मुंबई (प्रतिनिधी): सणासुदीच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीय बोगस लॉटरीचा लवकरच सुळसुळाट होणार असून, लॉटरीचे ग्राहक व विक्रेते यांनी सावध राहावे; अन्यथा फसवणूक होण्याचे भय आहे, असा इशारा महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. विलास कृ. सातार्डेकर यांनी दिला आहे.
लॉटरी विक्रेता संघटनेच्या राज्यव्यापी पदाधिकारी बैठकीनंतर संघटनेचे अध्यक्ष विलास सातार्डेकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, येत्या काळात लॉटरी उद्योगापुढे संकट म्हणून उभ्या ठाकणाऱ्या विविध घटनांकडे त्यांनी लक्ष वेधले असून, लॉटरीचे ग्राहक व विक्रेते यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
गणेशोत्सव, दिवाळी, नवरात्र, दसरा या सणांच्या निमित्ताने विविध प्रचारमाध्यमांतून वारेमाप जाहिराती ग्राहकांपुढे येत आहेत. अशा जाहिरातींवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करून लॉटरीच्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे. मात्र, हे परप्रांतीय दलाल, मुख्य वितरक व वितरक यांचे षड्यंत्र असून, त्यातून ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी खबरदारी घेणे ही काळाची गरज असल्याचे सातार्डेकर यांनी स्पष्ट केले.
पाचशे रुपयांच्या तिकिटावर १ कोटी २५ लाख रुपये, ४०० रुपयांच्या तिकिटावर १ कोटी २१ लाख रुपये, ३०० रुपयांच्या तिकिटावर १ कोटी ११ लाख रुपये, २५० रुपयांच्या तिकिटावर १ कोटी रुपये, ५०० रुपयांच्या तिकिटावर ३ कोटी रुपये, तसेच २५० रुपयांच्या तिकिटावर १ कोटी ५० लाख रुपये अशा भरमसाट बक्षिसांच्या रकमेची जाहिरात करण्यात येत आहे. मात्र, हे सर्व फसवे दावे आणि फसव्या बक्षिसांच्या रकमा आहेत. या चक्रात ग्राहकांनी तसेच विक्रेत्यांनीही फसू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महाराष्ट्र राज्यात ऑनलाइन लॉटरीला बंदी असूनही, कोणतीही परवानगी नसताना ऑनलाइन पेपर लॉटरी खुलेआम राज्यभर सुरू आहे. काही ठिकाणी पेपर लॉटरी थेट पोस्टाने तसेच कुरिअरद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. राज्य सरकार तसेच पोलीस खात्याला न जुमानता हा आर्थिक व्यवहार सुरू असल्याकडेही लॉटरी विक्रेता संघटनेने लक्ष वेधले आहे.
परप्रांतीय खलनायक दलाल विक्रेत्यांना खोटी आश्वासने व आमिषे दाखवून परप्रांतीय बोगस लॉटरी विक्रीसाठी विविध मार्गांनी दबाव आणत आहेत. मात्र, अनधिकृत असलेली ही लॉटरीची तिकिटे विक्रेत्यांनी अमान्य करावीत. काही ठिकाणी या बोगस लॉटरीचे अड्डे मटक्याप्रमाणे सुरू झाले आहेत. त्यामुळे अधिकृत राज्य लॉटरीची बदनामी होताना दिसत आहे.
दमदाटी करून लॉटरीची तिकिटे विक्री करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या गुंडांविरोधात विक्रेत्यांनी थेट लॉटरी संघटनेशी संपर्क साधावा आणि लॉटरी उद्योगाची प्रतिष्ठा व परंपरा शाबूत ठेवावी, असे कळकळीचे आवाहन विलास सातार्डेकर यांनी विक्रेत्यांना केले.
महाराष्ट्र राज्य हा बोगस लॉटरीचा छापखाना बनला आहे काय?
पोलीसांनाही न जुमानता खोटी-नाटी परवानगी दाखवून फसवणूक करणारे दलाल व वितरक हे कितीकाळ ग्राहक आणि विक्रेत्यांना वेठीस धरणार? बोगस कंपन्या, एजंट आणि दलाल यांच्यापुढे आपण शरणागती पत्करणार काय? कोट्यवधी रुपयांच्या बक्षिसांची तिकिटे महाराष्ट्रात विकून हा पैसा असाच परराज्यात जाणार काय?
हे प्रश्न उपस्थित करून लॉटरी विक्रेत्यांनी आता सावध राहावे. तसेच, या परप्रांतीय लॉटरी ठेकेदारांना न घाबरता पारदर्शक पद्धतीने व्यवसाय करावा, असेही विलास सातार्डेकर यांनी स्पष्ट केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा