सुभाष हांडे देशमुख : नेरुळ येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्ताने, आंबेडकर उद्यान परिवारातील ज्येष्ठ सदस्यांच्या विद्यमाने मोठ्या उत्साहाने; गोड पदार्थांचे वाटप करुन त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. आंबेडकर उद्यान परिवाराच्या तर्फे वेळोवेळी विविध प्रकारचे सण, महामानवांचे जयंती उत्सव आयोजित करुन, त्या माध्यमातून थोर व्यक्तींच्या स्मृतींना उजाळा देणे आणि त्यांच्या विचारांचा आदर करणे या हेतूने साजरे केले जातात.
उद्यान परिवारातील ज्येष्ठ सदस्य श्री. रमेश पै याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा परिपूर्ण आढावा घेऊन म्हणाले की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हा केवळ एक उत्सव नसून तो समता, न्याय आणि बंधुत्वाचा महामेळा आहे. बाबासाहेबांनी देशाला दिलेली राज्यघटना आणि त्यांनी दिलेले शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे त्रिसूत्री विचार हे आजची जयंती साजरे करण्याचे मुख्य अधिष्ठान आहे.
सौ. स्मिता शिंदे यांनी सांगितले की, या उद्यान परिवारातर्फे विविध मान्यवर व्यक्तींच्या जयंती सारखे उत्सव साजरे केले जातात. होऊन गेलेल्या थोर व्यक्तींनी समाजासाठी दिलेले योगदान आपण विसरु नये आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण स्वतः एक जबाबदार नागरिक बनावे या प्रमुख उद्देशाने उद्यान परिवारातर्फे अशा प्रकारचे उपक्रम वेळोवेळी राबविले जातात. प्रसंगी सौ. सारीका डावले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील *कायदा भिमाचा* हे गीत आपल्या सुस्वरात, अगदी भावपूर्ण शब्दात गायीले आणि कार्यक्रम अधिक अधोरेखित केला. आज आपण जे स्वातंत्र्य आणि अधिकार उपभोगतो त्यामागे डॉक्टर बाबासाहेबांचे महान योगदान आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब यांचे विचार केवळ वाचण्यापूरते नसून ते आपल्या आचरणात आणणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल. असे श्री. सुभाष हांडे देशमुख यांनी उपस्थितांशी संवाद साधताना सांगितले.
सर्वश्री रमेश पै, जयेश भावसार, किरण तामसे, महादेवराव जाधव, सौ. स्मिता शिंदे, सौ. सारिका डावले, प्रभाकरराव मिठबावकर, सुभाष हांडे देशमुख आदींनी हा उपक्रम यशस्वी केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा