आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २२ डिसेंबर, २०२५

"बोलींचा जागर " या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बोलींच्या अभ्यासकांची बैठक कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात संपन्न ; लेवा गणबोली ,अहिराणी, गुजरी,आदिवासी, आदीबोलीबद्दल झाली गांभीर्याने चर्चा....!!

मुंबई :- ( प्रतिनिधी/सुनील इंगळे ) :- बोली भाषा टिकावी ,तसेच संवर्धन- समृद्ध व्हावी या उद्देशाने दि. 14 जानेवारी ते 28 जानेवारी 2026 या कालावधीत पार पडणाऱ्या "मराठीभाषा संवर्धन पंधरवडा 'निमित्त 'बोलींचा जागर" हा विशेष उपक्रम राबवला जाणार आहे.
यासंदर्भात मराठी भाषा संचालनालय आणि भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष बैठक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात संपन्न झाली.
या कार्यशाळेत मराठी भाषा संचालनालयाचे
संचालक अरुण गीते,भाषा अभ्यास प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ.म.सु.पगारे,संचालनालयाचे संजय पवार,भारत जाधव,आनंद गांगण आणि उत्तर महाराष्ट्रातील विविध बोलीभाषांचे अभ्यासक, लेखक,संशोधक उपस्थित होते.बैठकीच्चा सुरुवातीला भाषा संचालनालयाचे संचालक श्री.अरुण गीते यांनी या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल विशेष माहिती प्रास्ताविकाद्वारे सांगितली. यामध्ये मराठी भाषेला
एक तपाच्चा संधर्षानंतर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.मराठी भाषेची महत्ता, साहित्य, लोककला आणि एकूणच मराठी संस्कृतीची परंपरा ही श्रेष्ठ दर्जाचीआहे,असे प्रतिपादन केले. मराठी भाषेची पाळेमुळे आठव्या शतकापर्यन्त सापडतात.विविध शिलालेख दानपत्र, ताम्रपट ई.आपल्याकडे संशोधनात आढळलेली आहेत. प्रमाणभाषा म्हणून मराठी भाषा स्थिरस्थावर झालेली आहे.महाराष्ट्रातील काही बोलीभाषा या लुप्त होत चाललेल्याआहेतअसा एक सूर विचारवंत व्यक्त करताना दिसतात.या धरतीवर बोलीभाषा जगल्या पाहिजेत.बोलींवर अध्ययन आणि संशोधन झाले पाहिजे.बोलीभाषा मोठ्या प्रमाणात बोलल्यागेल्या पाहिजे,असाआशावाद त्यांनी व्यक्त केला.यानंतर कार्यशाळेला उपस्थित सर्व अभ्यासकांना त्यांनी बोलीच्या अनुषंगाने आपली मते व्यक्त करण्यासंदर्भात विनंती केली.यानंतर विविध बोलीभाषांच्याअभ्यासकांनी आपली मते मनमोकळेपणाने व्यक्त केली.विलास पाटील यांनी गुजर बोलीच्या अनुषंगाने आपलं मत व्यक्त केले.गुजर बोलीमध्ये पाच प्रकारच्या बोलींचा समावेश होतो.या पाचही बोलींमध्ये भेद आढळतो. "गुर्जर दिशा"' नावाचे मासिक आपण अनेक काळापासून चालवीत असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले यानंतर डॉ. मिनल झोपे यांनी लेवा गणबोलीच्चा अनुषंगानेआपले मत व्यक्त केले.त्या महानुभव पंथाच्या अभ्यासक असून लेवा गणबोलीवर संशोधन करण्याचा आपला मानस आहे,असे त्यांनी बोलून दाखवले. तद्नंतर सेवानिवृत्त प्राध्यापिका कवयित्री विमल वाणी यांनी अहिराणी बोलीच्याअनुषंगाने आपले मत व्यक्त केले.आपली एकूण 91 पुस्तके प्रकाशित झालेली असूनअहिराणी भाषेतही आपण वैविध्यपूर्ण लेखन केलेले आहे,असे त्यांनी यावेळेस सांगितले.यानंतर लेवा गणबोली साहित्य मंडळाचे उपाध्यक्ष श्री.अरविंद नारखेडे यांनी बहिणाबाईंच्या गाण्यांच्या अनुषंगाने तत्त्वज्ञानाची ओळख करून घेता येते, असे प्रतिपादन केले. लेवा गणबोलीचा अधिक वापर
बहिणाबाईंच्या लिखाणामध्ये आढळतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.त्यांनी आतापर्यन्त सात पुस्तके बोलीभाषांवर लिहिल्याचे सांगून आपल्या एका पुस्तकातील लेवा गणबोलीचा उतारा उपस्थितांना वाचून दाखवला.
     तद्नंतर लेवा गणबोली साहित्य संमेलनाचे मुख्य आयोजक,अभ्यासक कवी व पत्रकार श्री.तुषार वाघुळदे यांनी लोककला आणि लोक संस्कृतीच्या अनुषंगाने आपली मते व्यक्त केली.आपण लेवा गणबोलीच्या अनुषंगाने साहित्य संमेलन भरवतो,लेखक - कलावंतांना एकत्र आणतो,लेवा गणबोली ही लुप्त पावत नसून उलट आता मोठ्या प्रमाणात फोफावते आहे समृद्ध होत आहे असे श्री.वाघुळदे यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले.या बोलीत लिखाण करणारे ,कलावंत ,अभिनेते,ग्रामीण कलाकार, संगीतकार ,नाटककार यांना एका छताखाली एकत्र आणून स्वतंत्र संमेलन घेण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला.13 हजार किलोमीटर सायकल प्रवास करून लोककला,विविध प्रांतातील बोली,संस्कृती,खाद्यपदार्थ याचा कटाक्षाने अभ्यास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर कवयित्री बहिणाबाईंच्या जीवनावर चित्रपटनिर्मिती झाली असल्याची माहिती त्यांनी बैठकीत दिली. प्रा. डॉ. फुला बागुल यांनी बोलींचाशास्त्रीय अभ्यास होणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले.विद्यापीठाच्या अभ्यास मंडळामध्ये होतो, तेव्हा बहुतेक बोलीभाषेवरील पुस्तके आम्ही अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला होता.अहिराणी बोलीचा समाजशास्त्रीयअंगाने विचार झाला पाहिजे,असे सांगून उत्तर महाराष्ट्रातील 'डांगीं आणि 'नेमणी' या बोलीभाषा मृतप्राय होण्याच्या मार्गावर आहेत,असे त्यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले. प्रा. वासुदेव वले यांनी विदर्भ आणि खानदेश या दोन्हीही प्रांतांच्या सीमारेषांवर बोलल्या जाणाऱ्या बोलींच्या अनुषंगाने आपले चिंतन व्यक्त केले.आपण मूळचे विदर्भातील रहिवासी आहेत. खानदेशामध्येअनेक काळापासून नोकरीच्चा निमित्ताने वास्तव्यास आहोत, त्यामुळे या दोन्हीही प्रदेशातील बोलींचाआपण अभ्यास केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.त्यानंतर रवीद्र पांढरे यांनी जामनेरी बोलीच्याअनुषंगाने चिंतन व्यक्त केले. काहीअभ्यासक तावडी बोलीलाच "जामनेरी बोली'असे म्हणतात; पण हे ठाम चुकीचे असून जामनेरी बोलीचे स्वतंत्र अस्तित्वआहे, असे सांगून त्यांनी तावडी बोलीआणि जामनेरी बोली यातील भेद स्पष्ट करून दाखवला. जामनेरी बोली ही प्रामुख्याने जामनेर तालुक्यातील काही भागांमध्ये बोलली जाते.
      तावडीच्या तुलनेने जामनेरी बोली बोलणारा वर्गं कमी असला; तरी तिचा स्वतंत्र बोली म्हणूनच विचार होणे आवश्यक आहे,असे त्यांनी यावेळी विधान केले.यानंतर साहित्यिक लेखकअशोक कोळी यांनी तावडी बोलीचे अभ्यासक म्हणून आपले मत व्यक्त केले. बोलीभाषेतून मोठ्या प्रमाणामध्ये साहित्यनिर्मिती झाली पाहिजे.तावडी बोलीचा शब्दसंग्रह प्रसिद्ध झाला पाहिजे.यासह गावांमध्ये वाचनालय निर्माण करून त्या ठिकाणी बोली विषयक साहित्य उपलब्ध करून दिले पाहिजे आणि बोलीभाषांच्या पुस्तकांना अनुदान देऊन त्यांचा सन्मान केला पाहिजे, असे विवेचन त्यांनी केले.धुळे येथील का. स.वाणी या प्रतिष्ठित साहित्य संस्थेच्या सचिव प्रा.डॉ. शोभा शिंदे यांनी खानदेशातील एकूण बोलींच्या अनुषंगाने आपले मत व्यक्त केले.खानदेशातील बोलींचा सांस्कृतिक अभ्यास झाला पाहिजे आणि तो करण्याचा आमच्या संस्थेचा प्रयत्न सुरु आहे,असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. एकूण पाच खंड प्रकाशित करून त्यांचे प्रकाशन सुप्रसिद्ध बोलींचे अभ्यासक डॉ.गणेश देवी यांच्या हस्ते करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला,यानंतर प्रा.संध्या महाजन यांनी लेवा गणबोलीच्या अनुषंगाने आपले चिंतन व्यक्त केले. बोली भाषांतून साहित्य निर्मिती झाली पाहिजे, तेव्हा त्या बोलीचे जतन होईल, असे त्यांनी सांगितले. कवयित्री शितल पाटील यांनी लेवा बोलीमध्ये आपला स्वतःचा परिचय करून दिला. आपल्याला प्रमाण भाषा चांगल्या रितीने आली पाहिजे, त्यासोबतच आपली मातृभाषा देखील अस्खलितरित्या बोलता आली पाहिजे,असे त्या म्हणाल्या.खानदेश साहित्य संघाचे अध्यकष श्री.रमेश बोरसे यांनी अहिराणी बोलीच्चा अनुषंगाने आपली मते व्यक्त केली.बोलीभाषेतील लेखनासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.आपण
मागील काही काळात अहिराणीतून नियतकालिक चालवल्याचे त्यांनी सांगितले; परंतु बोलीभाषा लिखाणासाठी अधिक अडथळे निर्माण होतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.आपण विविध वर्तमानपत्रामध्ये अहिराणीतून लेखन केल्याचे यावेळी त्यांनी संगितले. आप्पान्या गप्पा" या सदरामार्फतअनेक काळ वर्तमानपंत्रातून लिहिल्याचे त्यांनी सांगितले,मौखिक वाङ्मय हे लिखित स्वरूपामध्ये येण्याची अत्यंत आवश्यकताआहे; त्यासाठी
विद्यापीठ आणि शासन स्तरावरून प्रोत्साहन मिळण्याचीआवश्यकता आहे,असे त्यांनी अधोरखित केले.त्यानंतर प्रा.डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांनी अहिराणी बोलीच्या अनुषंगाने आपले मत व्यक्त केले.खानदेशामध्ये विविध बोली बोलल्या जातात.त्या प्रत्येक बोलीचे स्वतंत्र अस्तित्व आहे,ते आपण सगळ्यांनी मान्य केले पाहिजे.या धर्तीवर आपण "भाषाभगिनी' नावाचा एक उपक्रम राबवित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.गावांपासून शहरांपर्यन्त बोलीभाषा जतन करण्याच्याअनुषंगाने विविध उपक्रम घेण्याची आवश्यकताआहे,असे यावेळी त्यांनी सुचवले. येणाऱ्या जनगणनेमध्ये बोलीच्या अनुषंगाने एक रकाना देऊन बोलीभाषेच्या नोंदी झाल्या पाहिजेत,अशी महत्वपूर्ण सूचना त्यांनी यावेळी सुचवली.तद्नंतर प्राथमिक शिक्षक रमेश धनगर यांनी डिजिटल माध्यमातून बोली भाषेचे संवर्धन झाले पाहिजे असे सुचवले.अमळनेर येथे पार पडलेल्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये बोलींच्या अनुषंगाने विशेष उपक्रम राबविण्यात आलेला होता. त्याच्या नियोजनाची जबाबदारी माझ्याकडे होती, असे सांगून अशा मोठ्या व्यासपीठावर बोलींच्या
अनुषंगाने अधिकाधिक कार्यक्रम होणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.श्रीमती सुनिता येवले यांनी लेवाबोलीच्या अनुषंगाने आपली मते व्यक्त केली. कविता,ओव्या,कथा यांची अधिकाधिक निर्मिती बोली भाषेमधून झाली पाहिजे,असे सांगून बोलीभाषा या मराठीच्या अपत्य आहेत आंणि त्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. भाषाअभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रातील संशोधक विद्यार्थी खेमराज पाटील
याने नंदूरबार जिल्ह्यातील विविध आदिवासी बोली बोलणाऱ्या समूहाला शासनातर्फे व्यासपीठ
उपलब्ध करून दिले पाहिजे आणि त्यांच्यातील भाषिक न्यूनगंड कमी करण्यासाठी आदिवासी बोलीतील साहित्यिक, लोककलावंत आणि समूहाचा सन्मान करून त्यांना भाषिक
प्रवाहामध्ये सामील करून घेतले पाहिजे असे मत यावेळी व्यक्त केले.
      या बैठकीच्या अध्यक्षीय भाषणामध्ये भाषाअभ्यास प्रशाळा व संशोधन कंद्राचे संचालक प्रा डॉ.म.सु. पगारे यांनी खानदेशामध्ये बोलल्या जाणाऱ्या विविध बोलींच्या
अनुषंगाने आपले चिंतन व्यक्त केले.बोलीभाषांचा चिकित्सक अभ्यास होणे आवश्यक आहे.आपण स्वतः बोलीभाषांचा अभ्यास करून खंड स्वरूपात पुस्तके प्रकाशित केल्याचे यावेळी
त्यांनी सांगितले.खानदेश हा प्रांत आहे.काही अभ्यासक अहिराणी बोलीला खानदेशी बोली म्हणून संबोधतात.हे पूर्णतःचुकीचे आहे.अहिराणी ही खानदेशामध्ये बोलली जाणारी एक बोली आहे,असे त्यांनी स्पष्ट केले.तसेच बहिणाबाईंच्या कविता अहिराणी बोलीतल्या असल्याचे डॉ.प्र.के. अत्रेंपासून अनेक अभ्यासकांनी नमूद केलेले आहे, ही बाब देखील चुकीची असून बहिणाबाईंची कविता ही खानदेशातील लेवा बोलीमध्ये लिहिली गेल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. बोलीभाषा या "स्वयंभू" असतात,त्या कुठल्याही भाषेच्या पोटभाषा नसतात असे महत्वपूर्ण विधान त्यांनी यावेळी केले. बोलीभाषांच्या अनुषंगाने संशोथन करून विविध प्रकल्प तयार होणे आवश्यकआहे,बोलीतील किंवा प्रमाण भाषेतील साहित्य विविध बोली
भाषांमध्ये अनुवादित झाले पाहिजे.एकूणच या बोलीभाषांच्चा साहित्य व्यवहारासाठी शासन स्तरावरून प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे.शासन स्तरावरून बोलींच्या पाठबळासाठी राबविण्यात येणारे उपक्रम हे स्वागतार्ह आहेत,असे नमू्द करून प्रत्येक भाषेची अस्मिता
आणि अस्तित्व टिकले पाहिजे,असे त्यांनी यावेळी प्रतिपादन केले.या बैठकीचे सूत्रसंचालन आणि आभार व्यक्त करण्याचे काम प्रशाळेतील मराठी विभागातील डॉ.दीपक खरात यांनी केले.आपण स्वतः बोलीभाषांचा अभ्यास करून खंड स्वरूपात पुस्तके प्रकाशित केल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

कै मोरेश्वर भगत शैक्षणिक सामाजिक विकास संस्था सन 2026 च्या दिनदर्शिकाचे प्रकाशन

गडब (अवंतिका म्हात्रे): सालाबादप्रमाणे कै मोरेश्वर भगत शैक्षणिक सामाजिक विकास संस्थेच्या सन 2026 च्या दिनादर्शिका प्रकाशन सोहळा ...