आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २३ ऑगस्ट, २०२६

"संवाद कवीशी - संवाद कवितेशी" बहारदार कार्यक्रम संपन्न

मुंबई प्रतिनिधी: (विलास देवळेकर) डोंबिवली ग्रंथसंग्रहालय ( पश्चिम ) या संस्थेने शनिवार दि.२२ ऑगस्ट २०२६ रोजी संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत ग्रंथसंग्रहालयात सन्माननीय कवी विजो (विजय जोशी) यांचा 'संवाद कवीशी - संवाद कवितेशी ' हा मुलाखतपर कार्यक्रम आयोजित केला होता.
     प्रारंभी कविश्रेष्ठ द. भा. धामणस्कर यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि शीतल दिवेकर यांनी त्यांची 'फुलांचे जिणे' ही कविता वाचून द. भा. धामणस्कर यांना शब्दांजलीही वाहिली. डोंबिवली ग्रंथसंग्रहालय पश्चिम यांचे कोषाध्यक्ष प्रमोद सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन कवी विजो यांचे स्वागत केले. सचिव गीता रीठाल यांनी प्रास्ताविक केले.
      कवी विजो जवळपास २५ वर्षे साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत. नोकरीत व्यस्त असतानाही त्यांनी आपला काव्यप्रवास चालूच ठेवला, वाढवत नेला. ओंजळ , मनतरंग, अंतःस्थ मनात, अंतरंगाचे तरंग, टोपीवाले फुगे (बाल कविता संग्रह), वृत्तबद्ध कविता ते गझल ( तंत्र आणि मंत्र ) हे कवितेविषयक तंत्र सांगणारे पुस्तक अशी त्यांची साहित्य संपत्ती आहे. त्यांच्या 'बाया' नामक कवितेचा आजवर ६१ भाषांमध्ये अनुवाद झालेला असून हा जागतिक विक्रम झाला आहे.
       कवी विजो यांच्याशी डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षा शीतल दिवेकर यांनी संवाद साधला. त्यात विजो यांना त्यांच्या काव्यप्रवासाविषयी प्रश्न विचारले गेले. तसेच वृत्तबद्ध, छंदोबद्ध, मुक्तछंद कविता म्हणजे काय याबाबतही प्रश्न विचारला असता विजय जोशी यांनी योग्य शब्दांत विवेचन केले. या संवादात त्यांनी आपल्या वेगवेगळ्या, अर्थपूर्ण कविता म्हणूनही दाखवल्या. यात गझल, मुक्तछंदातील कविता, 'बाया' ही मूळ कविता व बाया कवितेची अनुवादित हिंदी कविता अशा अनेक कवितांचा समावेश होता. त्याच्या मालवणी भाषेतील कविता अधिक रसाळ वाटल्या. टोपीवाले फुगे या बालकविता संग्रहातील गणपती बाप्पाविषयीची कविता फारच भावली. 
ही काव्यसंध्या दर्दी रसिकांना आनंद देऊन गेली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

"संवाद कवीशी - संवाद कवितेशी" बहारदार कार्यक्रम संपन्न

मुंबई प्रतिनिधी: (विलास देवळेकर) डोंबिवली ग्रंथसंग्रहालय ( पश्चिम ) या संस्थेने शनिवार दि.२२ ऑगस्ट २०२६ रोजी संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत ग्रं...