ग्रामसभेत ऐतिहासिक ठराव ; महिलावर्गाकडून निर्णयाचे स्वागत
वासिंद ( हर्षल शेलवले): शहापूर तालुक्यातील शेरे ग्रामपंचायतीने व्यसनमुक्तीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत गावात दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत हा महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात आला. ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे ग्रामस्थांसह विशेषतः महिलावर्गातून स्वागत होत आहे.
यावेळी शेरे गावचे तरुण तडफदार उपसरपंच योगेश भगवान तारमळे यांनी ग्रामपंचायत हद्दीत दारू विक्री करणाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला. ग्रामपंचायत हद्दीत दारूबंदी करण्यात आली असून, यापुढे कोणीही दारूची विक्री करू नये. दारू विक्री करताना कोणी आढळून आल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
गावातील तरुणाई आणि नागरिकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने घेतलेला हा निर्णय निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
या निर्णयामुळे तालुक्यातील महिला वर्गात आनंदाचे वातावरण असून, इतर ग्रामपंचायतींनीही शेरे ग्रामपंचायतीचा आदर्श घेऊन आपल्या गावात दारूबंदीचा ठराव करावा, अशी मागणी महिलावर्गातून होत आहे.
शेरे ग्रामपंचायतीने घेतलेल्या या धाडसी निर्णयामुळे शेरे गावाची व्यसनमुक्तीकडे वाटचाल सुरू झाली असून, तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायतीचा एक नवा आदर्श निर्माण झाला आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा