आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ६ जुलै, २०२६

पाईपलाईनचा अडथळा, गडब गावात पुराचा विळखा ; मुसळधार पावसाने कहर; गडबमधील सखल भागातील घरांत पाणी

आश्वासनांची बरसात, उपाययोजनांचा दुष्काळ; गडबकरांचे हाल!
गडब (अवंतिका म्हात्रे): पेण तालुक्यातील गडब गावात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गावातून वाहणाऱ्या नाल्याची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक कुटुंबांचे आर्थिक नुकसान झाले असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.      स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गावातील नाल्यातील पावसाचे पाणी नैसर्गिकरित्या खाडी व समुद्राकडे वाहून जात असते. मात्र, जेएसडब्ल्यू कंपनीने टाकलेल्या पाईपलाईनमुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बाधित होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे पाणी साचून राहून गावात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
      दरवर्षी या समस्येबाबत कंपनी प्रशासनाला वारंवार सूचना आणि तक्रारी करण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पाणी अडल्यामुळे सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरून घरगुती साहित्य, धान्य तसेच इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
        दरम्यान, या समस्येसंदर्भात ग्रामपंचायतीची भूमिकाही प्रश्नचिन्हाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नागरिकांच्या मते, प्रत्येक वर्षी समस्या सोडविण्याची आश्वासने दिली जातात, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याने परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याचे दिसत आहे.
      ग्रामस्थांकडून आता प्रशासनाने आणि संबंधित कंपनीने तातडीने दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पाईपलाईनचा अडथळा, गडब गावात पुराचा विळखा ; मुसळधार पावसाने कहर; गडबमधील सखल भागातील घरांत पाणी

आश्वासनांची बरसात, उपाययोजनांचा दुष्काळ; गडबकरांचे हाल! गडब (अवंतिका म्हात्रे): पेण तालुक्यातील गडब गावात सुरू असलेल्या मुसळधार ...