भारतभूमी ही संतांची पावन भूमी आहे. या भूमीत अनेक महान संतांनी मानवजातीला अध्यात्म, भक्ती आणि सदाचाराचा मार्ग दाखवला. अशाच तेजस्वी संतांपैकी एक म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या जीवनकार्याचा आणि संदेशाचा स्मरण करणे म्हणजे प्रत्येक भक्तासाठी आत्मिक समाधानाचा क्षण असतो.
श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त संप्रदायातील एक महान अवतार मानले जातात. त्यांचे अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य होते. "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" हा त्यांचा दिलासा देणारा संदेश आजही लाखो भक्तांच्या मनात आत्मविश्वास जागवतो.
स्वामी समर्थांनी आपल्या कृतीतून आणि उपदेशातून साधेपणा, श्रद्धा आणि सबुरी यांचा महत्त्व अधोरेखित केला. त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. गरीब असो वा श्रीमंत, सर्वांवर त्यांनी समान कृपादृष्टी ठेवली. त्यांच्या दर्शनाने आणि आशीर्वादाने अनेकांचे जीवन बदलले, संकटे दूर झाली आणि निराश मनांना नवी दिशा मिळाली.
पुण्यतिथी हा केवळ स्मरणाचा दिवस नसून, आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. स्वामींच्या शिकवणीप्रमाणे आपण आपल्या जीवनात प्रामाणिकपणा, सेवा आणि सकारात्मकता अंगीकारली, तरच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. आजच्या धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनात स्वामी समर्थांचा संदेश अधिकच महत्त्वाचा वाटतो.
अनेक भक्त पुण्यतिथी निमित्त अक्कलकोट येथे जाऊन अथवा नजिकच्या स्वामी केंद्रात, मठात जाऊन स्वामींच्या समाधीचे दर्शन घेतात. भजन, कीर्तन, महाप्रसाद आणि विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून हा दिवस भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो.
स्वामी समर्थ महाराजांचे जीवन आपल्याला हेच शिकवते की, कोणत्याही संकटात धैर्य सोडू नये आणि परमेश्वरावर दृढ विश्वास ठेवावा. त्यांच्या कृपेने अशक्य गोष्टही शक्य होते.
"भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" – या एका वाक्यात स्वामी समर्थांचा संपूर्ण संदेश सामावलेला आहे. त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन!.
@ बाळ पंडित...
ज्येष्ठ पत्रलेखक -पत्रकार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा