मुंबई : पंतनगर येथील साईबाबा उद्यानातील विरंगुळा व सांस्कृतिक केंद्रात ज्येष्ठ नागरिक संघाची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहात पार पडली. सभेस फेसकॉमचे अध्यक्ष - सुरेश पोटे यांची उपस्थिती लाभली.
सभेत सन २०२५-२६ च्या वार्षिक अहवालाचे वाचन करण्यात आले व उपस्थित सभासदांनी एकमताने त्यास मंजुरी दिली. संघाच्या विविध उपक्रमांचा आढावा, आगामी वर्षाचे नियोजन आणि सभासदांच्या सूचना व विचारांची देवाण-घेवाण यावर चर्चा झाली. यावेळी श्री. पोटे यांनी सभासदांना मार्गदर्शन केले तसेच कार्यकारिणी सदस्यांना संस्थेची घटना, नियम व कार्यपद्धती याबाबत माहिती दिली. संघाच्या उपक्रमांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
संघाचे अध्यक्ष -रामचंद्र मोदी, सचिव - उत्तम तळेकर आणि खजिनदार - शिल्पा शेट्ये यांच्या हस्ते सुरेश पोटे यांचा सत्कार करण्यात आला. सभासदांनी मांडलेल्या सूचना व प्रश्नांचे कार्यकारिणीने समाधानकारक निरसन केले.
सभा संपल्यानंतर जुलै व ऑगस्ट महिन्यातील सभासदांचा वाढदिवस सोहळा साजरा करण्यात आला. श्री. रामदास कामत यांनी ‘आझादी की जंग – फिल्म के संग’ हा देशभक्तीपर कार्यक्रम सादर केला. भारतीय जवानांचे शौर्य, पराक्रम आणि बलिदान यांचे हृदयस्पर्शी वर्णन त्यांनी केले. यावेळी भारतीय सैन्यातून निवृत्त झालेले वीर जवान- तुकाराम मोरे व मधुकर मोरे यांनी युद्धभूमीवरील थरारक अनुभव कथन केले. मातृभूमीच्या रक्षणासाठी सोसलेल्या हालअपेष्टांचे वर्णन ऐकून अनेक सभासद भावूक झाले. समारोप प्रसंगी सामूहिक राष्ट्रगीत ‘जन गण मन’ म्हणून राष्ट्रप्रेमाने भारलेल्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा