मुंबई(भूषण सहदेव तांबे): राष्ट्रीय टपाल सप्ताह २०२५ (दि. ६ ते १० ऑक्टोबर २०२५) निमित्त, महाराष्ट्र पोस्टल सर्कल तर्फे मुंबई जी.पी.ओ. येथे आज फिलाटेली दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने मुंबई जी.पी.ओ. इमारतीच्या ऐतिहासिक सभागृहात सकाळी ११:०० वाजता विशेष समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या समारंभाचे अध्यक्षस्थान श्री अमिताभ सिंह,, मुख्य टपालमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल यांनी भूषविले. तसेच या कार्यक्रमाला सावंतवाडीच्या राजघराण्यातील राजेसाहेब खेमेंद्र सावंत भोसले, राणी साहेब शुभदादेवी भोसले, युवराज लखम सावंत भोसले तसेच युवराणी श्रद्धा लखम सावंत भोसले या मान्यवर सदस्यांची उपस्थिती लाभली.
या प्रसंगी फिलाटेली दिवसानिमित्त श्री अमिताभ सिंह, मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र पोस्टल सर्कल यांच्या हस्ते स्पेशल कॅन्सलेशनचे प्रकाशन करण्यात आले.
यानंतर प्रसिद्ध फिलाटेलिस्ट श्री प्रतीसाद नेऊरगावकर लिखित “India Post Cards 1949–2025” या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकामध्ये भारतातील पोस्टकार्डाचा विकास आणि इतिहास यांचा आढावा घेण्यात आला असून ते टपाल तिकिट संकलक व संशोधकांसाठी महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ ठरेल.
सावंतवाडीच्या राजघराण्यातील राणी साहेब शुभदादेवी भोसले यांनी उपस्थितांना सावंतवाडी गंजीफा कार्ड्स या प्राचीन भारतीय कलेचा इतिहास, तिचे सांस्कृतिक महत्त्व व परंपरा याबद्दल मार्गदर्शन केले.
यानंतर भगवान विष्णूंच्या दशावतारांवर आधारित “सावंतवाडी गंजीफा कार्ड्स” या विषयावरील १० चित्र पोस्टकार्ड्सच्या संचाचे प्रकाशन मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र पोस्टल सर्कल यांच्या हस्ते करण्यात आले. या संचासोबत स्पेशल कॅन्सलेशनचे देखील प्रकाशन करण्यात आले.
प्रकाशनानंतर श्री अमिताभ सिंह, मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र पोस्टल सर्कल यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, भारतीय कलात्मक आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन व संवर्धन करण्यासाठी भारत सरकारच्या टपाल विभागाची बांधिलकी कायम राहिली आहे. त्यांनी असेही नमूद केले की, फिलाटेली (टपाल तिकीट संग्राहकता) ही लोकांना जोडणारी, वारसा जपणारी आणि तरुणांमध्ये सर्जनशीलतेला चालना देणारे एक प्रभावी माध्यम आहे.
___________________________________
प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या मंचावर उपस्थित असलेले वरिष्ठ टपाल अधिकारी:
• श्रीमती जयति समद्दर - महा प्रबंधक (वित्त), महाराष्ट्र सर्कल
• श्री मनोज कुमार, सहायक पोस्टमास्तर जनरल (मेल्स आणि व्यवसाय विकास)
• सौ. कैया अरोरा, डायरेक्टर पोस्टल सर्विसेस (मुंबई विभाग)
• कुमारी सिमरन कौर, डायरेक्टर पोस्टल सर्विसेस (मुख्यालय)
कार्यक्रमास सावंतवाडीच्या राजघराण्यातील इतर मान्यवर सदस्य, प्रसिद्ध फिलाटेलिस्ट तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी भारतीय पारंपरिक कलेचे जतन व प्रसार करण्याच्या टपाल विभागाच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
गंजीफा कार्ड्स विषयी
गंजीफा (ज्याला गंजापा, गंजप्पा किंवा गंजिफा असेही म्हणतात) हा एक प्राचीन भारतीय पत्त्यांचा खेळप्रकार आणि कलाशैली आहे. तिची खासियत म्हणजे तिचे सौंदर्यपूर्ण हाताने रंगवलेले गोलाकार पत्ते, ज्यातील चित्रे हि प्रामुख्याने धार्मिक किंवा पौराणिक विषयांवर आधारित असतात.
ही कला सावंतवाडी (महाराष्ट्र), ओडिशा आणि मैसूर (कर्नाटक) या प्रांतांमध्ये राजाश्रयाखाली फुलली. प्रत्येक प्रांताने आपली स्वतंत्र शैली विकसित केली. पारंपरिक गंजीफा पत्ते कापड, ताडपत्री, हस्तनिर्मित कागद अशा साहित्यावर नैसर्गिक रंगांनी हाताने रंगवून वार्निशने (लॅकर) पूर्ण केले जातात.
आज गंजीफा कला अत्यंत दुर्मिळ आणि संकटग्रस्त लोककला मानली जाते. केवळ मोजकेच कारागीर या पारंपरिक कलाकृतींचे संवर्धन करत आहेत. या प्रकाशनाद्वारे टपाल विभागाने या अमूल्य वारशाबद्दल जनजागृती निर्माण करण्याचा व त्याच्या पुनरुज्जीवनास चालना देण्याचा प्रयत्न केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा