◼️ मुंब्रा बायपासवर बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाला. या एन्काऊंटरनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कारण अक्षय शिंदे याच्यावर गंभीर आरोप होता. त्याच्यावर आरोपपत्र दाखल झाले होते आणि अचानक त्याचा एन्काऊंटर होतो, यामुळे तर्कवितर्वांना ऊत आला आहे. एक बाब लक्षात घ्यायला हवी की, अक्षय शिंदेवर लैंगिक अत्याचाराचा आरोप होता. त्यामुळे त्याची बाजू घ्यायचे कुणालाही कारण नाही. ज्यावेळी चिमुरड्या मुलींवर अत्याचार झाले त्यानंतर बदलापूर रेल्वे स्टेशनमध्ये लोकांनी उत्स्फूर्त बंद पुकारत रेल्वे रोको आंदोलन केले होते. या नराधमाला फाशी द्या, अशी मागणी केली होती. एवढेच नाही तर सर्व राजकीय पक्षांनीही अक्षय शिंदेला फाशी देण्याची जोरदार मागणी करीत आंदोलने केली होती. त्यामुळे आरोप सिद्ध झाल्यानंतर कायदा देईल ती शिक्षा भोगणे त्याला क्रमप्राप्त होते, पण आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले असून याबाबत उपस्थित होणाऱ्या मुद्यांना समाधानकारक उत्तरे सरकारकडून मिळणे अपेक्षित आहेत. कारण या संपूर्ण प्रकरणात शाळेचे संस्थाचालक आजही फरार आहेत. जर अक्षय शिंदे आरोपी आहे तर संस्थाचालकांनी फरार होण्याचे कारण काय? ही घटना १२-१३ ऑगस्ट रोजी घडली आणि २० ऑगस्ट रोजी बदलापूर रेल्वे स्टेशनमध्ये मोठे आंदोलन झाले. आता महिना उलटून गेला तरी संस्थाचालक फरारच आहेत. त्यामुळेच संशय निर्माण होत आहे आणि याबद्दल कुणी प्रश्न उपस्थित केले तर तो गुन्हा कसा होऊ शकतो? आपल्याकडे राजकारण काय असते याची प्रचिती नेमकी इथे येत आहे. विरोधकांनी यावरून प्रश्न उपस्थित केल्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना गुन्हेगार ठरवण्याचे प्रयत्न होत आहेत. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांवर गोळीबार केला तर पोलिसांना स्वसंरक्षणाचा अधिकार आहेच. त्यात अक्षयचा बळी गेला तर कुणाला दुःख करण्याचे मुळीच कारण नाही, पण पोलिसांची लॉक असलेली रिव्हॉल्व्हर आरोपीच्या हातात जातेच कशी, हा प्रश्न कुणालाही पडू शकतो. चिमुरड्या मुलींवर अत्याचार झाल्यानंतर शाळेतील १५ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब कसे होते? आरोपीला पकडल्यानंतरही संस्थाचालकांचे फरार असणे याबाबत प्रश्न उपस्थित झाल्यास त्यात गैर ते काय? खरंतर सरकारने त्यांच्या संशयाची दखल घेऊन त्या मुद्यांचे निराकारण सखोल चौकशीतून केले जाईल, असे उत्तर दिले असते तर ते रास्त ठरले असते, मात्र असे न करता विरोधक आता आरोपीची बाजू घेत असल्याचा कांगावा माध्यमांसमोर करणे सत्ताधाऱ्यांना आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना मुळीच शोभत नाही. काही सत्ताधारी खासदारांनी याला नैसर्गिक न्याय म्हटले आहे, मात्र या आरोपीचे एन्काऊंटर केल्यामुळे चौकशीचे पुढचे दरवाजे बंद झाले आहेत याचेही समर्थन हे खासदार महोदय करणार का? संस्थाचालक का फरार झाले, याचे उत्तर आता कधीही मिळणार नाही आणि संस्थाचालक जेव्हा केव्हा पोलिसांच्या तावडीत सापडतील तेव्हा ते सांगतील तेच खरे मानणार का?
असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मुळात अक्षय शिंदे आरोपी असला तर आपल्याकडे कायद्याची प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेप्रमाणे शिक्षा व्हायला हवी. आता जर खासदार महोदय नैसर्गिक न्यायाची भाषा करीत असतील तर लैंगिक शोषणाचे आरोप अनेक नेत्यांवर झाले आहेत. हजारो कोटींचे भ्रष्टाचाराचे आरोप अनेक नेत्यांवर झाले आहेत. त्यांच्याबाबतही अशा नैसर्गिक न्यायाची अपेक्षा ठेवू शकतो का, याचेही उत्तर या खासदारांनी द्यायला हवे. राज्यात तीन दशकांपूर्वी बिगर काँग्रेसचे म्हणजेच शिवसेना-भाजप युतीचे पहिले सरकार १९९५ मध्ये स्थापन झाले होते. त्यावेळी गोपीनाथ मुंडे गृहमंत्री होते. नव्वदच्या दशकात मुंबईत दाऊद इब्राहिम, छोटा राजन, अरुण गवळी, अश्विन नाईक, मन्या सुर्वे, अबू सालेम अशा गँगस्टरची सद्दी होती. मुंबईत गँगवॉर होत असत. त्यावेळी एन्काऊंटरची पूर्ण सूट तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी पोलिसांना दिली होती. त्यावेळी काही ठराविक एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकाऱ्यांकडून गुन्हेगार मारले जायचे. तरीही तो काळ वेगळा होता आणि ती त्या काळाची वेगळी गरज होती. बदलापूर एन्काऊंटर प्रकरणातील संशय वेगळाच आहे. मुळात आरोपी अक्षय शिंदेला पोलिसांनी धरलेले असताना आणि त्याच्या चेहऱ्यार काळा कपडा असताना त्याच्या हातात पोलिसांची रिव्हॉल्व्हर लागलीच कशी? हाच सर्वात कळीचा मुद्दा आहे. शिवाय पोलीस व्हॅनमध्ये आरोपीच्या आजूबाजूला दाटीवाटीने पोलीस बसलेले असताना त्याने गोळी झाडली तेव्हा पहिली कृती त्याला झडप घालून पकडण्याची अपेक्षित होती. त्याऐवजी पोलीस त्याचा एन्काऊंटर करतात आणि हे सर्वांनी समजून घ्यावे अशी सत्ताधारी अपेक्षा करतात. असो, आता या सर्व प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. अन्यथा ज्या वास्तूत भविष्यात न्यायदानाचे काम होणार त्या उच्च न्यायालयाचे भूमिपूजन आणि त्याचवेळी एका आरोपीचा एन्काऊंटर होतो यातून काय संदेश जातो याचा विचार होणे गरजेचे आहे.
अवंतिका म्हात्रे-गडब-पेण-
*रायगड*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा