नेरुळ : येथील ज्येष्ठ नागरिक संघ नेरुळ यांच्या विद्यमाने अखिल भारतीय वरिष्ठ महासंघाचे माजी अध्यक्ष माननीय आर. एन. मित्तल यांच्या ६ फेब्रुवारी २०२६ रोजी हैदराबाद येथे वृद्धप काळाने झालेल्या निधनानिमित्त सोमवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी ज्येष्ठ नागरिक भवन येथे दि. ना. चापके यांच्या अध्यक्षतेखाली शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते..
उपरोक्त शोक सभेला माजी आईस्कॉम अध्यक्ष टी. टी. आर. उन्नी साहेब, फेस्कॉम अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब टेकाळे, जे. ना .सं. अध्यक्ष विकास साठे, माजी अध्यक्ष अरविंद वाळवेकर, आईस्कॉम, फेस्कॉम व ज्येष्ठ नागरिक संघ नेरुळचे कार्यकारीणी सभासद व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आर. एन .मित्तल हे विशेष करुन गरीब व ग्रामीण लोकांच्या हितासाठी सतर्कतेने क्रियाशील राहिले. ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेचे आरक्षण आणि बँकांतील ज्येष्ठ नागरिकांचे अनक्लेमड मनी बाबत केंद्र सरकारकडे मोठा लढा देऊन, सातत्याने पाठपुरावा करुन यश मिळविले . त्यांचे कार्य पुढे चालू ठेवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली होईल, अशा भावना प्रसंगी अनेकांनी व्यक्त केल्या.
डी .एन. चापके यांनी मित्तल साहेबांच्या जीवनाचा आलेख सर्वांपुढे ठेवताना सांगितले की, श्री. मित्तल यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९२६ रोजी झाला. ३० डिसेंबर २०२६ रोजी त्यांच्या वयाची शंभर वर्ष पूर्ण झाली. वृद्ध काळाने ६ फेब्रुवारी २०२६ रोजी हैदराबाद येथे यांचे निधन झाले. असे सांगून आपल्या श्रद्धांजलीपर भाषणात अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक संघाच्या स्थापनेपासूनची विस्तृत माहिती देत ते पुढे म्हणाले की ई पी एफ ओ कामगारांच्या पेन्शन साठी अनेक आंदोलन करुन पेन्शनसाठी न्याय देण्यात सिनिअर सिटीजन मुव्हमेंट माध्यमातून त्यांनी मोठी कार्य केले. याच कार्यातून ते संस्थेवर बिनविरोध अध्यक्षपदी निवडून आले. कै. मित्तल साहेबांनी कंपनी कायद्यात दोन टक्के नफ्यातील सीआरएस फंड समाजासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मिळविण्यासाठी लढा दिला. ते ज्येष्ठ नागरिकांसाठी हमदर्दी होतेच, नेहमी वरिष्ठ नागरिकांची चिंता करीत त्यांनी भरीव कार्य केले.
प्रसंगी अतिरिक्त वित्त सचिव पी. आर. गुप्ता, ज्येष्ठ नागरिक संघाचे अरविंद वाळवेकर, डॉ. नामदेव डफळ, अजय माढेकर, अण्णासाहेब टेकाळे, विकास साठे आदी मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.
डॉ. अंकुशराव जांभळे यांनी प्रास्ताविक भाषण व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. नामदेव डफळ यांनी पसायदानाने शोक सभेची सांगता केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा