वासिंद(हर्षल शेलवले): सध्या गणेशोत्सवात हार, फुले, मिठाई, फळे यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो, जे दुसऱ्या दिवशी निर्माल्य म्हणून फेकले जाते. याला फाटा देत कासगाव (ता. शहापूर) येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. अशोक घरत यांनी एक आदर्शवत पायंडा पाडला आहे.
त्यांनी आपल्या घरच्या गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांना आवाहन केले आहे की, दर्शनासाठी येताना हार / फुले / मिठाई / फळे अशी वस्तू आणण्याऐवजी, बाप्पाला शालोपयोगी वस्तू (वही, पेन, पेन्सिल, दप्तर) अर्पण करा.
जमा झालेल्या सर्व शालोपयोगी वस्तू त्या परिसरातील गरजू शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहेत."एक दिवसात निरुपयोगी होणारे हार-फुले, भेसळयुक्त मिठाई आणि केमिकलने पिकवलेली फळे यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. त्याऐवजी असा उपक्रम राबवल्यास आपली सांस्कृतिक परंपरा जपत सामाजिक हितही जपले जाते," असे मत घरत यांनी व्यक्त केले.
त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, घरगुती तसेच गणेश मंडळांनी देखील असा उपक्रम राबवावा असे मत सामाजिक चळवळीत कायमच खंबीरपणे साथ देणारे तसेच कुणबी युवा मंडळ मुंबई चे शहापूर तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील सर यांनी व्यक्त केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा