मुंबई-(दत्ता खंदारे )कक्कया समाजाच्या वतीने ४ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित राज्यस्तरीय युवा परिवर्तन परिषदेच्या पूर्वतयारीसाठी रवि.दिनांक ६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता गणेश विद्या मंदिर,धारावी येथे बैठक घेण्यात आली. बैठकीस विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पालक आणि मोठ्या संख्येने युवक-युवती उपस्थित होते.
बैठकीचे सूत्रसंचालन उलेश खंदारे यांनी केले. यावेळी प्रथमच व्यासपीठ पूर्णपणे युवक-युवतींसाठी खुले ठेवण्यात आले. "तुम्हाला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे,ते स्वतः येऊन सांगा," असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी युवक-युवतींनी मनमोकळेपणाने मते मांडली. आदित्य खंदारे म्हणाला, पालकांना मुले डॉक्टर, इंजिनिअर व्हावीत असे वाटते, पण आमचे मत विचारात घेतले जात नाही. प्रणव कळंबे याने UPSC/MPSC पेक्षा व्यवसायात अधिक पैसा आणि संधी असल्याचे सांगितले. सीए सफल खंदारे याने व्यावसायिक शिक्षण घेऊन तज्ञांच्या मार्गदर्शनाने व्यवसाय करण्याचा सल्ला दिला.
पृथ्वीराज कदम याने नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यावर भर दिला, तर साई खरटमोल म्हणाला, मानसिक तणाव टाळण्यासाठी पालकांशी मनमोकळा संवाद गरजेचा आहे. डॉ. विनायक कोकणे यांनी पालकांच्या दबावामुळे मुलांमध्ये बीपी, हार्ट अटॅकचे प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त केली. सागर धडके यांनी धारावीतील छोट्या कारखान्यातून नवी मुंबईत कंपनी उभारल्याचा अनुभव सांगून AI चा वापर करण्याचे आवाहन केले.
दिव्या कदम, अर्बिता खंदारे यांनी पालक-पाल्यांतील कम्युनिकेशन गॅप आणि गुजराती-मारवाडी समाजाप्रमाणे मराठी युवकांनीही व्यवसायाकडे वळावे, असे मत मांडले. वैभवी पोळ हिने सोशल मीडियाचा चांगला वापर करण्याचे सांगितले.नतेस शेरखाने, विकी व्हटकर ,मनीषा कटके,नीला सोनवणे यांनीही मार्गदर्शन केले.
सचिन शेरखाने यांनी सांगितले की, ३० ऑगस्ट रोजी झालेल्या ज्येष्ठांच्या बैठकीत राजेश खंदारे, सूर्यकांत इंगळे, नर्सिंग कावळे यांनी ही संकल्पना मांडली. संजय कावळे म्हणाले, मराठा समाजाप्रमाणे आपणही एकत्र यायला हवे.
समारोपप्रसंगी राजेश खंदारे म्हणाले, गरीब विद्यार्थ्यांना मदत आणि तज्ञ मार्गदर्शनासाठी हे व्यासपीठ निर्माण केले आहे. ४ ऑक्टोबरची परिषद युवकांनीच यशस्वी करावी. सूर्यकांत इंगळे यांनी मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथे पुढील बैठका घेण्याचे आवाहन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा