‘लेखन अन् मी साहित्य कला प्रतिष्ठान’चा राज्यस्तरीय गुणगौरव सन्मान सोहळा !!
ठाणे : रविवार, दि.१८ ऑक्टोबर २०२६ रोजी
वक्रतुंड सभागृह, गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली पूर्व याठिकाणी लेखन अन् मी साहित्य कला प्रतिष्ठान आणि पाटील फिल्म प्रोडक्शन, कोल्हापूर च्या वतीने राज्यस्तरीय गुणगौरव सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
समाजात रत्ने असतातच; पण त्यांची पारख करून त्यांना सन्मानाचे कोंदण देणारा रत्नपारखी विरळाच असतो! याच विचाराचा प्रत्यय ‘लेखन अन् मी साहित्य कला प्रतिष्ठान’ आणि ‘पाटील फिल्म प्रोडक्शन, कोल्हापूर’ यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय गुणगौरव सन्मान सोहळा २०२६ मध्ये आला.
संस्थापक आदरणीय श्री. रमेश मारुती पाटील यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या या व्यासपीठावर साहित्य, कला, सामाजिक कार्य, दातृत्व आणि बालप्रतिभेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणाचा नव्हता, तर कर्तृत्वाचा गौरव आणि माणुसकीचा जागर होता.
माणुसकी आणि दातृत्वाचा संदेश
प्रमुख मान्यवर प्रा. डॉ. राजू श्रावस्ती सर यांनी आपल्या मनोगतातून हृदयस्पर्शी विचार मांडला.
“एक वेळ लोकांच्या डोळ्यांत अश्रू आणणे सोपे असते; पण त्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसणे फार अवघड असते!”
दुसऱ्याचे दुःख समजून घेणे, त्याला आधार देणे आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे, हीच खरी माणुसकी. गुणवंतांच्या कर्तृत्वाचा गौरव करून त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू फुलवण्याचे कार्य श्री. रमेश पाटील सर आपल्या संस्थेच्या माध्यमातून करीत आहेत.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. बाळासाहेब तोरसकर सर यांनी महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा आणि थोर समाजसुधारकांच्या कार्याचा संदर्भ देत संस्थेचे कौतुक केले. छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगे महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वांनी महाराष्ट्राला दिशा दिली. त्याच सामाजिक बांधिलकीच्या विचारातून विविध क्षेत्रांतील गुणवंतांना शोधून त्यांचा सन्मान करण्याचे कार्य श्री. रमेश पाटील सर करीत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अनमोल रत्ने एकत्र आणून त्यांना सन्मानाचे व्यासपीठ देणे, हीच या संस्थेची खरी ओळख आहे.
संघर्षातून दातृत्वाकडे
मान्यवर श्री. काकडे साहेब यांनी कोरोना काळातील एक हृदयद्रावक प्रसंग सांगितला. आई-वडिलांना गमावलेल्या एका लहान मुलीने, “सर, आता मी शाळेची फी कशी भरू?” असा प्रश्न विचारला. त्या निरागस प्रश्नाने हेलावून जाऊन त्यांनी त्या वर्षी सर्व विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करण्याचा निर्णय घेतला.
स्वतः अनेक वर्षे कारकून म्हणून काम करूनही कायमस्वरूपी नोकरी न मिळाल्याचा आणि नंतर नोकरी गमावल्याचा संघर्षही त्यांनी सांगितला. मात्र, परिस्थितीपुढे हार न मानता त्यांनी अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आणि विविध संस्था उभारल्या.
स्वतःच्या संघर्षातून इतरांसाठी संधी निर्माण करणे, हेच दातृत्वाचे खरे सामर्थ्य!
कामगार ते डॉक्टरेट—जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास
टाटा मोटर्समध्ये उच्च पदावर कार्यरत असलेले डॉ. उदय अनंत माळगांवकर यांनी वयाच्या पन्नाशीनंतर डॉक्टरेट पदवी संपादन करण्याचा प्रेरणादायी प्रवास उलगडला. कामगार म्हणून सुरू झालेली त्यांची वाटचाल अधिकारीपदापर्यंत पोहोचली; नोकरीच्या जबाबदाऱ्या सांभाळतानाच त्यांनी उच्च शिक्षणही पूर्ण केले.
आई-वडिलांचे आशीर्वाद, बहीण-भावांची साथ आणि कुटुंबीयांचे योगदान यांची जाणीव ठेवण्याचे महत्त्व त्यांनी सांगितले. आदरणीय रतन टाटा साहेबांकडून मिळालेल्या ‘जगा आणि जगवा’ या विचारातून दातृत्व आणि सामाजिक बांधिलकीचा संस्कार कसा रुजला, हेही त्यांनी स्पष्ट केले.
शिकण्याला वयाची मर्यादा नसते आणि यशाचे खरे सार दुसऱ्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यात असते!
“मी सुरक्षित आहे का?”—चिमुरडीचा अंतर्मुख करणारा प्रश्न
कार्यक्रमातील सर्वांत लक्षवेधी क्षण म्हणजे दुसरीच्या वर्गातील एका चिमुरडीने केलेले “मी सुरक्षित आहे का?” या विषयावरील प्रबोधनात्मक भाषण.
या भाषणाचे लेखन श्री. संतोष जाधव सरांनी केले होते. मात्र, त्या चिमुरडीने अवघ्या दोन दिवसांत भाषण तोंडपाठ करून आत्मविश्वासाने व्यासपीठावर सादर केले. तिच्या विचारांनी उपस्थितांना अंतर्मुख केले आणि आजची पिढी किती जागरूकपणे विचार करू शकते, याची जाणीव करून दिली.
कवयित्री प्रज्ञा म्हात्रे यांनी मनातील विचार निर्भयपणे व्यक्त करण्याचा संदेश दिला, तर डॉ. अजित शिंदे सरांनी समाजाला दिशा देणारे विचार मांडले. विविध मान्यवरांच्या मनोगतांमुळे कार्यक्रमाला वैचारिक उंची प्राप्त झाली.
कला, संगीत आणि निवेदनाची रंगत
गोल्ड मेडल प्राप्त भरतनाट्यम नृत्यांगनेने आपल्या नृत्यकलेतून उपस्थितांचे स्वागत केले. पुण्याहून आलेल्या नामवंत गायिका माधुरी लेंडे यांनी सुरेल गायनाने कार्यक्रमात रंगत आणली.
निवेदनाची धुरा सांभाळणाऱ्या सोनाली फडके आणि श्री. संतोष जाधव सर या गोड जोडीने आपल्या प्रभावी निवेदनाने संपूर्ण कार्यक्रमाला चार चाँद लावले. मान्यवरांचे मनोगत, कलाविष्कार आणि पुरस्कार वितरण यांची सुंदर सांगड त्यांच्या निवेदनातून अनुभवायला मिळाली.
पडद्यावर दिसणाऱ्या कार्यक्रमामागे पडद्यामागे असंख्य कार्यकर्त्यांचे परिश्रम होते. नियोजन, स्वागत, व्यवस्था आणि समन्वय सांभाळणाऱ्या प्रत्येक हाताचे योगदान मोलाचे होते. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून सोहळा संस्मरणीय ठरला.
समारोप : कर्तृत्वाचा गौरव, माणुसकीचा जागर!
आजच्या सोहळ्यातून एकच विचार ठळकपणे समोर आला—स्वतःपुरते न जगता दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद, प्रेरणा आणि संधी निर्माण करणे, हेच जीवनाचे खरे यश आहे.
आदरणीय श्री. रमेश मारुती पाटील सर यांनी ‘लेखन अन् मी साहित्य कला प्रतिष्ठान’च्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील गुणवंतांना एकत्र आणून त्यांच्या कर्तृत्वाला सन्मानाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ही दूरदृष्टी आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी निश्चितच कौतुकास्पद आहे.
आजचा कार्यक्रम इतका मनाला भावला की तो संपूच नये, असे वाटत होते. मात्र, वेळेचे भान राखून त्याची सांगता करण्यात आली. या अविस्मरणीय सोहळ्यासाठी आयोजक, सर्व मान्यवर, कलाकार, निवेदक आणि पडद्यामागे मेहनत घेणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे मनःपूर्वक आभार!
संस्थेच्या पुढील वाटचालीत नवनवीन प्रतिभांना संधी मिळो, साहित्य-कलेचा गौरव होत राहो आणि समाजहिताचे कार्य अधिक व्यापक होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.रत्ने समाजात असतात; त्यांची पारख करणारी नजर आणि त्यांचा प्रकाश जगासमोर आणणारे व्यासपीठ समाजाला समृद्ध बनवते.
‘लेखन अन् मी साहित्य कला प्रतिष्ठान’च्या या प्रेरणादायी कार्याला आणि संस्थापक श्री. रमेश मारुती पाटील सरांना मनःपूर्वक सलाम!
गुणांचा गौरव होत राहो, माणुसकीचा दीप तेवत राहो आणि समाजातील अनमोल रत्नांचा प्रकाश महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचत राहो!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा