या आंदोलनाची दखल घेत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तात्काळ कारवाईचे लेखी आश्वासन देत १८ मार्च रोजी मोहीम राबविण्याचे जाहीर केले होते. मात्र पोलिस बंदोबस्त उपलब्ध न झाल्याने ही मोहीम पुढे ढकलण्यात आली. यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली होती. अखेर २० मार्च रोजी उपअभियंता शैफाली देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने, वडखळ पोलीस स्टेशनच्या बंदोबस्तासह, प्रत्यक्ष कारवाई हाती घेतली.
या मोहिमेत मुख्य जलवाहिनीवरील दोन इंच, दीड इंच, एक इंच व अर्धा इंच अशा विविध आकारांच्या सुमारे २५ अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यात आली. या कारवाईवेळी स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रशासनाला सहकार्य केले. गोवर्धन पाटील, उमेश पाटील, दीपक पाटील, प्रशांत पाटील यांच्यासह अनेक नागरिक आणि महिलांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
या कारवाईमुळे पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ग्रामस्थांनी प्रशासनास स्पष्ट इशारा दिला आहे की, भविष्यात पुन्हा बेकायदेशीर नळजोडणी केल्यास संबंधितांवर कठोर गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच आवश्यक असल्यास संपूर्ण जलवाहिनी बदलण्याची जबाबदारीही दोषींवर टाकावी, अशी मागणी करण्यात आली आहे. एकूणच, शिर्की खारेपाटातील हा संघर्ष हा केवळ पाण्यासाठी नसून न्याय्य हक्कासाठी उभा राहिलेला संघटित लढा असल्याचे चित्र या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा