मुंबई - (किशोर गावडे )
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भांडुप पश्चिमेकडील उत्कर्ष नगर विकास मंडळ, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. मंडळाचे आधारस्तंभ वअध्यक्ष, भास्कर दाजी विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला आहे.
देशावर कोरोनासारख्या महामारी चे संकट घोंगावत आहे.अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आर्थिक बाजू पूर्णपणे कोलमडून गेलेली आहे.तीन महिने सर्व उद्योगधंदे बंद आहेत. गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. आपल्या विभागातील सर्व नागरिकांच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
यंदा मंडळाने 10 फूटी भव्य दिव्य गणेश मुर्ती न साकारता फक्त 4 फुटाची छोटी मूर्ती घडविण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.गेली अनेक वर्षे आकर्षक गणेश मूर्ती मंडळाकडून साकारण्यात येते. पण कोरोना संकट, आर्थिक मंदी, या पार्श्वभूमीवर मंडळाने या वेळी उत्कर्ष नगर विकास मंडळाचे अध्यक्ष भास्कर दाजी विचारे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व कार्यकारी मंडळाच्या वतीने गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे.श्रींचे आगमन व विसर्जनाला कोणतीही मिरवणूक काढण्यात येणार नाही.तसेच यंदा लोकवर्गणी देखील न काढण्याचा महत्वकांक्षी निर्णय कार्यकारी मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे.
ज्या रहिवाशांना स्वखुषीने काही मदत करायची असेल, त्यांनी मंडळाच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन, सेक्रेटरी विलास मनोहर मर्गज,व खजिनदार रवी सुर्वे यांनी केले आहे.गणेशोत्सव मंडळाचे हे 54 वर्ष असून गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी असंख्य गणेशभक्त श्रींच्या दर्शनाला येत असतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा