आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०२४

नेरुळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातवाढदिवस आणि अभिष्टचिंतन सोहळा संपन्न

नवी मुंबई : नेरुळ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील प्रांगणात सकाळच्या थंडगार अशा प्रसन्न वातावरणात, हिरव्यागार अशा लॉनवर, गार्डन परिवारातील ज्येष्ठ नागरिक श्री. प्रभाकरराव मिठबावकर यांचा ६५ वा वाढदिवस समारंभ आणि याबरोबरच राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र यांच्यातर्फे देण्यात येणारा राष्ट्रीय स्तरावरील समाजभूषण पुरस्कार - २०२४ श्री. सुभाष हांडे देशमुख यांना जाहीर झाल्याने त्यांचाही यथोचित गौरव मंगळवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी गार्डन परिवारातील ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. गार्डन परिवारातील बहुसंख्य जेष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन, दोघांनाही सदिच्छा आणि आशीर्वाद देऊन त्यांना निरोगी असे दीर्घायुष्य लाभो अशा भावना व्यक्त केल्या. आजच्या दिवशी, अनंत चतुर्दशी हा पवित्र आणि शुभ असा दिन असल्याने कार्यक्रम अधिक अधोरेखित झाला.
      पोलीस सेवेतून सेवानिवृत्त झालेले श्री. प्रभाकरराव मिठबावकर अत्यंत निरलस स्वभावाचे, परस्पर बंधुभाव जपून प्रत्येकाच्या मदतीस निरपेक्षपणे उभे राहणारे, निगर्वी, खूप संयमशील, मिस्कीलपणे हसतमुख राहणारे समंजस असे व्यक्तिमत्व असून तेवढेच ते स्पष्ट वागणारे व बोलणारे आहेत. असे श्री. रमेश पै यांनी त्यांचा परिचय करुन देताना, उपस्थितांशी संवाद साधताना सांगितले. असं सांगून ते पुढे म्हणाले की, खरे तर पोलीस खात्यातील व्यक्ती म्हणजे वागण्या बोलण्यात रफ टफपणा, अहंकारी स्वभाव, बेफिकीर वृत्ती अशा स्वभावाची बनते पण प्रभाकर मिठबावकर एक वेगळंच रसायन आहे. त्यांचे वडील पोलीस खात्यातच होते. सहाजिकच वडिलांची घरातील कडक शिस्त आणि सुसंस्कृत कुटुंब अशा वातावरणात ते वाढल्यामुळे पोलीस खात्यात नोकरी करुनही ते व्यसना सारख्या अनेक अभद्र गोष्टींपासून दूर राहीले. स्वतःला त्यांनी जाणीवपूर्वक अलिप्त ठेवले. आपला चांगुलपणा कधी सोडला नाही. नोकरीतही कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता, आपले कुटुंब सांभाळले. ते अधिक चांगल्या तऱ्हेने विस्तारित केले. मुलांनाही चांगल्या तऱ्हेने सर्व स्तरावर सक्षम केले. म्हणूनच आज त्यांचा मुलगा इंजिनिअर आहे तर मुलगी शिक्षण घेऊन लग्न करुन, आपल्या संसारात आनंदाने रममाण आहे. प्रसंगी सुभाष हांडे देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

गार्डन परिवारातील एक ज्येष्ठ सदस्य श्री. सुभाष हांडे देशमुख यांना राष्ट्रीय स्तरावरील समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांचाही यथोचित गौरव सर्व ज्येष्ठांनी मोठ्या अभिमानाने या प्रसंगी केला. आणि त्यांना त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

नेरुळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन परिवार यांच्या माध्यमातून, सर्वश्री रामचंद्र पाटील, जयेश भावसार, शशी जोशी, किरण तामसे, महादेव जाधव आदींनी आयोजित केलेल्या या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रमेश पै यांनी कुशलतेने केले.
----------------------------------
प्रेषक :
---- *सुभाष हांडे देशमुख*
 गार्डन परिवारातील एक ज्येष्ठ सदस्य.
         नेरुळ, नवी मुंबई
------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

महायुतीचेच आमदार रवींद्र पाटील बाजी मारणार: दयानंद भगत

गडब( अवंतिका म्हात्रे)पेण सुधागड विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार रवींद्र पाटील निवडून येणार असल्याचा विश्वास पेण राष्ट्रवाद...