हरीचे वारकरी हरीमय झाले.....
"मरणे तो देव केला। देह जाऊनिया गेला॥"
"तुका म्हणे आतां। मरण नाही आम्हां॥"
या अभंगांमधून जीवनातील नश्वरता आणि भक्तीच्या सामर्थ्याने मृत्यूवर विजय मिळवण्याचा संदेश मिळतो. मृत्यू हे अंत नसून, ती विठ्ठलाशी भेट घेण्याची एक पायरी आहे, असा भाव संतांच्या अभंगात आहे.
वै.ह.भ.प.पांडुरंग राघो मुंढे यांच्या जीवनातही जीवनाची नश्वरता आणि भक्तीचे सामर्थ्य दिसत होते. त्यामुळे तेही मृत्यूवर विजय मिळवून आज विठ्ठलमय झाले आहेत.
प्रत्येक व्यक्तीची ओळख समाजात दोन गोष्टींमुळे होते. जन्मानंतरचे चिकटलेले नावाचे लेबल अन् नोकरी किंवा व्यवसायाचे लेबल! दोन्ही गोष्टीची सुरुवात एका ध्येयाने होत असते. जन्मतः 'स्व'चा शोध घेण्याचे अन् त्या परमेश्वरात विलीन होण्याचे ध्येय असते. नोकरी, व्यवसाय सुखाने चरितार्थ चालविण्याचे ध्येय. ध्येयाचा प्रवास सतत सुरु असतो. ध्येय म्हटले की मर्यादा आली. 'स्व'चा शोध घेण्यासाठी आयुष्य ही मर्यादा अन् नोकरीसाठी सर्वसाधारणपणे वय वर्ष साठीची. तीस वर्षांपेक्षा अधिक नोकरीत एकाच ध्येयाने धावल्यानंतर जो एक मुक्कामाचा पडाव येतो, तो 'सेवानिवृत्तीचा'! काही क्षणाची उसंत, पुढच्या प्रवासाची तयारी, एक सिंहावलोकन करण्याचा टप्पा...! परंतु सेवानिवृत्तीनंतर स्व-जीवनाला हरीच्या भक्तीमध्ये गुंतवून ठेवणे म्हणजे वानप्रस्थी जीवनप्रणालीच...! वै. ह.भ.प.पांडुरंगबाबा मुंढे यांनी गृहस्थाश्रमानंतर म्हणजे सेवानिवृत्तीनंतर अधिक वेळ स्व-जीवन आळंदी क्षेत्रात गुतविण्याचे ठरविले. वै. ह.भ.प. पांडुरंगबाबा संसारामध्ये अनासक्त होऊन त्यांची स्व-जीवनाची ओढ आळंदीकडे लागू लागली.
वै. ह.भ.प. राघो मुंढे यांनी ह.भ.प. वामनबाबांच्या आशीर्वादाने वारकरी सांप्रदायाचा झेंडा आपल्या पंचक्रोषीत रोवला. प्रथम त्यांनी स्वतःला वारकरी सांप्रदायात समर्पित करून घेतले. परिणामी संपूर्ण मुंढे कुटुंब हरीमध्ये तल्लीन होऊ लागले. पंचक्रोषीमध्ये सदैव भजन, हरीपाठ, किर्तन या माध्यमातून संतांचे विचार आणि विठ्ठलाचे नामस्मरण यांची परंपरा सुरू झाली आणि पंचक्रोषीतील गावांमध्ये वारकरी सांप्रदायाचे पडसाद उमटू लागले. परिणामी लोकं वारकरी व माळकरी बनू लागली. वै. ह.भ.प. राघो मुंढे यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र वै. ह.भ.प. पांडुरंग बाबा यांनी वारकरी सांप्रदायाची पताका खांद्यावर घेतली आणि प्रथम १९६० मध्ये श्री सद्गुरु वामनबाबा षष्ठी निमित्त मौजे भोपर ते तळोजे अशी पायी वारी सुरू केली. गेली ६५ वर्ष ही पायी वारी आजतागायत सुरू आहे. त्यांनंतर १९६३ मध्ये संत ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळ्यानिमित्त मौजे श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर देसाई ते श्री क्षेत्र आळंदी देवाची अशी पायी वारी सुरू केली. या वारीलाही ६२ वर्ष पूर्ण झाली. अशा विविध पायी दिंड्या वै. ह.भ.प. पांडुरंग बाबांच्या संकल्पनेतून सुरू झाल्या.
वै. ह.भ.प. पांडुरंग राघो मुंढे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या पायी दिंड्याः
१) मौजे भोपरगाव ते शांतिकूटी मठ तळोजे श्री. सद्गुरु वामनबाबा षष्ठी निमित्त पायी वारी (६५ वर्षे)
२)श्री विठ्ठल रखुमाई मंदिर देसाईगांव ते श्री क्षेत्र आळंदी देवाची श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्या निमित्त पायी वारी (६२ वर्षे)
३)मौजे काल्हेर (भिवंडी) ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौष वारी निमित्त पायी वारी (४७ वर्षे)
४) श्री विठ्ठल रखुमाई मंदिर देसाईगांव ते श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी (२५ वर्षे) आणि परती ची वारी (५ वर्षे)
५) श्री क्षेत्र खिडकाळेश्वर मंदिर खिडकाळी ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी वारी (२००४)
६) कोकण दिंडी सोबत श्री क्षेत्र देहू श्री संत तुकाराम महाराज बीजेची वारी (२००५)
७) श्री क्षेत्र खिडकाळेश्वर मंदिर खिडकाळी ते श्री क्षेत्र पैठण श्री एकनाथ महाराज षष्ठी निमित्त पायी वारी (२००६)
८) श्री क्षेत्र देहू ते श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी (२००६)
९) श्री क्षेत्र सासवड ते श्री क्षेत्र पंढरपूर श्री संत सोपान काका पालखी सोबत आषाढी वारी (२००७)
१०) श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोबत अहमदनगर ते श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी (२००८)
११) मौजे गेवराई जिल्हा बीड ते श्री क्षेत्र पंढरपूर श्री संत मुक्ताई पालखी सोबत आषाढी वारी (२००९)
१२) श्री क्षेत्र खिडकाळेश्वर मंदिर खिडकाळी ते श्री क्षेत्र सासवड श्री संत सोपान काका समाधी सोहळा पायी वारी (२०१०)
१३) श्री क्षेत्र खिडकाळेश्वर मंदिर खिडकाळी ते मुक्ताई नगर कोथळी येदलाबाद पायी वारी (२०११)
१४) श्री क्षेत्र खिडकाळेश्वर मंदिर खिडकाळी ते श्री क्षेत्र देहू श्री संत तुकाराम महाराज बीजे निमित्त पायी वारी (२०१२)
१५) श्री क्षेत्र खिडकाळेश्वर मंदिर खिडकाळी ते श्री क्षेत्र आळंदी आळंदी पंचक्रोशी प्रदक्षिणा पायी वारी (२०१२)
१६) श्री संत चोखोबा महाराज समाधी सोहळ्या निमित्त श्री क्षेत्र खिडकाळेश्वर मंदिर खिडकाळी ते श्री क्षेत्र पंढरपूर पंचक्रोशी प्रदक्षिणा (२०१३)
१७) श्री क्षेत्र खिडकाळेश्वर मंदिर खिडकाळी ते श्री क्षेत्र पिंपळनेर श्री संत निळोबा महाराज समाधी सोहळ्या निमित्त पायी वारी (२०१४)
१८) श्री क्षेत्र खिडकाळेश्वर मंदिर खिडकाळी ते मंगळवेढा श्री संत चोखोबा महाराज समाधी सोहळ्या निमित्त पायी वारी (२०१४)
१९) श्री संत वामन बाबा महाराज मठ शांतीकुटी तळोजे मजकूर ते बदलापूर श्री संत रामकृष्ण स्वामी समाधी शताब्दी निमित्त पायी वारी (२०१५)
२०) श्री संत सोपान काका समाधी सोहळ्या निमित्त सासवड पंचक्रोशी प्रदक्षिणा (२०१५)
२१)श्री क्षेत्र खिडकाळेश्वर मंदिर खिडकाळी ते श्री क्षेत्र अरण श्री संत सावता माळी महाराज समाधी सोहळ्या निमित्त पायी वारी (२०१६)
२२) श्री क्षेत्र खिडकाळेश्वर मंदिर खिडकाळी ते श्री क्षेत्र श्रीगोंदा श्री संत शेख महंमद समाधी सोहळ्या निमित्त पायी वारी व श्री संत जगनाडे महाराज दर्शन आणि श्री संत श्रीपती बाबा समाधी दर्शन (२०१७)
२३)श्री क्षेत्र खिडकाळेश्वर मंदिर खिडकाळी ते श्री क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर (कर्नाटक) महा शिवरात्री निमित्त पायी वारी (२०१८)
२४) श्री नर्मदा माता परिक्रमा (२०१९)
२५)श्री क्षेत्र खिडकाळेश्वर मंदिर खिडकाळी ते श्री क्षेत्र वाराणशी काशी विश्वनाथ महा शिवरात्री निमित्त पायी वारी (२०२०)
२६) श्री क्षेत्र खिडकाळेश्वर मंदिर खिडकाळी ते श्री क्षेत्र अजा पर्वत वाल्मिकी ऋषी समाधी दर्शन निमित्त पायी वारी (२०२१)
२७) श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र तेरेढोकी श्री संत गोरोबा काका पुण्यतिथी निमित्त पायी वारी.
२८) श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र अरण श्री संत सावता माळी महाराज पुण्यतिथी निमित्त पायी वारी.
२९)श्री क्षेत्र नेवासा पंचक्रोशी प्रदक्षिणा.
३०) श्री क्षेत्र पैठण ते श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी.
३१) श्री क्षेत्र खिडकाळेश्वर मंदिर खिडकाळी ते अष्ट विनायक दर्शन निमित्त पायी वारी (२०२३).
अशाप्रकारे वै. ह.भ.प. पांडुरंगबाबा यांच्या संकल्पनेतून विविध पायी दिंड्या व प्रदक्षिणा सुरू आहेत.
वै. ह.भ.प. राघो मुंढे यांनी सुरू केलेला वैष्णव पंथ वारकरी सांप्रदाय मुंढे घराण्यात जवळ-जवळ चौथ्या पिढीपर्यत कार्यरत आहे.वै. ह.भ.प. राघो मंगळ्या मुंढे यांनी प्रथम वारकरी सांप्रदायाची पायाभरणी केली. आगरी समाजातील सर्वांत जूनी दिंडी म्हणजे *'आगरी समाज पायी दिंडी संस्थान'...!* आजतागायत ६२ वर्षांपासून ही दिंडी अखंडित सुरू आहे. या दिंडीमुळे आगरी समाजातील गावागावांतून हजारो आगरी या सांप्रदायात जोडली गेली आहेत. वै. ह.भ.प. पांडुरंग राघो मुंढे यांनी हा वारसा पुढे चालू ठेवला. बिर्ला सेंचुरी रे-आॕन कंपनी-शहाड येथे ते कार्यरत होते. प्रपंच आणि परमार्थ यांचा सुरेख संगम त्यांनी साधला होता. प्रतिकुल परिस्थितीतही त्यांनी प्रपंच व परमार्थ यांचा समन्वय साधून योग्य वाटचाल सुरु ठेवली. सेवानिवृत्तीनंतर ते संसारात अनासक्त राहून एक पांडुरंग दुसऱ्या पांडुरंगात आसक्त होऊ लागले. त्यांचे मन सतत आळंदीकडे ओढ घेऊ लागले. आळंदीमध्येच वास्तव्य करावे म्हणून त्यांनी आगरी समाजाकरीता एक आगरी संस्थान म्हणून धर्मशाळा बांधली. मन संसारात रमत नव्हते, अशा परिस्थितीत त्यांनी एक संसारी म्हणून आपले स्व-कर्तव्य यशस्वीपणे पार पाडले. दोन्ही मुलांना (भानुदास आणि रामकृष्ण) उच्च शिक्षण देण्याचे ठरविले. परिणाम एक मुलगा डॉक्टर व दुसरा शिक्षक झाला. श्री.रामकृष्ण सर म्हणजे शिक्षण आणि संस्कार यांचा समन्वय.! वडिलांचे ध्येय पुढे घेऊन जातो. तोच खरा पुत्र! सम्यक् तनोति तनू विस्तारै।
वै. ह.भ.प. राघो मंगळ्या मुंढे यांची वारकरी सांप्रदायाची परंपरा वै. ह.भ.प.पांडुरंग बाबांनी सुरू ठेवली आणि सध्या हिच परंपरा हपभ श्री.रामकृष्ण मुंढे सर सांभाळतांना दिसत आहेत.
अशाप्रकारे पंचक्रोषीमध्ये वैष्णव पंथ वारकरी सांप्रदायाला दिंडी रूपी खतपानी घालून शेकडोंच्या संख्येने वारकरी पुष्प फुलविणारे बागेचे माळी वै. ह.भ.प. पांडुरंग बाबा स्व-जीवनपुष्प हरीच्या चरणी समर्पित करून एक हरीचा वारकरी हरीमय झाला. असा हरीमय झालेला हरीचा वारकरी वै. ह.भ.प.पांडुरंग बाबा यांस शब्द सुमनेरूपी भावपूर्ण श्रध्दांजली.
---------------------------
नवनाथ ठाकुर-खिडकाळी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा