आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, ११ जुलै, २०२६

पेण तालुक्यातील मत्स्यशेतकऱ्यांना पूराचा फटका'! भरीव मदतीची मागणी - राजेंद्र झेमसे

गडब (अवंतिका म्हात्रे): पेण तालुक्यात मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून जन-जीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांमध्ये नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. भातशेती पाण्या खाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून महसूल व कृषी विभाग जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली नुकसान ग्रस्त घरांचे व शेतीचे पंचनामे करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र, पेण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मत्स्यशेती होत असतानाही मत्स्यशेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी सक्षम शासकीय यंत्रणा उपलब्ध नसल्याने मत्स्यशेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जिल्हा भरासाठी मत्स्य विभागाचे एकच कार्यालय आणि अपुरा कर्मचारीवर्ग असल्यामुळे पूरग्रस्त मत्स्यतलावांची पाहणी व पंचनामे वेळेत होण्या बाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
     पेण तालुक्यातील अनेक मत्स्यतलाव पाण्या खाली गेल्याने मोठ्या प्रमाणावर मत्स्यबीज व विक्री योग्य तयार मासे वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मत्स्यतलावांचे बांध फुटणे, पाण्याचा अनियंत्रित प्रवाह आणि मत्स्य तलावां मधून मासे बाहेर जाणे यामुळे अनेक मत्स्यशेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही परिस्थिती नवीन नसून यापूर्वीच्या पूरपरिस्थितीतही अशीच अवस्था निर्माण झालेली होती. त्या वेळीही मत्स्यशेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळविण्यासाठी अनेक आंदोलने करावी लागली होती. तरी देखील नुकसानाच्या तुलनेत अत्यल्प मदत मिळाल्याची खंत आजही मत्स्यशेतकरी व्यक्त करीत आहेत. परिणामी, प्रत्येक पूरस्थिती नंतर मत्स्यशेतकरी प्रशासनाच्या दारात न्यायासाठी हेलपाटे मारण्यास भाग पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यावेळी मत्स्य विभागाने तातडीने स्वतंत्र पथके नेमून नुकसान ग्रस्त मत्स्य तलावांचे पंचनामे करण्याची आणि प्रत्येक बाधित मत्स्यशेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याची मागणी जोर धरत आहे.
     मत्स्यशेती हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ बनत असताना, नैसर्गिक आपत्तीच्या काळात या क्षेत्राकडे होणारे दुर्लक्ष चिंताजनक आहे. घरांचे, शेतीचे आणि इतर मालमत्तेचे पंचनामे ज्या तत्परतेने केले जातात, त्याच गांभीर्याने मत्स्यशेतकऱ्यांच्या नुकसानीची नोंद घेणेही तितकेच आवश्यक आहे. पूर ओसरल्या नंतर पंचनामे करण्यात विलंब झाल्यास प्रत्यक्ष नुकसानीचा पुरावा नष्ट होण्याची शक्यता असते आणि त्याचा फटका थेट शेतकऱ्यांनाच बसतो. त्यामुळे पेण तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्त मत्स्यतलावांचे तातडीने पंचनामे करून त्यांना भरीव आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच भविष्यात अशा आपत्तीच्या काळात तत्काळ कार्यरत होईल अशी स्वतंत्र व सक्षम मत्स्य विभागीय यंत्रणा तालुका स्तरावर उभी करण्याची मागणी पेण तालुक्यातिल मत्स्यशेतकऱ्यां कडून होत आहे.

  [  पेण तालुक्यात यापूर्वीही पुरामुळे मत्स्य तलाव धारक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेले आहे. एकरी लाखो रुपयांचे नुकसान होऊनही केवळ चार ते सडेचार हजार इतकी तुटपुंजी मदत मत्स्य शेतकऱ्यांना शासना कडून मिळते. या संदर्भात शासनाने तातडीने अभ्यास समिती नेमून मत्स्यशेतकऱ्यांसाठी वास्तववादी व न्याय्य नुकसान भरपाईचे स्वतंत्र धोरण जाहीर करावे.]

राजेंद्र झेमसे (सामाजिक कार्यकर्ता) वाशी, पेण- रायगड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पेण तालुक्यातील मत्स्यशेतकऱ्यांना पूराचा फटका'! भरीव मदतीची मागणी - राजेंद्र झेमसे

गडब (अवंतिका म्हात्रे): पेण तालुक्यात मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्मा...