आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, १ सप्टेंबर, २०२६

व्यसनमुक्ती पथनाट्य स्पर्धेत विवेकानंद कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स ॲण्ड कॉमर्स प्रथम, नेरुळचे एस आय इ एस महाविद्यालय दुसऱ्या तर डी वाय पाटील स्कूल ऑफ फार्मसी तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी

प्रथम विजेता संघ
नवी मुंबई : अन्वय व्यसनमुवती केंद्र आणि नशाबंदी मंडळ - महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंंतरमहाविद्यालयीन व्यसनविरोधी पथनाट्य स्पर्धेत चेंबूरच्या विवेकानंद कॉलेज ऑफ आर्ट्‌स सायन्स ॲण्ड कॉमर्सने प्रथम क्रमांक पटकावला. नेरुळचे एस आय इ एस महाविद्यालय दुसऱ्या तर डी वाय पाटील स्कूल ऑफ फार्मसी तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले. १ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून वाशी येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात सुरु असलेल्या या स्पर्धेत मुंबई, नवी मुंबई, पनवेल परिसरातील १३ महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग दर्शवला.
     सदर स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी बोलताना नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे चिटणीस अमोल मडामे यांनी समाजातील मान्यवर घटकांचे अनुकरण नवी पिढी करते म्हणून सर्वात आधी त्या घटकांनी स्वतःला व्यसनांपासून दूर ठेवले पाहिजे असे नमूद करुन चांगल्या कामाची नशा नव्या पिढीला चढावी असे आवाहन त्यांनी केले. दारु किंवा कोणत्याही अंमली पदार्थांनी ताण, चिंता, तणाव, दडपण दूर होते हा समज आधी मनातून काढून टाका असे सांगतानाच पत्रकार राजेंद्र घरत यांनी यावेळी केलेल्या भाषणातून अशा प्रकारच्या स्पर्धा या जेन झी ला विधायक मार्गाकडे नेण्यासाठी उपयुक्त ठरतील हे स्पष्ट करत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे व विजेत्या संघांचे अभिनंदन केले. स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेज, चेबूर व एफ जी नाईक कॉलेज - कोपरखैरणे यांचे संघ उत्तेजनार्थ पारितोषिकांचे धनी ठरले. 
       
या स्पर्धेचे परिक्षक म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी रवि वाडकर तसेच अभिनेत्री प्रितम सिंग यांनी काम पाहिले. याप्रसंगी विचारमंचावर नवी मुंबई समन्वय संस्थेच्या पदाधिकारी अमरजा चव्हाण, स्त्री मुक्ती संघटनेच्या विश्वस्त वृषाली मगदूम याही उपस्थित होत्या. विजेत्या महाविद्यालयीन संघांनी जोशपूर्ण वातावरणात मंचावर येऊन आपापली पारितोषिके स्वीकारली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अजित मगदूम यांनी तर सूत्रसंचालन ‘अन्वय'चे समुपदेशक उदय तिळवे यांनी केले ..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

व्यसनमुक्ती पथनाट्य स्पर्धेत विवेकानंद कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स ॲण्ड कॉमर्स प्रथम, नेरुळचे एस आय इ एस महाविद्यालय दुसऱ्या तर डी वाय पाटील स्कूल ऑफ फार्मसी तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी

प्रथम विजेता संघ नवी मुंबई : अन्वय व्यसनमुवती केंद्र आणि नशाबंदी मंडळ - महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. बाबासा...