तुंगारेश्वर पर्वत शिखरावरील पुराण प्रसिद्ध तीर्थक्षेत्र परशुराम कुंड येथील महान संत विभुती बालयोगी सदानंद महाराज यांचा ६८ वा जन्मदिन सोहळा - वाढदिवस गुरुवार ता . २७ आणि शुक्रवार ता. २८ ऑगस्ट २०२६ रोजी श्रावण पौर्णिमा - नारळी पौर्णिमा रक्षाबंधन या मंगलदिनी परशुराम कुंडावरील बालयोगी सदानंद महाराज आश्रमात साजरा झाला . बालयोगी सदानंद महाराज कधीही कुणाला चरण स्पर्श करून देत नाहीत . मात्र रक्षाबंधनाच्या दिवशी ते मोठ्या प्रेमाने आपल्या अनुयायांकडून हाताला राखी बांधून घेत असतात . आणि त्यामुळेच संत सद्गुरू सदानंद बाबांच्या भक्तांसाठी राखी पौर्णिमा हा दिवस म्हणजे ब्रह्मानंदाचा असतो.
जगद्गुरु नित्यानंद स्वामींच्या कृपाप्रसादाने माता पार्वती आणि मोठेबाबा वैजनाथ महाराज यांच्या उदरी राई गाव ( भाईंदर पश्चिम ) येथे बालयोगी सदानंद महाराजांचा जन्म ता. २९ ऑगस्ट १९५८ रोजी श्रावण पौर्णिमा - रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर पहाटे ३ वाजून १० मिनिटांनी झाला . बारा वर्षे बाळ सदानंदाने राई गावात आपले बालपण व्यतीत केले आणि दैवी साक्षात्कार झाल्याप्रमाणे बाराव्या वर्षी ईश्वरी तपश्चर्येसाठी बालयोगी सदानंद महाराजांनी २७ एप्रिल १९७१ रोजी राई गाव आणि घरादाराचा त्याग केला . आणि तुंगारेश्वर पर्वतावरील सर्वोच्च शिखरावरील भयान अरण्यात परशुराम कुंड येथे त्यांनी तपसाधनेला प्रारंभ केला . आज या घटनेला ५५ वर्षे झाली आहेत . या ५५ वर्षांच्या तपश्चर्येच्या काळात बालयोगी सदानंद महाराजांना अनेक खडतर प्रसंगांना तोंड द्यावे लागले . पण त्यांनी तपसाधना ढळू दिली नाही . बालयोगी सदानंद महाराजांच्या जीवन कार्यावर दृष्टिक्षेप टाकला तर महाराष्ट्रातील अनेक संत महात्म्यांच्या जीवनातील घटना आणि सदानंद बाबांच्या जीवन कार्यातील घटना जवळ जवळ सारख्या असल्याचे आढळून येते .आणि मनात प्रश्न उपस्थित होतो बालयोगी सदानंद महाराज ही महान संत विभुती नक्की आहे तरी कोण?
कोण आहेत सदानंद महाराज? ज्ञानियांचा राजा म्हणून ओळखले जाणारे माऊली संत ज्ञानेश्वर महाराज ? संत श्रेष्ठ नामदेव महाराज ? समर्थ रामदास स्वामी ? संत एकनाथ महाराज ? संत तुकाराम महाराज ? की संत सावता माळी ? महाराष्ट्रातील अनेक संतांच्या जीवनाचा मागोवा घेतला तर आपणाला सदानंद महाराजांच्या जीवनकार्यात आणि महाराष्ट्रातील संत महात्म्यांच्या जीवन कार्यात अनेक साम्यस्थळे आढळून येतात आणि मती गुंग होते. विश्व माऊली संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनात लहानपणी जे महाभारत घडले त्याचीच पुनरावृत्ती सदानंद बाबांच्या बालपणी अनुभवायास आली . माऊली ज्ञानेश्वरांना त्यावेळच्या ब्रह्मवृंदाने अक्षरश: छळले. संन्याशाची मुले म्हणून त्यांची अवहेलना केली. अगदी जाणतेपणी ब्रह्मवृंदाने आणि समाजाने ज्ञानेश्वर महाराजांना अपमानित केले . सदानंद बाबांच्या बाबतीत थोड्याफार फरकाने हाच प्रकार घडला . मात्र हे सारे अजाणतेपणी घडले . एका दैवी संत विभूतीने आपल्या भूमीत जन्म घेतला आहे हे ज्ञात नसल्याने सदानंद बाबांना काही लोकांकडून बालपणी टीका - चेष्टा सहन करावी लागली . मात्र सदानंद बाबांचे वय त्यावेळी अगदीच लहान असल्याने त्याचे प्रत्यक्ष चटके बाबांना बसले नाहीत . तरी माता पार्वती आणि वैजनाथ बाबा यांना मात्र सारे मुकाट्याने सहन करावे लागले . मात्र ज्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना बालपणी छळले तोच ब्रह्मवृंद माऊलींचे खरे अवतारी रूप दिसून येतात ज्ञानेश्वर महाराजांना शरण गेला . अगदी तोच प्रकार सदानंद बाबांच्या बाबतीत ही घडला . सदानंद महाराज बालपणी अंगावर कपडे घालत नव्हते . केसांच्या जटा आणि दिगंबर अवस्थेत ते वावरत असत . त्यामुळे त्यांच्यावर टीका केली गेली. पण कालांतराने सदानंद महाराज दैवी विभुती आहेत , योगी आहेत हे लक्षात येताच त्यांच्यावर टीका करणारे पुढे बाबांचे कायमचे भक्त बनले आणि सदानंद बाबांच्या चरणी नतमस्तक झाले . संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या अवघ्या सोळा वर्षी जगतवंद्य असणारी संस्कृत भाषेतील भगवद्गीता ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या रुपाने सर्वसामान्यजनांच्या दारी नेली. आणि तीच श्री ज्ञानेश्वरी मराठी हिंदीत रुपांतरीत करून अवघ्या बाराव्या वर्षी डोक्यावर घेऊन सदानंद महाराजांनी भारतभर भ्रमण केले . इतकेच नव्हे तर भारताबाहेर परदेशातही ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा प्रसार केला . साडेसातशे वर्षांपूर्वी श्रीक्षेत्र काशीच्या ब्रह्मवृंदांनी माऊली ज्ञानेश्वर महाराजांना मानाची पगडी घालून सन्मान केला होता . अगदी त्याच श्रीक्षेत्र काशीच्या ब्रह्मावृंदानी बालयोगी सदानंद महाराजांना साडेसातशे वर्षानंतर मानाची पगडी घालून सन्मान करावा हा योगायोग नव्हे तर सदानंद महाराज म्हणजेच माऊली ज्ञानेश्वर ब्रह्मसत्य दर्शवणारा ईश्वरी संकेत होय .
सदानंद महाराजांनी हजारो अनुयायांसह भारतातील सर्व प्रमुख तीर्थक्षेत्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायणे केली. सदानंद बाबांनी भक्तगणांसमवेत भूवैकुंठ पंढरपूर, नाशिक, नेवासा, श्रीक्षेत्र काशी, हरिद्वार, द्वारका , मथुरा वृंदावन, गंगासागर , जगन्नाथपुरी , पंजाबमधील घुमान आदी भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्री श्री ज्ञानेश्वरीची सामुदायिक पारायण केली . इतकेच नव्हे तर बाबांनी मॉरिशस, कॅनडा, श्रीलंका सारख्या परदेशातही शेकडो अनुयायांच्या उपस्थितीत श्री ज्ञानेश्वरीची सामुदायिक पारायणे आयोजित करून इतिहास निर्माण केला .
रामदास स्वामींच्या गृहत्यागाची कथा बालयोगी सदानंद महाराजांच्या गृहत्यागाशी मिळतीजुळती आहे. रामदास स्वामी ईश्वरी तपसाधनेसाठी वयाच्या बाराव्या वर्षी लग्नाच्या बोहल्यावरून पसार झाले. आणि समर्थ रामदास स्वामी बनले. दुसरीकडे सदानंद महाराज बाराव्या वर्षी घरादाराचा त्याग करून तपसाधनेसाठी तुंगारेश्वर पर्वतासारख्या घोर अरण्यात निघून गेले. रामदास स्वामींनी रामनामाचा संदेश दिला तर सदानंद महाराजांनी " राम " आपल्या हृदयी धारण केला. दोन्ही संतांनी कधीही कुणाला पाद्यपूजा करू दिली नाही. १२ व्या वर्षी गृहत्याग करणारा नारायण -- " रामदास स्वामी " बनले तर १२ व्या गृहत्याग करणारा सदानंद - " बालयोगी सदानंद महाराज " बनले . हा योगायोग काय दर्शवतो ?
संत श्रेष्ठ नामदेव महाराजांची महती काय वर्णावी? परब्रम्ह पांडुरंगाच्या मंदिराची पहिली पायरी संत नामदेवाची असावी यापेक्षा भक्ताची परमेश्वराकडून काय अपेक्षा असणार ? संत नामदेवांचे कार्य इथेच संपत नाही. श्रीहरीचा वारकरी बनवून विठ्ठल नामाची ध्वजपताका पार पंजाबपर्यंत नेण्याचे महान कार्य करणारे संत नामदेव महाराज यांनी केले . आणि पुंडलिक वरदा हरी विठ्ठल , ज्ञानदेव तुकारामचा जयघोष करीत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी डोक्यावर घेत अवघ्या भारतभर संचार केला . नामदेवांनी वारकरी संप्रदायाची पताका अर्थात भागवत धर्म पंजाबपर्यंत नेला तर बालयोगी सदानंद महाराजांनी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायणाची गंगा थेट पंजाबपर्यंत नेली . आणि हजारो अनुयायांच्या उपस्थितीत पंजाबमधील घुमान येथे सामुदायिक ज्ञानेश्वरी पाराणाचा सोहळा साकार केला . या दोन्ही संतांनी महाराष्ट्रापासून दूर असलेल्या पंजाबमध्ये भागवत धर्माचा प्रसार केला. हा योगायोग काय दर्शवतो?
संत सावता माळ्याने कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी म्हणत मळ्यातच भक्तीचा मळा फुलविला आणि सदानंद महाराजांनी तुंगारेश्वर पर्वतात वनौषधीचा शोध घेत रामनामाचा मळा फुलविला . एकनाथ महाराजांच्या मानवतेची कथा काय वर्णावी ?अंत्यजांच्या मुलांना जेऊ घालणारे संत एकनाथ महाराज मानवतेचे पुजारी ठरले .माणसात देव पाहणाऱ्या संत एकनाथांनी जात पात न पाहता जणू मानव जातीला हृदयाशी धरले . आज सदानंद महाराज यांच्या आश्रमात तेच चित्र दिसते . संतश्री बालयोगी सदानंद महाराजांच्या आश्रमात जात-पात , पंथ , गरीब श्रीमंत या भेदाला थारा नाही . एकनाथ महाराज यांच्या प्रमाणे सदानंद महाराज आश्रमांत फक्त एकच जात पाहिली जाते आणि ती म्हणजे मानवजात . आणि म्हणूनच एकनाथ महाराज आणि सदानंद महाराजांच्या कार्यातील साम्य आपल्या लक्षात येते. कीर्तनात रंगलेले सदानंद महाराज प्रसंगी संत शिरोमणी तुकाराम महाराज बनून जातात . तर श्रीक्षेत्र गणेशपुरीचे संत जगद्गुरु नित्यानंद स्वामींच्या नजरेतील ब्रह्मतेज आजही सदानंद महाराजांच्या नजरेत आपणाला दिसून येते .
बालयोगी सदानंद महाराज केवळ जपतप , भक्ती साधना , होमहवन , भजन ,कीर्तन या धार्मिक कार्यातच रमले नाहीत तर त्यांनी तुंगारेश्वर पर्वतातील वनौषधी वनस्पतींचा शोध घेऊन कर्करोग, क्षय, संधिवात, दमा , कावीळ , मधुमेह , मणक्यांचे विकार तसेच स्त्रियांचे आजार अशा अनेक दुर्घर रोगांवर शंभरहून अधिक प्रकारच्या औषधांची निर्मिती केली आहे .आणि आजवर हजारो रुग्णांवर औषध उपचार करून त्यांना रोगमुक्त केले आहे .
श्री सद्गुरु बालयोगी सदानंद महाराजांच्या आश्रमात अंधश्रद्धेला स्थान नाही . बाबांच्या आश्रमात ना मंत्र तंत्र, ना गंडा दोरा, ना चरणस्पर्श, ना आशीर्वाद, ना पाद्यपूजा, ना दरबार....... फक्त राम नामाचे स्मरण!
सद्गुरुंची आराधना !!
- केदारनाथ पाटील ( पत्रकार )
जूचंद्र - वसई
९२२६९३८७२०
********************************
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा