.आधीच उल्हास  त्यात फाल्गुन मास या म्हणीप्रमाणे आधीच कोरोनाचा विषाणूरुपी अज्ञानरुपी आगडोंब उसळला असताना त्यात हा पाण्याचा महापूर.बीडीडी पुनर्विकासाची माजी आणि विद्यमान मुख्यमंत्र्यांना घाई त्याच डिलाईल रोड बीडीडी चाळीत आज पाणी घुसले आहे जनजीवन विस्कळीत  झाले आहे. तिकडे बघायला त्यांना ना त्यांच्या मंत्रीपुत्राला वेळ आहे.जनजीवन विस्कळीत होणे म्हणजे काय हे एसीत बसून नाही कळायच. तुंबई होणारी मुंबई नेहमीचीची झाली आहे, आता आम्हा मुंबईकरांना .तुम्हाला त्याची लाज नाही आणि आम्हाला  इलाज नाही.सागरी रस्ता ,मेट्रो भुयारी रेल्वे प्रकल्प मुंबईला आणि पर्यायाने निसर्गाला समुद्राला मारक ठरत आहे ठरले आहेत. गिरीश राऊतांसारखी माणसे सतत जीव तोडून होणाऱ्या या विध्वंसाबद्दल जनजागृती करत आहे .समाजप्रबोधन करत आहेत.दरवर्षीप्रमाणे आपटून आपटून घोषणा केलेली पावसाळी पाण्याची निचरा व्यवस्था या ही वर्षी मोडीत निघाली आहे.

           आज समुद्र घरात घुसला ,पाणी घरात आलं हा इशारा तर देत नाही आहे समुद्र.निसर्ग सावध करतोय! आपली वाटचाल विनाशाकडे चालू झाली आहे.समुद्र व्यापक आहे त्या अथांग अवाढव्य पसरलेल्या समुद्राच्या काठावर चिमुकली मुंबई तग धरून उभी आहे.पाण्याला अडवता येत नाही ते वाट मिळेल तिथे प्रवाहित होत. आजही तेच झालं.पाणी घुसल .

     आज पाणी घरात घुसल, निसर्ग इशारावजा कानमंत्र देऊन देऊन गेला,जागे व्हा.आज घरात आलो, गळ्यापर्यंत पोहोचलो उद्या नाकातोंडात गेलो तर त्याला जबाबदार आम्ही माणूसच...काढून काढून गायीचं दूध संपलं आता बैलाचही दूध काढत सुटलेलो आम्ही,आमची प्रगती निसर्गाच्या मुळावर आलीये. उध्वस्त होण्याच्या पलीकडचा उध्वस्तपणा  आपण करून ठेवला आहे. असेच कधीतरी,पाणी पुन्हा येईल समुद्राने चोहोबाजूंनी  वेढलेल्या मुंबईच्या बाहेर पडणे ही मुश्किल होईल.तेव्हा वेळ गेलेली असेल.तेव्हा तुमच्या घोषणेला ,विकासाला,प्रगतीला कस्पटासमानही किंमत रहाणार नाही..

    नैसर्गिक समुद्र बुझवत जाणाऱ्या सागरी मार्ग हा  मुंबईच्या येथील माणसाच्या,येथील निसर्गाच्या जीवावर उठलेला आणि विनाशाच्या सर्वोतोपरी अंगाने जाणारा प्रगतीचा आलेख आहे.त्याचा प्रवासच अधोगतिकडे सुरू आहे.

मुंबई मेरी जान,माझी मुंबई अरे आम्ही अभिमानाने म्हणतो ,देशाची आर्थिक राजधानी असणारी ,उपयुक्त असे प्रसिद्ध बंदर असणारी मुंबई .तीच मुंबई ,तिचा निसर्ग तुम्ही तुमच्या राजकीय  अनास्थेने विद्रुप करत निघालेले आहात. जागोजागी जखमांचा बाजार आणि बेजार झालेली मुंबई ....आणि मग अस कधीतरी समुद्रालाच बाहेर येऊन सांगावं लागत .मुंबई जखमी आहे हो मुंबई जखमी आहे.

©®




-अनुज केसरकर 

Anujkesarkar1@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: