मुंबई — मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ज्येष्ठ मोडीलिपी अभ्यासक भाऊराव घाडीगावकर यांच्या ‘मोडीलिपी मंथन’ या ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार व प्राध्यापक हेमंत सुधाकर सामंत करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. भास्कर धाटावकर, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे चे कार्यकारिणी सदस्य अभयजी जगताप, मोडीलिपी अभ्यासक सुनील कदम, श्रीमती कांचन कराई, रामकृष्ण बुटे पाटील, अरविंद काटकधोंड, अमित घाटये आदी तज्ज्ञ उपस्थित होते. मोडीलिपी कट्टा यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमाचे पुस्तक प्रकाशन व मोडीलिपी साहित्य प्रदर्शन असे स्वरूप या कार्यक्रमाचे होते. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय येथील प्रा. सुरेंद्र गावस्कर सभागृहात उत्साहाने पार पडलेल्या या कार्यक्रमात हेमंत सामंत आपल्या भाषणात म्हणाले की, भाऊ घाडीगावकर हे या क्षेत्रातील द्रोणाचार्य आहेत. हजारो मोडी कागदपत्रे त्यांनी हाताळली आणि वाचली आहेत. भाऊंचे मोडी भाषेचे लिप्यांतर म्हणजे शंभर टक्के सत्यता अशी त्यांची ओळख महाराष्ट्रात आहे. त्यांचा या क्षेत्रातील नावलौकिक पाहात त्यांच्या हस्ताक्षरात साकारलेला हा ग्रंथ मोडीलिपी शिकणाऱ्या व सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व सभागृह सजावट डॉ. तेजस लोखंडे यांनी मोडीमय शैलीत करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. मोडीलिपी कट्टा मंडळ चे पदाधिकारी प्रकाश डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कमलाकर पांचाळ, किशोर सावंत, चंद्रकांत गुळंबे, विनोदकुमार टेकवडे, डॉ. उर्मिला टेकवडे, अनिल धुरी आणि रवी गावडे यांनी कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन केले.
या सोहळ्यात मोडीलिपी संवर्धनासाठी पुढील काळात साहित्य संशोधन व अधिवेशने आयोजित करण्याची नवी संकल्पना व्यासपीठावर मांडण्यात आली. मोडीवाचक व इतिहासप्रेमींच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा