जागतिक महिला दिननिमित्त विशेष लेख ✒️
परदेशात न्यूयार्क मधील महिलांनी सर्वप्रथम 8 मार्च रोजी समान कामाचे तास, समान वेतन, आठवड्याची सुट्टी, अन मतदानाचा अधिकार,याकरिता बंड पुकारून, आंदोलन केले. याची दखल घेऊन, संयुक्त राष्ट्र यांनी हाच दिवस आंतर राष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरवले. हळूहळू सर्वच पाश्चिमत्य देशातील महिला यामध्ये सहभागी होऊन, महिलांचे हक्क, कर्तव्य, स्वजाणीव बाबत, जागरूकतेने भाष्य करू लागल्या. परंतु आपल्याकडे 1975 यावर्षी प्रथमच मान्यता मिळून महिला दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. खरं तर त्या वेळेस भारतात आणीबाणी परिस्थिती असूनही UNO ने तेव्हाच स्त्री वर्ष घोषित केल्यामुळे इथेही महिला दिन साजरे होऊ लागले.
प्रत्येक क्षेत्रात महिलांचे स्थान हे, पुरुषांच्या तुलनेत दुय्यम अन दुर्बल दिसून येत असल्यामुळे पुढे स्त्री मुक्ती संघटनेची स्थापना होवून स्वतः विषयी अधिकार, आरोग्य,जातीभेद लिंगभेद, याबाबत सुशिक्षित महिलांनी, कामकरी,कष्टकरी, रोजंदारी च्या महिलांना समाजातील त्यांचे दुय्यम स्थान, आहे हे लक्षात आणून देवून, स्त्रीदास्यत्वाचे खरे मूळ शोधण्यास, त्याचा मागोवा घेण्यास मदत करून, त्यांच्या मधे सजगता निर्माण केली. त्या नंतर हुंडाबळी, जळीत प्रकरणे, अत्याचार, हिंसाचार,, सारखी प्रकरणे, मोठ्या प्रमाणात चव्हाट्यावर आण्याचे काम पाहताच, कौटुंबिक कल्याणकेंद्र यांनी केले. कधीतरी घरातच आपल्यावरही असा, शारिरीक, मानसिक, छळ होऊ शकेल, हे महिलांच्या लक्षात येऊ लागले.
युनोने दाखवून दिलेले नियम, स्त्री मुक्ती संघटनेने पाठपुरावा केल्यामुळे, त्याचे परिणाम, शासकीय स्तरावर दिसू लागले. व्यक्तिगत पातळीवर, मुलींना, महिलांना, स्त्रीस्वातंत्र्य याची जाणीव होत गेली. सर्वधर्म समभाव, धर्म निरपेक्षता, सौजन्यता आत्मसन्मान, याकडे महिलांचे लक्ष वेधले गेले. त्यान्च्यामध्ये अस्मिता जागृत होऊन आत्मभान याची जाणीव होत गेली. संसाराच्या पलिकडे, विचार करून अंगभूत विविध कलागूण, ज्यात तीचे खरे अस्तित्व आहे हे महिलांना समजावून सांगण्यात आले.
कुटूंबियांच्या आनंदात सहभागी होताना, स्वतःलाही आनंद उपभोग मिळायला हवा, हे या आत्मभान मुळे कळू लागले. ज्या महिलांचे शिक्षण अर्धवट खंडित होऊन, राहिले, त्या परत उमेदीने शिक्षण घेऊन, सजग, होऊन सुशिक्षित झाल्या व अर्थार्जन करू लागल्या. संसाराला हातभार लावू लागल्या. यामुळे महिलांची दुहेरी कसरत होऊन अतिरिक्त ताणतणावमुळे, थकू लागल्या. कामावरून आल्यावर स्त्रीला पुरेसा आराम मिळतो का? हा प्रश्न सत्तावू लागला. तिलाही मन, भावना, विचार, शिक्षण, सर्व काही असून माणूस म्हणून तिचा जनमानसात विचार होताना दिसत नाही. घुसमट होऊन अजूनही ती दुय्यम स्थानावरच दिसते आहे. तीचे स्वातंत्र्य बाधित होऊन तिची केविलवाणी धडपड सुरूच आहे.
एवढ्या सर्व निकष यावर एकच मुद्दा उपस्थित होतो,तो म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती मधे सर्वच स्तरावर, पुरुषत्वाचा अहंकार वजा करून स्त्रीची मानसिकता जपली जाते का? तिच्या ठायी असलेल्या कलागुणांना प्रोत्साहित केले जाते का? उचित सन्मानाने वागवले जाते का? याकरिता घरातील पुरुषाने स्वता: मधे बदल घडवला तरच शक्य आहे.तरच ती माणूस म्हणून खऱ्या अर्थाने स्वतःचे जीवन जगू शकेल. आजही, सेकंड शिफ्ट करून घरी परतता ना, अथवा रात्रपाळीस कामाला जाताना पुरुषांच्या(सर्वच नाही, अपवाद सोडून)वासनामय अंधःकारातून स्वतःचे रक्षण स्वतः करावे लागते. सर्व शिक्षणाने सुशिक्षित असूनही,तिला शालेय जीवना पासून मार्शल आर्ट चे प्रशिक्षण देवून अमानुष घटनाचा बिमोड करण्यास शिक्षित केले पाहिजे. जागतिक महिला दिनाचे गोडवे आपण कितीही आळवले तरी, तिच्यावरील संभाव्य संकटाची परिस्थिती बदलेल ही आशा अपेक्षा फोल ठरते.एकंदरीत मूळ कारण नष्ट करणेच अत्यावश्यक आहे.
शाळेपासून च विद्यार्थ्यांना लिंगभेद समजावून देवून, सजगतेने, संस्कारीत करावे लागेल. या काळात त्यानंच्यातील बदलत्या हॉरमन्स मुळे पौगंडावस्थेत मुलांच्या मनात आभासी चित्र निर्माण होऊन, मानसिक आंदोलनातून संभ्रम निर्माण होऊन गोंधळ उडतो. परिणामी आजूबाजूला त्याचे पडसाद उमटलेले दिसतात. हेच कोमल मानसिक स्थितीतील वय त्यांना समजावून सांगण्याचे, शिकवण्याचे, सुसंस्कारीत करण्याचे आहे. याचवेळी उचित योग्य संस्कारमूल्ये त्यांच्या अंगी रुजले तर, ध्यानी, मनी, तनी, पाऊल वाकडे न पडता, चुकीच्या विचारा पासून विद्यार्थी दूर राहतील, अन दूरगामी होणाऱ्या संभाव्य परिणाम पासून दूरच राहतील. पालकांनी घरी अन शिक्षकांनी शाळेत याची जबाबदारी, कठोरतेने पार पाडावी, जेणेकरून ते सकस विचारांची सकारात्मकता मनी बाळगून जीवनातील कठीण प्रसंगी यशस्वी होताना दिसतील PT चे तासातून सूर्यनमस्कार, त्याचे शरीर व मन यांना मेडिटेशन ची सवय लावून फायदे लाभ सांगून त्यान्च्या कडून करवून घ्यावे लागेल.
शाळेमधूनच 1 तास शाळेत उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. जेणेकरून शाळेतील संस्कार शिबीर सातत्याने सुरूच राहतील.त्याचा फायदा विद्यार्थ्यांना कायमच होऊन संस्काराने भावी पिढी सुजाण नागरिक बनून, यशस्वी होताना दिसतील, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, प्रत्येक महिलेने शपथ घेऊ या, अन महिला दिन सजगतेने साजरा करू या !!!
सौ.मीना घोडविंदे.CR
लक्षवेधी लेखिका
समुपदेशन समाजसेविका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा