मुंबई(शांताराम गुडेकर): समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची खरी ओळख ही पुरस्कारांमुळे नव्हे, तर जनतेच्या मनातील स्थानामुळे होत असते. मात्र अशा निःस्वार्थ सेवेला जेव्हा सन्मानाची जोड मिळते, तेव्हा तो क्षण अधिकच अभिमानास्पद ठरतो. अशाच एका आनंददायी क्षणी लोकनिर्माणचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार श्री. बाळकृष्ण कासार यांची 'सर्वोत्कृष्ट समाजसेवक – २०२६' या राज्यस्तरीय पुरस्काराने मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
मुंबईस्थित शिर्के जनकल्याण प्रतिष्ठानतर्फे पत्रकारिता, समाजसेवा, जनजागृती आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडण्याच्या त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात येतो.पत्रकारिता हे केवळ वृत्त देण्याचे माध्यम नसून समाजाला दिशा देण्याचे प्रभावी साधन आहे. ही भूमिका प्रामाणिकपणे पार पाडत, अनेक वंचित, गरजू आणि सामान्य नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून न्याय मिळवून देण्याचे कार्य श्री. कासार यांनी सातत्याने केले आहे. समाजाप्रती असलेली त्यांची बांधिलकी, सेवाभाव आणि निस्वार्थ वृत्ती याचाच हा गौरव मानला जात आहे.
संपादक बाळकृष्ण कासार लोकनिर्माण हे वृत्तपत्र गेली सतरा वर्षे अनेक जिल्ह्यांत अखंडित वितरीत आहेत. त्याशिवाय लोकनिर्माण प्रिंट अॅंड डिजिटल मिडीयाचे ते मुख्य संपादक आहेत. तर लोकनिर्माण प्रतिष्ठान या राष्ट्रीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आहेत. रोखठोक आणि निर्भिड पत्रकारिता करत असल्यामुळे त्यांना दोन आंतरराष्ट्रीय, चार राष्ट्रीय आणि राज्य असे एकूण ५३ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
पुरस्कार वितरण सोहळा दि. २६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४.३० ते ७.३० या वेळेत सुरेंद्र गावस्कर हॉल, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर (पूर्व), मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे श्री. जगन्नाथ हेगडे मा. नगरपाल, श्री. सुकृत खांडेकर जेष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक, श्री. अनंत कळसे मा. प्रधान सचिव महाराष्ट्र विधीमंडळ, श्री. गणेश यादव मराठी हिंदी सिने अभिनेता, अॅड श्री. सुनिल शिर्के संस्थापक अध्यक्ष शिर्के जनकल्याण प्रतिष्ठान मुंबई आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा