कणकवली(गुरुनाथ तिरपणकर) जनजागृती सेवा संस्थेतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या आरती संग्रहाचे प्रकाशन शुक्रवारी कणकवली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी बोलताना अभिनेते अभय खडपकर यांनी आरती संग्रहाचे कौतुक करत, “अत्यंत दर्जेदार आणि वाचण्यासाठी सुलभ असा हा आरती संग्रह कोकणातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा,” अशा शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन अभय खडपकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने, तर माजी जिल्हा परिषद सदस्या राजश्री धुमाळे यांच्या हस्ते गणेश प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर नगरसेविका मनस्वी ठाणेकर, अक्षरोत्सव प्रमुख तथा पत्रकार निकेत पावसकर, सेवानिवृत्त वाहतूक निरीक्षक प्रकाश साखरे, उद्योजक मिथुन ठाणेकर आणि जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते आरती संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. संग्रहाचे अवलोकन केल्यानंतर उपस्थितांनी त्याचे विशेष कौतुक केले. जनजागृती सेवा संस्थेच्या सातत्यपूर्ण सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रमांचेही यावेळी गौरवोद्गार काढण्यात आले. कोकणासह महाराष्ट्रातील विविध भागांत संस्थेने उभारलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
कार्यक्रमात गुरुनाथ तिरपणकर यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प, संस्था अहवाल, आभारपत्र, आरती संग्रह आणि गणेश प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार गुरुनाथ तिरपणकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे खजिनदार दत्ता कडुलकर आणि गंधाली तिरपणकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा