आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, १८ जून, २०२०

ड्रॅगनने लादलेले युद्ध


भारत आणि चीनच्या लष्करात प्रथमच १९७५ नंतर चकमक झाली. भारताचे केवळ तीनच नाही, तर कमीत कमी २० सैनिक हुतात्मा झाल्याचे आता स्पष्ट झाले. सोमवारी रात्री उशिरा ही चकमक होऊनही मंगळवारी रात्री उशिरापर्यंत या बातमीला सरकारकडून अधिकृत दुजोरा दिला जात नव्हता. अखेर भारतीय लष्कराने उशिरा वीस जवान हुतात्मा झाल्याचे मान्य केले. गलवान खोऱ्यातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले. उंचावरच्या गलवान खो-यात  गंभीररित्या जखमी झालेल्या १७ जवानांना उपचारासाठी खाली आणण्यात आले; परंतु उंचावरच्या ठिकाणाच्या तपमानामुळे जखमींचा मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेत २० भारतीय सैनिक हुतात्मा झाल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले. एकीकडे वाटाघाटी करायच्या आणि दुसरीकडे अचानक हल्ला करायचा, ही चीनची रणनीती आहे. गेल्या आठवड्यात चीनने सामंजस्यातून मार्ग काढण्याचे जाहीर केले आणि दुसरीकडे चीनच्या अन्य प्रांतातून अक्साई चीनमध्ये सैन्याची जमवाजमव केली जात होती. गेल्या पाच मे पासून सुरू असलेल्या संघर्षाला आता युद्धाचे वळण लागले आहे. या हल्ल्यात १६ बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू, तामीळनाडूच्या रामानाथपूरम जिल्ह्याचे रहिवासी जवान पलानी तसेच झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यातील डिहारी गावाचे कुंदन ओझा यांनाही हौतात्म्य आले. चीनचेही पन्नास सैनिक ठार झाल्याचे सांगितले जाते; परंतु चीन ते मान्य करायला तयार नाही. पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये भारतीय लष्कर आणि चीनच्या सैनिकांमध्ये सोमवारी रात्री ही झटापट घडून आली.  भारताने सीमा ओलांडल्याचा दावा चीनने केला आहे, तर चीनचे सैन्य गलवान खो-यात अडीच किलोमीटर आत घुसले होते, असे सांगितले जाते.  प्रत्यक्ष सीमारेषेवर गेल्या दीड महिन्यांपासून असणारा तणाव कमी करण्यासाठी दोन्ही बाजूंकडून माघार घेतली जात असताना ही घटना घडली. भारत आणि चीन यांच्यामध्ये तीन हजार ४८८ किलोमीटर लांबीची सीमा रेषा आहे. यातील बहुतांश सीमा विवादित असून, त्यावर चर्चा सुरू आहे. दोन्ही सैन्यामध्ये १९७५ मध्ये अरुणाचल प्रदेशातील तुलुंगला येथे चकमक झाली होती, त्यात भारताचे चार सैनिक हुतात्मा झाले होते. त्यानंतर प्रथमच दोन्ही देशांच्या सैन्यात चकमक होऊन त्यात जीवितहानी झाली. गलवान खोऱ्यासह पूर्व लडाखमधील पॅन्गाँग सरोवर, डेमचोक आणि दौलत बेग ओल्डी येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मे महिन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आहेत. या भागामध्ये भारताकडून रस्त्यांची ६६ कामे सुरू असून, काही धावपट्ट्याही विकसित करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. या कामांमुळे पॅन्गाँग सरोवर आणि परिसरात भारतीय लष्कराला वेगवान हालचाली करणे शक्य असल्यामुळे या कामांत अडथळे आणण्यासाठी चीनच्या सैन्याकडून या भागात घुसखोरी सुरू  आहे. लष्करी अधिकाऱ्यांच्या वरिष्ठ स्तरावरील चर्चेनंतर तणाव कमी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सोमवारी रात्री साडेअकरा वाजल्यानंतर गलवान खोऱ्यामध्ये चीनचे सैनिक ट्रकमधून आले. त्यांना भारतीय सैनिकांनी अडविल्यानंतर ते माघारी जाण्यास तयार नव्हते आणि त्यातूनही घटना घडली. सुमारे दोन ते तीस तास ही चकमक झाली. यानंतर मंगळवारी सकाळी दोन्ही बाजूंच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये घटनास्थळी चर्चा झाली.

    संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचा चीनवर किती अंधविश्वास होता, हे नंतर स्पष्ट झाले. दोनच दिवसांपूर्वी दोघांनीही चीन आणि नेपाळसोबतचा तणाव लवकरच निवळेल असे सांगितले होते. सिंह यांनी तर पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन होईल, असे सांगितले. नेपाळसारख्या छोट्या राष्ट्राने चीनच्या सल्ल्याने भारतीय सीमेवर गोळीबार केला, त्यात एक शेतकरी ठार झाला. आता तर चीननेच थेट हल्ला केला. आता या घटनेनंतर राजनाथ सिंह  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या घटनेची माहिती दिली. तसेच, पूर्व लडाखच्या परिस्थितीचा आढावा घेतानाच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, संरक्षण प्रमुख जनरल बिपीन रावत आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांबरोबर बैठक घेतली. लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनीही आपला पठाणकोटचा नियोजित दौरा रद्द केला. एकीकडे भारतीय लष्कर सामंजस्याची भूमिका गेऊन चीनला वारंवार माघारीचे आवाहन करीत असताना चीनने मात्र भारतीय लष्कराने १५ जूनपासून दोन वेळा सीमोल्लंघन केल्याचा कांगावा केला. भारतीय सैन्यानेच चीनच्या सैनिकांवर पहिल्यांदा हल्ला केल्याचा कांगावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने केला. चीन सरकारचे वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सच्या संपादकांनी चीनची जीवितहानी झाली असल्याचे मान्य केले आहे. भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्यानंतरही चीनची हेकेखोरी कमी झाल्याचे दिसत नाही. चीनच्या सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने चीनच्या संयमाला कमजोरी समजू नये, असा इशारा दिला आहे. चीनला भारतासोबत संघर्ष करण्याची इच्छा नाही; मात्र आम्ही भारताला घाबरत नसल्याचेही त्यांनी सांगितले. भारतासोबत तणाव वाढल्यानंतर 'ग्लोबल टाइम्स'ने सातत्याने भारतविरोधी भूमिका घेतली होती. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनच्या जीवितहानीबाबत अधिकृत माहिती देण्यास नकार दिला. भारताने एकतर्फी कारवाई करून तणावात भर घालून सीमा प्रश्न आणखी जटील करू नये, असे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाने केले. भारतीय जवानांनी चीनच्या हद्दीत घुसून चिनीवर सैन्यावर हल्ला केला असल्याचा उलटा आरोप केला आहे. मागील महिन्यापासून लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. चिनी सैन्याने भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्यानंतर दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने उभे ठाकले होते. तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांतील लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू होतीत; मात्र सोमवारी दोन्ही बाजूने सैन्यांमध्ये चकमक घडली असली. भारताने पहिला हल्ला केल्यानंतर चीनने त्याला प्रत्युत्तर दिले आहे. या चकमकीत दोन्ही बाजूंचे जवान जखमी झाले असल्याचे चीनने म्हटले आहे.

     भारत आणि चीनच्या दरम्यान लडाख सीमेवरील तणाव आणखीच वाढला आहे. चीनच्या सैनिकांनी भारतीय जवानांवर खिळे असलेल्या काठ्यांनी हल्ला केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पीपी१४-१५-१७ वरून चीन पुन्हा माघारी फिरणार असल्याचे ठरले; मात्र चिनी फौजांनी माघार घेण्यास नकार दिला. भारतीय जवानांनीदेखील चीनच्या सैन्याला समजवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान दोन्ही सैन्यांमध्ये वाद वाढला आणि चिनी फौजांनी हल्ला केला आहे. चिनी फौजांनी भारतीय जवानांवर दगडफेक केली. त्याशिवाय लोखंडाच्या वस्तू. खिळे असलेल्या काठ्यांनी भारतीय सेनेवर हल्ला केला. भारतीय सैन्यानेच चीनच्या सैनिकांवर हल्ला केला. त्याच्या प्रत्युत्तरात भारतीय जवानांना प्राण गमवावे लागले असल्याचे चीनने म्हटले आहे. सीमावाद हा चर्चेतूनच सोडवण्यात येणार असल्याची भूमिका चीनने मांडली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे, की भारतीय सैनिकांनी दोन वेळेस सीमा ओलांडून चिनी सैनिकांना उकसवण्याचा प्रयत्न केला. भारतीय जवानांची ही कृती दोन्ही देशांमध्ये झालेल्या सहमतीविरोधात आहे. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये शारीरिक संघर्ष झाला. भारताने आपल्या जवानांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असून त्यांच्या या कृतीमुळे सीमा प्रश्न आणखी जटील होऊ शकतो. भारताने चीनच्या 'वन चायना प्रिन्सिपल' धोरणाला आव्हान देणे म्हणजे आगीशी खेळ असल्याचा इशारा ग्लोबल टाइम्सने दिला आहे. भारतीय राजकीय रणनीतीकारांकडून चीनच्या या धोरणाला विरोध करण्याचा सल्ला सरकारला देण्यात आला आहे. यामध्ये भारताचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अरविंद गुप्ता यांचाही समावेश आहे. भारतातील राजकीय रणनीतीकारांनी चीनविरोधात पावले उचलण्याबाबत सरकारला काही सूचना केल्या आहेत. यामध्ये भारताने हाँगकाँगमध्ये लोकशाही, तैवानसोबत आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या मुद्यावर सहकार्याचे संबंध निर्माण करणे आणि चीनचे नेते भारताच्या दौऱ्यावर आल्यानंतर तिबेटच्या नागरिकांसोबत चीनविरोधी आंदोलन करावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. या सूचनांवर अंमल केल्यामुळे चीनला अडचणी आणता येईल का, चीनला पराभूत करण्याचा पर्याय मिळाला आहे, असे भारतीय तज्ञांना वाटते का, असा प्रश्नही ग्लोबल टाइम्सने विचारला आहे.

-भागा वरखडे 
(लेखक जेष्ठ पत्रकार आहेत )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...