आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२६

कोकण म्हणजे निसर्ग, माणुसकी आणि परंपरांचा अनोखा संगम!

बांदा(प्रतिनिधी -गुरुनाथ तिरपणकर)सण-उत्सवांच्या माध्यमातून गावागावांत माणसे एकत्र येतात आणि जाती-धर्माच्या सीमा नकळत विरघळून जातात. अशाच सर्वधर्मसमभावाचा आणि माणुसकीचा प्रत्यय बांदा शहराच्या नजीक पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र गोवा राज्यांच्या सीमेवर असलेल्या कोरगाव येथील मुस्लिम धर्मीय युवक मकबूल माळगीमनी हे गेल्या आठ वर्षांपासून आपल्या घरी श्री गणरायाची भक्तिभावाने प्रतिष्ठापना करून गणेशोत्सव साजरा करत आहेत.
      गणेश चतुर्थीच्या दिवशी घरात गणरायाचे आगमन झाले की माळगीमनी कुटुंबात उत्साहाचे वातावरण निर्माण होते. पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा, आरती आणि नैवेद्य करत ते गणरायाचे स्वागत करतात. विशेष म्हणजे गणेशोत्सवासाठी लागणारी खरेदी तसेच सजावटीचे साहित्य ते आवर्जून बांदा बाजारपेठेतून घेतात. त्यामुळे या भक्तीच्या परंपरेला स्थानिक बाजारपेठेशीही एक भावनिक नाते जोडले गेले आहे.
     बालपणीच्या स्वप्नाला मिळाली पूर्तता
     मकबूल माळगीमनी यांच्या मनात लहानपणापासूनच आपल्या घरी गणपती बसविण्याची इच्छा होती. त्यांच्या पूर्वजांकडूनही गणेशपूजनाची परंपरा होती; मात्र कालांतराने ती खंडित झाली. बालवयात ते वडिलांना, ‘आपण घरी गणपती कधी ठेवणार?’ असा प्रश्न विचारायचे. त्यावर वडील, ‘आपले स्वतःचे घर झाल्यावर आपण गणपतीची स्थापना करू,’ असे सांगायचे.
    काळ पुढे सरकत गेला. अनेक अडचणींवर मात करत माळगीमनी यांनी स्वतःचे घर उभारले. घराचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बालपणी मनात जपलेली गणरायाच्या प्रतिष्ठापनेची इच्छाही पूर्ण केली. गेल्या आठ वर्षांपासून त्यांच्या घरी गणेशोत्सवाची ही परंपरा अखंड सुरू आहे.
      ‘माणुसकी हाच माझा धर्म’
      गणरायाच्या भक्तीमागील भूमिका स्पष्ट करताना मकबूल माळगीमनी सांगतात, “मी जेव्हा संकटात होतो, तेव्हा माणूस माझ्या मदतीला धावून आला. त्यामुळे माणुसकी हाच एकमेव धर्म मी मानतो. कोणत्याही देवाबद्दल माझ्या मनात भेदभाव नाही आणि भविष्यातही राहणार नाही.” आपल्या जीवनातील काही प्रसंग सांगताना ते म्हणतात, “घरात वीज नव्हती, तेव्हा चर्चमधील मेणबत्त्या घरी आणून दिवा म्हणून लावल्या. जेव्हा खायला अन्न नव्हते, तेव्हा देवळातील प्रसाद खाल्ला. माझ्यासाठी सर्व देव सारखेच आहेत. मी आज जो काही आहे, तो सर्व धर्मांच्या लोकांच्या सहकार्यामुळे आहे. मग देवाबाबत मी भेदभाव का करू?” त्यांच्या या विचारातून कोकणातील सामाजिक सलोख्याची खरी ओळख अधोरेखित होते.
     संकटात मिळालेली माणसांची साथ
     स्वतःचे घर उभारण्याचा प्रवासही माळगीमनी यांच्यासाठी सोपा नव्हता. आर्थिक आणि अन्य अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी घर उभारले. या प्रवासात कुटुंबीयांनी दिलेली साथ त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरली. गावातील स्थानिक परशुराम गावडे यांचेही घर उभारणीच्या काळात मोलाचे सहकार्य लाभल्याचे ते आवर्जून सांगतात. माणसाने माणसाच्या सुख-दुःखात उभे राहावे, हीच भावना त्यांच्या जीवनप्रवासातून दिसून येते. त्यामुळेच गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता त्यांच्या कुटुंबासाठी माणुसकीचा उत्सव बनला आहे.
     कोकणच्या मातीत रुजलेली परंपरा
     कोकणात गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. मुंबई, पुणे, गोवा यांसह देशाच्या विविध भागांत वास्तव्यास असलेले चाकरमानी गणेशोत्सवासाठी आवर्जून गावाकडे परततात. घराघरांत गणरायाचे आगमन होते. आरत्या, भजन, नैवेद्य, सजावट आणि पाहुणचाराने वातावरण भारून जाते. याच कोकणी संस्कृतीत माळगीमनी कुटुंबाचा गणेशोत्सवही गेल्या आठ वर्षांत आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. धर्म वेगळा असला तरी श्रद्धा, भावना आणि माणुसकी या गोष्टी माणसांना जोडतात, हा संदेश त्यांच्या गणेशोत्सवातून मिळतो. पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. गणपतीला नैवेद्य दाखविण्यापासून ते उकडीचे मोदक, नित्य पूजा अगदी कुटुंबीय मनोभावे करतात.
     ‘देव वेगळे, पण माणुसकी एकच’
     गणपतीची प्रतिष्ठापना करण्यामागील आपले बालपणीचे स्वप्न पूर्ण झाले, याचा आनंद माळगीमनी यांच्या चेहऱ्यावर दिसतो. मात्र त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या या कृतीतून समाजाला मिळणारा संदेश. धार्मिक सण हे समाजात दुरावा निर्माण करण्यासाठी नव्हे, तर माणसांना एकत्र आणण्यासाठी असतात, ही भावना त्यांच्या कृतीतून अधोरेखित होते. गणरायाच्या चरणी नतमस्तक होताना धर्माच्या चौकटींपलीकडे जाऊन माणुसकीचा विचार करणाऱ्या मकबूल माळगीमनी यांचा हा गणेशोत्सव कोकणातील सामाजिक सलोख्याचे सुंदर उदाहरण ठरत आहे.
      ‘देव वेगळे असले तरी माणुसकी एकच आहे,’ हा संदेश देणाऱ्या त्यांच्या घरातील गणरायाचे आगमन म्हणूनच केवळ एका कुटुंबाचा उत्सव न राहता सर्वधर्मसमभावाची प्रेरणा देणारा उत्सव ठरला आहे. त्यांच्या या उत्सवात आई व पत्नीही मनोभावे श्री गणरायाची सेवा करतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नवी मुंबईतून वृत्तपत्राचे संपादक संशयास्पदरीत्या बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा दाखल

नवी मुंबई: नवी मुंबईतील वाशी परिसरातून 'दैनिक नवे शहर'चे ५२ वर्षीय संपादक शैलेश सुंदर जाधव हे संशयास्पदरीत्या बेपत्ता झा...