नवी मुंबई : शिवप्रभूंचा इतिहास असो की अन्य कोणता; जो समाज आधी शिक्षित होता त्या समाजाने अन्य अल्पशिक्षित समाजाच्या भाबडेपणाचा गैरफायदा घेऊन आपल्या लोकांच्या सोयीचा इतिहास लिहिला व सगळ्यांच्या माथी मारला. कृष्णाजी भास्कर व अन्य तत्कालिन मतलबी लोकांची आडनावे कुणी व का लपवली? असा सवाल शिवव्याख्याते प्रा. रवींद्र पाटील यांनी केला. ऐरोली येथील श्री संत सावता माळी समाज मंडळ आणि सिनियर सिटीझन हेल्थकेअर फाऊन्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राजमाता जिजाई यांच्या स्मरणार्थ "शिवबा राजं छत्रपती झालं रं" या व्याख्यानांतर्गत ते २९ जून रोजी बोलत होते.
अनेक गोष्टी आपल्याला मूळ स्वरुपात सांगितल्याच गेल्या नाहीत. पण नंतर समाज शिकला, वाचू लागला, पुरावे धुंडाळू लागला व त्यांना वास्तव कळले असे सांगून प्रा. पाटील म्हणाले की विद्येचे माहेरघर मानल्या गेलेल्या पुण्याची विद्या आता नवी मुंबई, ठाणे, रायगड, धुळे, जळगाव, विदर्भ, मराठवाडा येथेही गेली असल्याने सर्वांचे डोळे लख्ख उघडले आहेत. प्रा.पाटील यांनी नवतरुणांना आवाहन केले की कपाळावर चंद्रकोर कोरणाऱ्या मुलींनी आधी स्व-संरक्षणाची कला शिकून घ्यावी व अंगाशी येणाऱ्या बदमाशांना जागीच लोळवावे व ज्यांना अंगावर शिवप्रभूंचे टॅटू कोरायचे आहेत, बुलेट आणि कारवर शिवरायांची प्रतिमा कोरायची आहेत, त्यांनी ती जरुर कोरावी; पण मग त्या शरीराला कोणत्याही विडी, सिगरेट; दारुचा स्पर्श होऊ देता कामा नये. माता-भगिनींना त्यांच्यापासून अप्रत्यक्षरित्याही उपद्रव होणार नाही याची काळजी घेतली जावी. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री, झरेकर यांनी स्फुर्तीगीते; तर अर्जुन पाटील यांनी पोवाडे सादर करुन वातावरण निर्मिती केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंगकर्मी रवींद्र औटी यांनी केले. श्री संत सावता माळी समाजाचे अध्यक्ष सुर्यकांत थोरात यांनी मंडळाच्या उपक्रमांची माहिती आपल्या प्रास्ताविकातून दिली.
सिनियर सिटीझन हेल्थकेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष बबनराव पाटणकर यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून सुमारे दीड हजार नागरिकांना हेल्थ कार्डचे वितरण करण्यात आले असून स्वच्छता, पर्यावरण अशा विविध बाबींवर संस्थेचे सदस्य सक्रीय असल्याचे सांगितले. याप्रसंगी अलीकडेच जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित झालेले पत्रकार राजेंद्र घरत तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र काेंडे, ज्येष्ठ रांगोळी कलावंत श्रीहरी पवळे यांचा सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सभागृहात भरगच्च हजेरी लावून या व्याख्यानातून शिवविचारांची धग अनुभवल्याचे पाहायला मिळाले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा