मुंबई (शांताराम गुडेकर) कांडकरी विकास मंडळ, कासार कोळवण, ता. संगमेश्वर, जि.रत्नागिरी ही ग्रामस्थ आणि मुंबईकर यांच्या एकजुटीने गावच्या विकासासाठी कटिबद्ध असलेली आणि समाजकार्यात अग्रेसर असलेली एक प्रमुख संघटना आहे.गेली ३२ वर्षे अविरतपणे कार्यरत असलेल्या या संघटनेची कार्यशील कल्पक नेतृत्व आणि उत्साही कार्यकर्त्यांची फौज ही या मंडळाची बलस्थाने आहेत.श्री कांडकरी विकास मंडळातर्फे दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा विषयक अनेक उत्तमोत्तम कार्यक्रम आणि सण उत्सवानिमित्त लोकाभिमुख उपक्रम आयोजित केले जातात.कोकणी सण आणि उत्सवांमुळे आपल्या जीवनात संस्कृतीच्या जतनाबरोबरच संघभावना वाढीस लागते आणि संघटनेचे महत्व समजते. तसेच रोजच्या धकाधकीच्या जीवनात नवीन आशावाद, नवप्रेरणा आणि अखंड ऊर्जा मिळत राहते.
भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून श्री कांडकरी विकास मंडळाने दादर येथील पर्ल सेंटर येथे सन २०२४ मध्ये घवघवीत शैक्षणिक यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला. माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि पदवीधरांसह उच्च शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. या सोहळ्याला गुणवंत विद्यार्थ्यांसह पालकांचीही उपस्थिती लाभली होती.
श्री कांडकरी विकास मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सर्वश्री.संतोष विठ्ठल करंबेळे, माजी अध्यक्ष राजाराम सोमा तोरस्कर, कार्याध्यक्ष अशोक तुकाराम तोरस्कर, उपाध्यक्ष प्रकाश शिवराम करंबेळे, सचिव राजाराम रामा रावणंग, उपसचिव विलास तानाजी भोसले,खजिनदार दिलीप गणपत तोरस्कर,जेष्ठ मार्गदर्शक जयवंत यशवंत करंबेळे आणि इतर पदाधिकारी विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळयासाठी आवर्जून उपस्थित होते.उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष श्री.संतोष करंबेळे यांनी पुष्पगुच्छ देवून केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन दिलीप तोरस्कर सर यांनी केले.या शैक्षणिक कार्यक्रमात प्रारंभी भारतीय स्वातंत्र्याची महती गायली गेली.भारत मातेचा जयघोषही करण्यात आला.दिलीप तोरस्कर सर यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये देदीप्यमान यश मिळवण्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रमांचे विशेष कौतुक केले.तसेच आपल्या जीवनातील आधुनिक शिक्षणाचे महत्त्व विशद केले.आजचा प्रतिभावंत विद्यार्थी हा उद्याच्या प्रगतीशील समाजाचा एक मजबूत पाया कसा आहे हे स्पष्ट केले.आपल्या शैक्षणिक उन्नतीबरोबर विद्यार्थ्यांनी समाजाची बांधिलकीही जपावी असा कानमंत्रही दिला. कधी कमी यश मिळाले तर विद्यार्थ्यांनी खचून न जाता आपल्या सातत्यपुर्वक परिश्रमाने आणि गुणवत्तापूर्ण अंगभूत कलागुणांद्वारे यशश्री खेचून आणावी आणि आयुष्यात यशस्वी व्हावे असा विद्यार्थ्यांना धीरही दिला.
मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. राजाराम सोमा तोरस्कर यांनी आपले मौलिक विचार मांडताना विद्यार्थ्यांचे मन:पुर्वक अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.खजिनदार दिलीप गणपत तोरस्कर यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी सांभाळली आणि आपले मनोगत मांडताना विद्यार्थ्यांनी असेच यश मिळवत उत्कृष्ट करीअर घडवावे अशा शुभेच्छा दिल्या. सचिव श्री. राजाराम रावणंग यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना विद्यार्थ्यांच्या यशात पालकांचा आणि शिक्षकांचा कसा मोठा वाटा आहे हे स्पष्ट केले आणि या संवेदनशील वयात संगतीचा बरा- वाईट परिणाम कसा होतो यावरही मार्मिक भाष्य केले.सन्माननीय मान्यवरांच्या शुभहस्ते प्रत्येक गुणवत्ताधारक विद्यार्थ्याला शाबासकीसह भेटवस्तू देण्यात आली आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.या गुणगौरव सोहळ्यात माध्यमिक परीक्षेत कु.आदित्य नितीन तोरस्कर याने ९७.२० % गुण मिळवून गावात गुणवत्तेचा एक गौरवशाली मापदंड तयार केला आहे. कु. वैभवी भालचंद्र करंबेळे ९२.२०%, कु. क्षितिज शशिकांत तोरस्कर ९१.८०%, कु. पार्थ प्रकाश तोरस्कर ८९.००%, कु. प्रणव प्रमोद करंबेळे ८२.४० % यांचे यश प्रशंसनीय आणि नेत्रदीपक आहे. कु.वृषाली सुनील करंबेळे, कु. ऋतुजा सतिश भोसले, कु. साहिल सचिन घडशी यांनी सुद्धा उत्तम यशाचा झेंडा फडकवला आहे. कु. समृद्ध विजय करंबेळे यानेही छान यश मिळविले आहे.उच्च माध्यमिक परीक्षेत कु. आयुष संतोष तोरस्कर, कु. मनाली सोमनाथ करंबेळे, कु. शुभम सदानंद तोरस्कर, कु. रिद्धी रमेश तोरस्कर यांनी गुणवत्तापूर्ण यश प्राप्त करून आपली शैक्षणिक वाटचाल मोठ्या जोमाने सुरू ठेवली आहे. कु. सुजल सदानंद धावडे आणि कु. स्वराली संजय भोसले यांनीही छान गुण मिळवून यश संपादन केले आहे.पदवीधर विद्यार्थ्यांमध्ये कु. विनायक सुनील तोरस्कर, कु. सिद्धी विजय करंबेळे, कु. ऐश्वर्या श्रीधर करंबेळे आणि कु. आदित्य अनंत धावडे यांनी वाणिज्य शाखेत उत्तम यश मिळवून पदवी संपादन केली आहे. तर कु. ओमकार संदीप करंबेळे याने औषध निर्मितीशास्त्र (फार्मसी) शाखेत उत्कृष्ट यश मिळवून पदवी संपादन केली आहे. कु. आशिष सदानंद करंबेळे याने माहिती तंत्रज्ञान (I.T) मध्ये संगणक अभियंता (Computer engineer) ही अर्हता प्राप्त केली आहे .विद्यार्थीदशेत असे घवघवीत शैक्षणिक यश मिळविणाऱ्या या विद्यार्थ्यांवर टाळ्यांच्या गजरात कौतुकाचा वर्षाव झाला.
उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या पालकांचेही विशेष कौतुक केले. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे या विद्यार्थ्यांनी आपापले मनोगत व्यक्त करून आपल्या यशाचे गमक सांगितले. तर काही पालकांनीही आपल्या पाल्याच्या यशामागील आपली भूमिका आणि आपले विचार मांडले.अत्यंत सुखद आणि कौटुंबिक अशा वातावरणात पार पडलेल्या या शैक्षणिक कार्यक्रमामुळे आपल्या घरच्या माणसांनी (मंडळाने) केलेले कौतुक या गुणवंत विद्यार्थ्यांना सतत लक्षात राहिल आणि इतर विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहित करत राहिल.याच शैक्षणिक कार्यक्रमासोबतच सेवानिवृत्त जेष्ठ सभासदांचा सत्कार हा आणखी एक जिव्हाळ्याचा सोहळा संपन्न झाला.आदरणीय अशोक तुकाराम तोरस्कर, जयवंत यशवंत करंबेळे,आत्माराम शिवराम करंबेळे आणि सिताराम सोमा तोरस्कर या सेवानिवृत्त जेष्ठ सभासदांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.आपले आनंददायी जीवन जगताना समाजासाठी योगदान देणाऱ्या आपल्या जेष्ठ सभासदांविषयी सन्मानपूर्वक कृतज्ञता व्यक्त करणे मंडळाने आपले आद्य कर्तव्य मानले.अध्यक्षीय भाषणात श्री.संतोष करंबेळे यांनी आजच्या कार्यक्रमाबद्दल गौरवोद्गार काढले आणि समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांचे कौतुक करताना आपण असेच समाजोपयोगी उपक्रम राबवत राहू आणि समाजाची प्रगती साधत राहू अशी ग्वाही दिली.स्वातंत्र्य दिनी दोन सत्कार समारंभ उत्तम रीतीने पार पाडण्यासाठी मंडळाच्या अध्यक्षांसह मंडळाचे मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मुंबईकर-ग्रामस्थ यांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतल्याने कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा