मुंबई (सतिश पाटील ): राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ (भारत सरकार मान्यता प्राप्त) यांच्या मार्फत पत्रकारांच्या प्रश्नांकडे तसेच पत्रकारांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील पत्रकारांच्या सहभागासह मुंबईतील आझाद मैदान येथे दोन दिवसांचे आंदोलन करण्यात येणार आहे. पत्रकारांच्या हक्क, सुरक्षा, कल्याण तसेच शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांची तातडीने पूर्तता करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
पत्रकार हा लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ असून, समाजातील विविध प्रश्न शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम तो सातत्याने करीत असतो. मात्र, पत्रकारांच्या अनेक मूलभूत प्रश्नांकडे दीर्घकाळापासून दुर्लक्ष होत असल्याची भावना पत्रकार संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पत्रकारांच्या प्रलंबित मागण्यांवर शासनाने ठोस निर्णय घ्यावा, पत्रकारांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, पत्रकार कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी तसेच पत्रकारांना भेडसावणाऱ्या आर्थिक व सामाजिक अडचणी दूर करण्यासाठी ठोस धोरण राबवावे, अशा विविध मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहेत.आझाद मैदानात होणाऱ्या या दोन दिवसीय आंदोलनात राज्यातील विविध भागांतील पत्रकार आणि पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधून प्रलंबित मागण्यांबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, पत्रकारांच्या मागण्यांबाबत शासनाने गांभीर्याने विचार करून चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवावेत, अशी अपेक्षा पत्रकारांकडून व्यक्त होत आहे. आंदोलनानंतरही मागण्यांबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येणार असल्याचेही यावेळी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा