मुंबई (रवींद्र मालुसरे )- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान घडवताना भारतातील विविधता लक्षात घेत बहुपक्षीय संसदीय लोकशाही दिली. पण गेल्या काही दशकांमध्ये पक्षांतर आणि आता तर थेट पक्षचोरीचा आरोप होत, पक्षांचंच अस्तित्व संपवण्यास सुरुवात केली आहे. बहुपक्षीय संसदीय लोकशाहीला अशी वाळवी लागत पक्षच संपू लागले, तर लोकशाहीच उरेल कशी? . मुद्दा फक्त शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपा या पक्षांपुरता किंवा त्या त्या पक्षांचे ठाकरे, शिंदे, पवार, फडणवीस, मोदी, शाह, गांधी या राजकीय नेत्यांपुरता मर्यादित नाही. त्याची व्यापकता समजणं, गरजेचं आहे. हा संसदीय लोकशाहीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे असे मत राजकीय विश्लेषण मुक्तपीठचे संपादक तुळशीदास भोईटे यांनी वृत्तपत्र लेखकांच्या समोर मांडले.
काशिनाथ धुरू हॉल ट्रस्टच्या दादर सार्वजनिक वाचनालयात मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबईचा ७७ वा वर्धापन दिनाचा व वृत्तपत्र लेखक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी भोईटे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे माजी प्रमुख कार्यवाह विश्वनाथ पंडीत तर पोलादपूर तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवराम उतेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
भोईटे पुढे असेही म्हणाले की, हातातील दोन विषय बाजूला ठेवून देशवासीयांसमोर येत असलेली सध्याची राजकीय परिस्थिती सर्वांनाच अस्वस्थ करून सोडत आहे, त्यामुळे मी तिसरा विषय हाती घेतला तो संविधानाचा. आपल्या राष्ट्रग्रंथाचा. सोबत सभोताली आजवर घडत आलेल्या, घडत असलेल्या, घडू शकणाऱ्या राजकारणाचा वेधही घेण्याचा अभ्यासपूर्ण प्रयत्न केला आहे. सभोवतालचं वास्तव प्रत्येकाला कळलं पाहिजे. राष्ट्रग्रंथ संविधानात नेमकं काय आहे, तोच जगातील सर्वोत्तम कसा तेही सोप्या शब्दात समजलंच पाहिजे. त्यातून त्याच्या कसोटीवर सारं काही पाहण्याची सवय लागलीच पाहिजे.
सामाजिक कार्यकर्ते शिवराम उतेकर यांनी परिस्थिती कशीही असो माणसाने आपल्या आयुष्याचे ध्येय ठरवले पाहिजे, त्याचबरोबर आपण समाजाचे काही देणं लागतो या भावनेतून विशेषतः परिस्थतीशी झगडणाऱ्या लोकांसोबत आपण माणुसकीच्या भावनेतून उभे राहायला हवे. वृत्तपत्र लेखक हेच काम हातात लेखणी धरून निर्भिडपणे आणि निस्वार्थीपणे करीत असतो.
संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी १९४९ पासूनच्या संस्थेच्या चळवळीचा आढावा घेतला. वृत्तपत्र लेखक हा ऐकतो, बोलतो, वाचतो आणि मग लिहितो, याच अनुषंगाने
आज दिल्ली दरबारी डाव प्रतिडाव चाललेल्या व देशभर घुसळण चाललेल्या महत्त्वाच्या विषयावर समाजाचे जागले अर्थात वृत्तपत्र लेखकांच्या सहभागाने हि मुक्त चर्चा या वर्धापनदिनी आपण करीत असल्याचे सांगितले. यावेळी आदर्श वार्ताहर पाक्षिक व न्यूज पोर्टलचे संपादक पंकजकुमार पाटील यांचा "प्रभाकर पाध्ये स्मृती पुरस्कार" प्रदान करून गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम प्रमुख दिगंबर चव्हाण तर आभार प्रदर्शन कार्यवाह नितीन कदम यांनी केले. माजी अध्यक्ष विजय कदम आणि कार्यक्रम प्रमुख सुनील कुवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष रमेश सांगळे, माजी अध्यक्ष प्रकाश नागणे, दत्ताराम गवस, राजन देसाई, रामचंद्र जयस्वाल, अब्बास आतार, श्रीनिवास डोंगरे, विवेक तवटे, सतीश भोसले, दिलीप दळवी यांनी विशेष मेहनत घेतली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा