मुंबई (सतिश पाटील ): बेस्ट बस चालकाने केवळ शेवपुरी पार्सल घेण्यासाठी आपली बस २० मिनिटांहून अधिक वेळ भररस्त्यात थांबवून ठेवल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली
मुलुंड पश्चिम स्थानकाजवळील अत्यंत गजबजलेल्या एम. जी. रोडवर एका बेस्ट बस चालकाने केवळ शेवपुरी पार्सल घेण्यासाठी आपली बस २० मिनिटांहून अधिक वेळ थांबवून ठेवली. यामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली. अन्य वाहन चालकांनी याचा जाब विचारताच, बस चालकाने गैरवर्तन केले. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यामुळे बेस्टच्या संबंधित आगारप्रमुखांना मुजोर चालकाच्या विरोधात कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
गजबजलेल्या रस्त्यात शेवपुरीसाठी बस थांबवली
बेस्ट बस चालकाने मुलुंड एम. जी. रोडवर शेवपुरी पार्सल घेण्यासाठी बुधवारी सायंकाळी भररस्त्यात बस थांबवली. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली. खाद्यपदार्थ हातात मिळेपर्यंत बस उभीच राहिल्याने मागे उभे असलेल्या अन्य वाहन चालकांनी हॉर्न वाजवण्यास सुरुवात केली. तसेच, या बेजबाबदार वर्तनाबद्दल जाब विचारला असता, बेस्ट बस चालकाने अपशब्द वापरल्याचा त्यांचा आरोप आहे. हा सर्व प्रकार एका वाहन चालकाने मोबाइलमध्ये कैद केला.
मुलंडमधील अत्यंत गजबजलेला 'एमजी रोड' हा रस्ता प्रवाशांना रेल्वे स्थानक आणि परिसरातील व्यावसायिक क्षेत्रांशी जोडणारा एक मुख्य मार्ग आहे. त्यामुळे साहजिकच बसमुळे या भागात मोठा ट्राफिक जाम झाला. हा प्रकार घडला, त्यावेळी बस रिकामी होती, त्यात कोणतेही प्रवासी नव्हते. त्यामुळेच चालक-वाहकावर कुठला दबाव नव्हता.
जाब विचारताच बस चालकाची मुजोरी
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, बसमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, ज्यामुळे वाहन चालक अडकून पडले आणि शेकडो प्रवाशांची गैरसोय झाली. जेव्हा नागरिकांनी चालकाला त्याच्या वागणुकीबद्दल आणि वाहतुकीत निर्माण झालेल्या अडथळ्याबद्दल जाब विचारला, तेव्हा त्याने आक्रमक पवित्रा घेत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.
नागरिकांचा संताप
"केवळ 'शेवपुरी' खाण्यासारख्या क्षुल्लक गोष्टीसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा थांबवली जाऊ शकते, हे पाहून लोकांना धक्काच बसला. बस जवळपास २० मिनिटे जागची हलली नाही, ज्यामुळे आधीच गजबजलेल्या रस्त्यावर विनाकारण वाहतूक कोंडी झाली," असे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले.
सोशल मीडियावर हा मुद्दा मांडणाऱ्या एका जागरुक नागरिकाने सांगितले की, कामावरून घरी परतत असताना त्यांना ती बस रस्त्याच्या एका बाजूला बराच वेळ उभी असलेली दिसली आणि त्यामुळे तिच्यामागील वाहतुकीवर परिणाम झाला होता.
तक्रारीची गंभीर दखल
दरम्यान, या घटनेच्या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली आहे. मात्र, संगणक प्रणालीमधील नोंदीनुसार बस दोन ते तीन मिनिटे उभी असल्याचे दिसून येत असल्याचे मुलुंड आगार व्यवस्थापकांनी म्हटले आहे.
बस चालकाच्या वर्तनामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीबाबत तुम्हाला काय प्रतिक्रिया आहे? अशा प्रकरणांमध्ये प्रशासनाने कसे कारवाई केली पाहिजे!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा