पेण (रायगड) : अटल सेतू प्रभाव क्षेत्रातील १२४ गावांमधील भूसंपादनासाठी MMRDA कडून राबविण्यात येत असलेल्या ऑनलाईन संमतीपत्र प्रक्रिये विरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. १६ मार्च २०२६ च्या शासन निर्णयाच्या आधारे सुरू झालेली ही प्रक्रिया शेतकऱ्यांच्या घटनात्मक हक्कांवर गदा आणणारी असल्याचा आरोप करत “MMRDA विरोधी भूमिपुत्र संघर्ष संघटना, पेण” यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी, पेण यांना सविस्तर निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, आधार, ७/१२ व ८-अ यांसारखी कागदपत्रे सहज उपलब्ध असल्याने, सुरक्षित प्रमाणीकरणा शिवाय ऑनलाईन संमती प्रक्रिया राबविल्यास तृतीय पक्षाकडून खोट्या संमती सादर होण्याचा गंभीर धोका आहे. भविष्यात “शेतकऱ्यांनी स्वतः संमती दिली” असा दावा करून त्यांना कायदेशीर अडचणीत टाकले जाऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली असून, माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अंतर्गत सुरक्षित प्रमाणीकरण आवश्यक असल्याचेही अधोरेखित करण्यात आले.संघटनेने स्पष्ट केले की, संमती ही प्रत्यक्ष, दबाव मुक्त व पारदर्शक पद्धतीने नोंदविणे आवश्यक आहे. ऑनलाईन प्रक्रियेत शेतकऱ्यांना योग्य माहिती व स्वतंत्र निर्णयाची हमी मिळत नसल्याने ही प्रक्रिया एकतर्फी ठरत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे ऑनलाईन संमती प्रक्रिया तात्काळ स्थगित करून ग्रामपातळीवर प्रत्यक्ष पडताळणी, व्हिडिओ नोंद व अधिकृत साक्षीदारांच्या उपस्थितीत संमती घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, निवेदन देताना नंदाताई म्हात्रे, मोहिनीताई गोरे, प्रकाश माळी, सी.आर. म्हात्रे, प्रितेष माळी, जितेंद्र ठाकूर, अजित पाटील, शामकांत म्हात्रे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. संघटनेने इशारा दिला आहे की २६ एप्रिल २०२६ पर्यंत प्रक्रिया मागे घेतली नाही, तर २८ एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर शांततामय पण ठाम आंदोलन करण्यात येईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा