आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, १२ एप्रिल, २०२६

आरसीएफ एक्स एम्प्लॉईज सोशल फोरम मुंबई या संस्थेचा अभिनव उपक्रम...नाशिक जिल्ह्यातील जी. प. प्राथमिक शाळा हिवाळी येथील विद्यार्थ्यांच्या सेवेप्रित्यर्थ शैक्षणिक मंडप आणि रंग रंगोटीचे काम

नवी मुंबई (सुभाष हांडे देशमुख): राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. या भारत सरकारच्या खत उद्योगातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आरसीएफ एक्स एम्प्लॉईज सोशल फोरम ही सेवाभावी संस्था, सेवानिवृत्त सहकाऱ्यांच्या सामाजिक हितार्थ स्थापन केली असून गेली २१ वर्षे ती सातत्यपूर्ण कार्यरत आहे. यातीलच एक उपक्रमाचा भाग म्हणजे फोरमच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवाळी, जिल्हा नाशिक येथील शाळेच्या प्रांगणात बांधण्यात आलेले मंडप आणि सुबक असे रंग रंगोटीकाम; या सेवा कार्याचा उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी शाळेच्या प्रांगणात राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. चे विपणन संचालक निरंजन सोनक यांच्या शुभहस्ते उत्साही वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरसीएफचे भूतपूर्व महाव्यवस्थापक दिलीप चव्हाण हे होते. प्रसंगी नवी मुंबई येथील वास्तुशिल्पकार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, सौ. शुभदा शिवाजीराव पाटील, जि. प. प्राथमीक शाळा हिवाळी चे मुख्याध्यापक केशव गावित, आरसीएफ चे महाव्यवस्थापक अजय शर्मा, नाशिक जिल्ह्याचे विभागीय व्यवस्थापक महेश पाटील, चेतन पाटील, संदीप शिरसाठ, खत वितरक केदारनाथ कोचावार, आरसीएफ फोरमचे माजी अध्यक्ष व्ही. डी. पाटील, प्रसाद अनावकर, व्ही. एम. आघाव, पत्रकार रामदास शीद आदी मान्यवर उपस्थित होते.
      अशा प्रकारचे चमत्कारिक प्राथमिक शिक्षण आयुष्यात मी कधी पाहिल नव्हत; जे आज नाशिक जिल्हा परिषद आदिवासी शाळा हिवाळी येथे मुलांना भेटून प्रत्यक्ष पाहिले, अनुभवले. एक विद्यार्थी सर्व स्तरावर सक्षम बनविण्यात येण्यासाठी आयोजित करण्यात येणारे विविध उपक्रम खरोखरच कौतुकास्पद एवढ्या कमी पैशात आणि छोट्याशा रिसोर्ससेस मधून हे प्रशिक्षण दिलं जातं हे खरोखरच कौतुकास्पद आहे. कारण अशा प्रकारचे उदाहरण जगाच्या पाठीवर क्वचितच आढळेल. असे सांगून ते पुढे म्हणाले की तुमच्या या शैक्षणिक क्षेत्रातील सर्व ऍक्टिव्हिटी पाहून तुमच्यातील बौद्धिक क्षमतेचा पुरेपूर उद्धार केला जातोय ही खूप मोठी बाब आहे, या जिज्ञासेतून तुम्ही खूप मोठे होणार यात शंका नाही. देवासारखे काम करणारे केशव गावित सर तुम्हाला मार्गदर्शक म्हणून मिळाले आहेत. हे पाहून खूप आनंद होत आहे. प्रसंगी दिलीप चव्हाण, सौ. शुभदा पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करून मुलांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकात व्ही. डी. पाटील यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
    नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी येथील ही मराठी प्राथमिक शाळा नाशिक जिल्हा परिषदेच्या विद्यमाने आदिवासी मुलांसाठी कार्यरत असून शाळेचे मुख्याध्यापक केशव गावित सकाळी आठ ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत, वर्षाचे ३६५ दिवस सदर शाळा चालवतात. या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे शाळेतील विद्यार्थी एकाच वेळी दोन्ही हाताने दोन वेगवेगळ्या भाषेत लिखाण करतात. २०० अंकापर्यंत कोणतेही पाढे म्हणतात. याशिवाय अभ्यासाव्यतिरिक्त सामाजिक, शैक्षणिक, खेळ, वनीकरण, पशुपालन इत्यादी विषयांचा अभ्यास करतात. कौशल्य आधारित शिक्षणही मुलांना दिले जाते. अशा प्रकारे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणाऱ्या या शाळेत एकूण विद्यार्थी पटसंख्या ५५ असून दोन शिक्षक ही शाळा सांभाळतात. 
     सर्व स्तरावर शाळा अधिक विकसनशील बनविण्यासाठी शाळेच्या अनेक गरजा समोर आहेत. त्या दृष्टीने शाळेच्या व्यवस्थापनाने प्राधान्याने मागणी केल्यानुसार शाळेसाठी ६०'×६०' व ३०'×३०' अशा दोन शैक्षणिक सभागृहांची व विविध विषयांवर भिंतीवर पाठ व चित्रे रंगवण्यासाठी रंग कामाची आवश्यकता असल्याची विनंती आरसीएफ एक्स एम्प्लॉईज सोशल फोरमकडे करण्यात आली होती. त्यादृष्टीने फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी ताबडतोब; लागणारा रंगपुरवठा करुन व शैक्षणिक सभागृह बांधून देण्याची कार्यवाही केली. त्याचं उपक्रमाचा उद्घाटन सोहळा आज मोठ्या उत्साहात आरसीएफ व्यवस्थापनातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
    संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य सचिव सुभाष हांडे देशमुख यांनी केले तर अध्यक्ष दीपक सालवणकर यांनी सर्वांचे यथोचित आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मंत्रालयामधून अखंड वाहतेय भ्रष्टाचाराची गंगा

  महाराष्ट्रामधे विकास कामांच्या नावाखाली फक्त अन फक्त भ्रष्टाचार सुरू आहे. विशेष म्हणजे तो सर्वांना माहितीही आहे. मंत्रालयातील शिपायांपासुन...