मुंबई(प्रतिनिधी)मराठी साहित्य क्षेत्रातील एकमेव ओळख निर्माण करणारा साहित्यिक समूह म्हणजेच "शब्द शंकरपाळी साहित्य समूह, मुंबई." रविवारी दिनांक २७ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रभादेवी, मुंबई येथे या साहित्यिक समूहाचा चौथा वर्धापन दिन आणि दिवाळी अंक प्रकाशन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने प्रज्ञा दळवी आणि सारंग सबनीस यांच्या शुभहस्ते करण्यात आली. त्यानंतर सृष्टी कोठवदे यांनी सरस्वती स्तवन गायल्याने कार्यक्रमाची रंगत अजून वाढली. या दरम्यान भूषण सहदेव तांबे यांचे संपादकीय मनोगत झाल्यावर दिवाळी अंकाचे प्रकाशन प. सा. म्हात्रे यांच्या शुभहस्ते झाले.
कार्यक्रमाचे दुसरे सत्र होते सत्कार समारंभ आणि गुणगौरव सोहळा. उपस्थित साहित्यिकांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, भेटवस्तू, फराळ, आणि दिवाळी अंक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून साहित्यिकांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थिती नोंदविली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शलाका कोठावदे आणि प्रदीप बडदे यांनी केले तर मृगनयना भजगवरे, दीपक जाधव, निलेश खरात, शितल मदने, शुभांगी बोकेफोड, सुरज तांबे, प्रज्वल कुसुरकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
या साहित्यिक सोहळ्यात पद्माकर भावे, भास्कर आग्रे, शुभांगी कुलकर्णी, सुमती नलावडे, रोहिणी टाकळकर, हरिश्चंद्र धिवार इत्यादी सदस्य उपस्थित होते आणि त्यांनी त्यांचा वैयक्तिक अभिप्राय कार्यक्रमात नोंदवून या साहित्यिक समूहास आणि दिवाळी अंकासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा