शिवसेना माहीम विधानसभा आणि धगधगती मुंबई परिवाराचा सामाजिक उपक्रम; दिव्यांग विद्यार्थिनींचा होणार सन्मान
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माहीम विधानसभा यांच्या वतीने आणि धगधगती मुंबई परिवाराच्या सहकार्याने यंदाच्या दहीकाला उत्सवानिमित्त ‘एक हंडी दिव्यांगांसाठी’ हा विशेष सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार, ४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता कमला मेहता अंध मुलींची शाळा, दादर पूर्व येथे हा विशेष कार्यक्रम होणार आहे.
दहीकाला उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा उपक्रम यंदाही राबविण्यात येत असून, दिव्यांग विद्यार्थिनींना दहीकाला उत्सवाचा आनंद घेता यावा आणि त्यांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने त्यांच्या शाळेतच ‘एक हंडी दिव्यांगांसाठी’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात दिव्यांग विद्यार्थिनींचा विशेष सन्मान करण्यात येणार असून, त्यांना सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. दिव्यांग बांधवांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची विशेष काळजी घेऊन हा उपक्रम शाळेच्या परिसरात आयोजित करण्यात आला आहे.
धगधगती मुंबई परिवाराच्या वतीने दरवर्षी दहीकाला उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात. अनाथाश्रम, वृद्धाश्रम, कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान यांसारखे विविध सामाजिक उपक्रम यापूर्वी राबविण्यात आले आहेत. याच सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून यंदा दिव्यांग विद्यार्थिनींसाठी विशेष दहीकाला उपक्रम राबविण्यात येत आहे.
दरम्यान, शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत केशव दाते उद्यान, डॉ. आगाशे पथ, भवानी शंकर रोड, दादर पश्चिम येथे मुख्य दहीकाला उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांसाठी रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि विविध बक्षिसे देण्यात येणार असून, एकूण २ लाख ५१ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजक श्री. यशवंत विचले, माहीम विधानसभा निरीक्षक (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तसेच धगधगती मुंबई परिवाराचे पत्रकार श्री. भीमराव बाळकाबाई हिंदुराव धुळप हे आहेत.
‘एक हंडी दिव्यांगांसाठी’ या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश देतानाच दिव्यांग विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा