वासिंद (हर्षल शेलवले): कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा - तालुका शहापूरची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक २५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता शारदा विद्यालय (SVM) व ज्युनिअर कॉलेज, तुळशी विहार, आसनगाव (पूर्व) येथे आयोजित करण्यात आली आहे.
शाखेचे अध्यक्ष श्री. प्रकाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडणार असून, सर्व सभासदांनी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
मागील सभेचा इतिवृत्त वाचून कायम करणे, सन २०२४-२०२५ चा कार्यअहवाल वाचून तो मंजूर करणे, आर्थिक वर्ष सन २०२५-२०२६ चा जमाखर्च वाचून तो मंजूर करणे, सन २०२६-२०२७ मध्ये शाखेमार्फत पार पाडावयाच्या उपक्रमांस मंजुरी देणे, शाखेच्या नवीन सदस्यांना मंजुरी देणे, व अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करणे.
गणसंख्येअभावी सभा तहकूब झाल्यास सभा पुन्हा अर्ध्या तासाने त्याच ठिकाणी सुरु करण्यात येईल, यास गणसंख्येची अट असणार नाही. दरवर्षी प्रमाणे यंदाही सभेच्या निमित्ताने एक विशेष सत्कार समारंभ आयोजित केला आहे. शाखेच्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज वाचनालय व अभ्यासिकेतील अभ्यास करून सरकारी नोकरीत लागलेल्या जिज्ञासू अध्येतांचा व विविध शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा शाखेतर्फे जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.
या सभेला आणि सत्कार समारंभाला सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही विनंती शाखाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा